माध्यमप्रश्नी लोकच कौल देतील

  • First Published :05-January-2017 : 02:06:09 Last Updated at: 05-January-2017 : 02:06:24

  • पणजी : राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी आमच्या सरकारने जो निर्णय घेतला आहे, तो राज्यातील बहुतेक लोकांना मान्य आहे. तथापि, आमचा निर्णय किंवा तोडगा जर चुकीचा असेल तर येत्या निवडणुकीवेळी मतदानाद्वारे लोक तसे दाखवून देतील, असे भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी बुधवारी येथे सांगितले.

    आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर यांच्या उपस्थितीत डिसोझा यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. भाजपचा निवडणूक जाहीरनामा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आम्ही लोकांच्या सूचना जाणून घेऊ. आॅनलाईन पद्धतीनेही भाजपच्या संकेतस्थळावर लोक जाहीरनाम्यासाठी सूचना सादर करू शकतील. वयोवृद्ध व्यक्तींसाठी जाहीरनाम्यात तरतुदी केल्या जातील. तशी सूचना आलेली आहे, असे डिसोझा यांनी सांगितले.

    भाजपने २०१२ साली निवडणूक जाहीरनाम्यातून दिलेली ७५ ते ८० टक्के आश्वासने पाळली आहेत. माध्यमप्रश्नी आम्ही आमच्यापरीने तोडगा काढला आहे. कॅसिनोंना मांडवी नदीतून बाहेर काढावेत किंवा ते बंद करावेत, असे पर्याय आहेत. त्यांना अन्यत्र जागा देण्याचा सरकारचा विचार आहे. प्रादेशिक आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पेडणे, काणकोण व सत्तरी तालुक्याचे आराखडे तयार झाले आहेत, असे डिसोझा यांनी सांगितले.

    दरम्यान, खाण घोटाळा झाल्यानंतर हजारो कोटींची वसुली झाली नाही हे खरे असले तरी, कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. खनिज व्यवसाय नव्याने सुरू करणे यास प्राधान्य होते व आहे. घोटाळ्यांमध्ये कोण गुंतले होते व नेमका किती कोटींचा घोटाळा झाला हे आम्हाला ठाऊक आहे; पण आरोप केले व लगेच आरोपींना पकडले असे भारतीय दंड संहितेमध्ये करता येत नाही, असे डिसोझा म्हणाले. (खास प्रतिनिधी)महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS