वन वे तिकीट - छोटीसी बात

 • First Published :17-May-2017 : 15:47:24

 •  पिंपळोबा-मित्रोबा!

   
  कसा आहेस? 
  वा! तुझी अशी उत्स्फूर्त सळसळ ऐकली ना एकदम दिल खूश होऊन जातं ! 
  गेल्यावर्षी इथे राहायला आलो तेव्हाही तू असाच हिरव्याकंच पानांनी गच्च भरलेला होतास. 
  अंगणात हीऽऽ भलीमोठ्ठी सावली पाडायचास. 
  चिमण्या, बुलबुल, दयाळ, कोकिळांची तुङया पानांमध्ये संगीतखुर्ची रंगायची.
  पावसाळा येऊन गेला तसा तुझ्या पानांचा पाऊस पाडू लागलास तू. अंगणभरून पिंपळपानं ! थंडी आली तशी तुला लहानी पिवळी फुलं आली. त्या फुलांमागोमाग मधमाश्या आल्या. फुलांची फळं झाली तशा खारी आल्या. तुझ्या अंगाफांद्यांवर खेळू लागल्या. रात्रीची वाटवाघळं येऊ लागली. किचकिच करून फळं संपवू लागली. फळं संपली आणि तुला नवी पालवी फुटली. गुलाबी, गडद जांभळी, हिरवी. तकाकीची. 
  आणि तू पुन्हा असा हिरवागार झालास. तुझ्या निमित्तानं एक ऋतुचक्र पूर्ण अनुभवायला मिळालं. 
  पण काय रे पिंपळोबा, तू असं एखादी फांदी वाकवून खिडकीतून आत डोकावून बघायचास का रे मला? तुझ्याखाली जमिनीवर मला असं फिरता-वाढताना पाहून काय वाटायचं तुला? काय विचार करायचास तू? की विचारांची चक्रं फिरवणं हे फक्त आम्हा माणसांचं लक्षण? 
  कदाचित पिंपळोबा म्हणून तू अगदी जवळचा मित्रोबा वाटणं हे माझ्याच मनाचे खेळ. कदाचित तू बिलकूल विशेष नाहीस. तू इतर पिंपळांसारखाच फक्त एक पिंपळ आहेस. एक नुसतं झाड आहेस. शक्य तेवढं प्रकाशसंश्लेषण करायला म्हणून पानं-फांद्या वाढवल्यात तू. त्यांची खाली काय किती सावली पडते त्याचं तुला काही पडलं नाहीये. वेळच्यावेळी नियमानुसार फुलतोस. फळतोस. खारी-वटवाघळांकरवी आपला वंश पुढे पाठवतोस. एकाजागी उभं राहून वर्षानुवर्षे हेच चाललंय तुझं.
  पण नाही, इतका ‘बोअर’ कसा असू शकतोस तू? तू पिंपळोबाच असायला हवंस. हो.
  बरं, पत्र लिहितोय कारण उद्या हे घर सोडून जाणार मी. परत आपली भेट नाही. तुझं हे एक पान सोबत नेतोय या डायरीतून. तुझी गंमतगार आठवण म्हणून. 
  काळजी घे, नीट राहा..
   
