दोषींना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी!

 • First Published :20-June-2017 : 02:49:09

 • लोकमत न्यूज नेटवर्क

  मुंबई : १९९३ बॉम्बस्फोटांप्रकरणात दोषी ठरवलेल्या सहा जणांना जास्तीतजास्त शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी विनंती राज्य सरकारने विशेष टाडा न्यायालयात सोमवारी केली. शिक्षेसंदर्भातील युक्तिवादाला सुरुवात कुणी करावी, यावरून वाद उपस्थित झाला असता याबाबत नंतर निर्णय घेऊ, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

  आरोपींविरुद्ध कोणते पुरावे आहेत, हे सरकारी वकील न्यायालयापुढे मांडतील आणि त्यानुसार आरोपीला शिक्षा देण्याची मागणी करतील. त्यामुळे सरकारी वकिलांनाच आधी युक्तिवाद करण्यास सांगावा, अशी विनंती अबू सालेमचे वकील सुदीप पासबोला यांनी विशेष न्यायालयाला केली.

  तर, बचावपक्षाच्या वकिलांना आधी युक्तिवाद करण्यास सांगावा, अशी विनंती विशेष सरकारी वकील दीपक साळवी यांनी न्या. जी. ए. सानप यांना केली. कायद्यांतर्गत नमूद करण्यात आलेली जास्तीतजास्त शिक्षा प्रत्येक दोषीला ठोठावण्यात यावी, अशीच विनंती आम्ही न्यायालयाला करणार, असे साळवी यांनी विशेष टाडा न्यायालयाला सांगितले.

  फिरोज खान याने स्वत:ची बाजू भक्कम करण्यासाठी कारागृहातील काही आरोपींची व स्वत:ची साक्ष नोंदवण्याची विनंतीही त्याने अन्य

  एका अर्जाद्वारे न्यायालयाला केली आहे. त्याचा हा अर्ज मान्य करत न्यायालयाने त्याचे वकील वहात्त खान यांना मंगळवारपासूनच साक्षीदारांची साक्ष नोंदवण्याचे निर्देश दिले.

  त्याने तिसरा अर्ज ‘प्रोबेशन आॅफ आॅफेन्डर अ‍ॅक्ट’अंतर्गत केला आहे. या कायद्यांतर्गत पहिल्यांदाच दोषी ठरवलेल्या व्यक्तीची शिक्षा स्थगित केली जाऊ शकते व त्याला प्रोबेशन मिळू शकते. या अर्जावर निर्णय घेण्यासाठी न्यायालयाने प्रोबेशन अधिकाऱ्याला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. गेल्या शुक्रवारी विशेष न्यायालयाने १९९३ बॉम्बस्फोटांप्रकरणी अबू सालेमसह, मुस्तफा डोसा, रियाझ सिद्दिकी, ताहीर मर्चंट, फिरोझ खान, करीमुल्ला खान यांना दोषी ठरवले. तर अब्दुल कय्युमची सुटका केली.महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS