पंतप्रधान मोदी आणि चीनच्या राष्ट्रपतींमध्ये आमिर खानच्या दंगलची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2017 08:16 AM2017-06-10T08:16:51+5:302017-06-10T08:16:51+5:30

नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी चिनफिंग यांच्यामध्ये भारत-चीन सीमावाद, व्दिपक्षीय मुद्दे यासह आमिर खानच्या बहुचर्चित दंगल सिनेमाबद्दलही चर्चा झाली.

A discussion of the riots of Aamir Khan in Prime Minister Modi and Chinese President | पंतप्रधान मोदी आणि चीनच्या राष्ट्रपतींमध्ये आमिर खानच्या दंगलची चर्चा

पंतप्रधान मोदी आणि चीनच्या राष्ट्रपतींमध्ये आमिर खानच्या दंगलची चर्चा

Next

 ऑनलाइन लोकमत 

अस्ताना, दि.10 - शांघाय सहकार संघटनेच्या (एससीओ) वार्षिक परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग यांच्यामध्ये भारत-चीन सीमावाद, व्दिपक्षीय मुद्दे यासह आमिर खानच्या बहुचर्चित दंगल सिनेमाबद्दलही चर्चा झाली. कुस्तीवर आधारीत दंगलने बॉक्स ऑफीसवर विक्रमी कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित झाला आहे. 
 
चीनमध्येही सिनेरसिकांना या चित्रपटाने भुरळ घातली असून, अगदी चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंगही या चित्रपटाच्या प्रेमात पडले आहेत. शांघाय सहकार परिषदेमध्ये मोदींबरोबर झालेल्या भेटीत चिनफिंग यांनी आवर्जून दंगल चित्रपटाचा उल्लेख केला. मी आमिर खानचा दंगल चित्रपट बघितला असून हा चित्रपट मला प्रचंड आवडला असे चिनफिंग यांनी मोदींना सांगितले. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी ही माहिती दिली. 
 
दंगल हा चीनमध्ये सर्वाधिक कमाई करणारा पहिली हिंदी चित्रपट ठरला आहे. चीनमध्ये प्रदर्शित होऊन महिला उलटल्यानंतरही हा चित्रपट दमदार कमाई करत आहे. चीनच्या बॉक्स ऑफीसवर दंगलने 1090 कोटींची कमाई केली आहे.
 
दरम्यान कझाकिस्तानची राजधानी अस्ताना येथे शांघाय सहकार संघटनेच्या (एससीओ) वार्षिक संमेलनात बोलताना मोदींनी हशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आणि सार्वभौमत्वाचे उल्लंघन न करता कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी समूहातील देशांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.  एससीओ समूहात भारताचा झालेला प्रवेश दहशतवादाविरुद्धच्या लढाईला नवी गती देईल. दहशतवादाला तोंड देण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. कट्टरवाद, अतिरेक्यांची भरती आणि प्रशिक्षण व आर्थिक मदत या धोक्यांपासून वाचण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या उपस्थितीत मोदी यांनी सांगितले की, व्यापार आणि गुंतवणुकीसाठी ही कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे.
 
मोदी-शी चिनफिंग यांच्यात चर्चा -
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग यांच्यात शुक्रवारी येथे चर्चा झाली. एकमेकांच्या समस्यांचा सन्मान करणे आणि वादग्रस्त विषय सामंजस्याने हाताळण्यावर या दोन नेत्यांनी भर दिला. ‘बेल्ट अँड रोड फोरम’वर भारताने बहिष्कार टाकल्यानंतर या दोन नेत्यातील ही पहिलीच भेट होती. या भेटीदरम्यान मोदी म्हणाले की, चीनच्या सहकार्याशिवाय एससीओचे सदस्य होणे भारताला शक्य नव्हते.
 
जैश -ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला अतिरेकी जाहीर करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीनने खोडा घातलेला आहे. याशिवाय एनएसजीच्या सदस्यत्वासाठीही चीनने अडथळे निर्माण केलेले आहेत. त्यामुळे उभय देशातील संबंधात काही प्रमाणात कटुता आलेली आहे. ही चर्चा अतिशय सकारात्मक झाल्याचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी सांगितले.

Web Title: A discussion of the riots of Aamir Khan in Prime Minister Modi and Chinese President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.