  तुझा एक मित्र,- वेडोबा 
  -प्रसाद सांडभोर sandbhorprasad@gmail.com 
   
   
  गाव सोडून ११ वर्षं झाली. मग कधी कधी मनात प्रश्न पडतो, तसंही गावात राहिलो किती काळ? पाचवीला असताना गाव सोडलं. वय वर्षे १० असताना.
  पुण्यात होस्टेलवर आलो. 
  आता वयाची विशी पूर्ण झाली. होस्टेलच्या जगण्याची सवय झाली. सगळं स्वत:च करायचं. स्वत:ची सगळी कामं स्वत: करायची. मनसोक्तपणे. मनाला आलं तर करीन नाहीतर राहील. पण कुणी सांगायला नको अरे हे असं कर म्हणून, असं आता वाटतं.
  पाचवीला आलो पुण्यात. आता चालू आहे लास्ट इअर. भविष्यात पत्रकारितेत उमेदवारी करायची आहे त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पण आजही सहज कोणी बोलता बोलता विचारलं की, कारे, इतक्या लहान वयात गाव सोडलं? 
  तर अजूनही समाधानकारक नेमकं उत्तर मनात सापडत नाही. 
  गावात शाळा होतीच की दहावीपर्यंतची. पण तरीही घरच्यांची पोराला चांगल्या शाळेत शिकवायची इच्छा आणि मलाही बाहेर शिकायची इच्छा होती. (असं घरचे सांगतात. पण १० वर्षांचा असताना मला किती कळत होत काय माहीत?) म्हणून पुण्यात आलो. तसं गाव म्हणाल तर डोंगरगाव, तालुका सांगोला. दहावी-बारावीपर्यंतची सगळी वर्षं होस्टेलच्या नियमांना तडा देत जगलो. तसंच राहायचं असतं खरंतर होस्टेलला. तसंही होस्टेलवर सगळे एकाच पंगतीतले. घर सोडून पुण्यात आलेले. पण होस्टेलवरचे चांगले-वाईट दिवस जगता जगता मनं जुळली, गुण-अवगुण जुळले आणि त्यातून मैत्री जुळली नात्यापलीकडे. (तसंही हॉस्टेल लाइफमध्ये अवगुण जुळल्यावर चांगली मैत्री होते, असं म्हणता येईल.)
  आता गावाकडं जाणं होतं वर्षांतून चार-पाच वेळा. तेही १०-१५ दिवसांसाठी, जास्तीत जास्त एखादा महिना. पण यामुळे गावची नाळ तुटली असं म्हणता येत नाही. कुठेतरी जाणं-येणं कमी झालं की थोडासा दुरावा निर्माण होतोच म्हणा. पण इतकी वर्षं पुण्यात राहिल्याने कुठेतरी पुणे आपलं वाटू लागलं आहे. 
  पण कधीतरी पुण्याच्या रस्त्यावर फिरताना एखादा सहज विचारतो, गाव कोणतं? ते सांगोला, पंढरपूरजवळ?
  आपण पुणेकर नसल्याची जाणीव.
  पण घरी गावाला गेलं की तिथले लोक विचारतात, काय पुणेकर कधी आलात पुण्यावरून? ही आपण हवेत राहत नसल्याची जाणीव.
  मग अशावेळी मनात प्रश्न पडतो, ‘आम्ही नक्की कुठले?’ 
  पुण्यात १०-११ वर्षं काढूनही पुणेकर होता आलं नाही. आणि तेच पुन्हा, पुण्यात १०-११ वर्षं काढल्याने सोलापूरकरपण होता आलं नाही. पण या सगळ्या प्रवासात एका गोष्टीची मात्र जाणीव झाली. ती म्हणजे, या प्रचंड मोठ्या विश्वात कुठेतरी आपलं नाव कोरण्यासाठी असं घरदार, गाव सोडून या विश्वाच्या डोहात उडी तर मारावीच लागेल ना... 
   
  - प्रवीण रघुनाथ काळे
  (सध्या पुण्यात राहतो. मूळ गाव मु. पो. डोंगरगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर)
   
  आम्ही नक्की  कुण्या गावचे?
  वय वर्षे १० असताना काय म्हणून मी गाव सोडलं असेल? पण सोडलं. चांगलं शिकण्याची संधी म्हणून? पण म्हणून आम्ही पुण्याचे झालो का? आणि गावचे तरी राहिलो का? प्रश्नच आहे.. 
  अनाउन्समेण्ट
  छोटीशी गावं.त्यापेक्षा मोठी; पण छोटीच शहरं.या शहरात राहणारी जिद्दी मुलं.आपल्या स्वप्नांचा हात धरून,संधीच्या शोधात मोठ्या शहरांकडे धावतात. काय देतात ही मोठी शहरं त्यांना? कसं घडवतात-बिघडवतात? आणि जगवतातही..?
  - ते अनुभव शेअर करण्याचा हा नवा कट्टा.तुम्ही केलाय असा प्रवास?आपलं छोटंसं गाव, घर सोडून मोठ्या शहरात गेला आहात शिकायला? मोठ्या शहरात? दुसऱ्या राज्यात? परदेशातही? काय शिकवलं या स्थित्यंतरानं तुम्हाला? काय अनुभव आले? कडू-वाईट?
  हरवणारे-जिंकवणारे? त्या अनुभवांनी तुमची जगण्याची रीत बदलली का? दृष्टिकोन बदलला का? त्या शहरानं आपलं मानलं का तुम्हाला? तुम्ही त्या शहराला? की संपलंच नाही उपरेपण?या साऱ्या अनुभवाविषयी लिहायचंय? तर मग ही एक संधी ! लिहा तुमच्या स्थलांतराची गोष्ट.
  १. लिहून पाठवणार असाल, तर पाकिटावर ‘वन वे तिकीट’ असा उल्लेख करा. सोबत तुमचा फोटो आणि पत्ता-फोन नंबरही जरूर लिहा..
  २. ई-मेल- oxygen@lokmat.com
   


महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS