नव्या पिढीतील महत्त्वाकांक्षी लोकांचे काम आणि आयुष्याचा समतोल ढळतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 03:49 PM2018-10-08T15:49:52+5:302018-10-08T15:53:04+5:30

वर्क लाईफ बॅलन्सची त्यांची संकल्पना खूपच सकारात्मक आहे.

The work of new generation ambitious people and the balance of life |  नव्या पिढीतील महत्त्वाकांक्षी लोकांचे काम आणि आयुष्याचा समतोल ढळतोय

 नव्या पिढीतील महत्त्वाकांक्षी लोकांचे काम आणि आयुष्याचा समतोल ढळतोय

Next
ठळक मुद्देचौथ्या औद्योगिक क्रांतीच्या टप्प्यावर आपण आहोतमनुष्यविरहित उत्पादन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या दोनच गोष्टींवर विचार चालूआपण दिवसेंदिवस सर्वच आघाड्यांवर समतोल हरवून चाललो आहोत

पाश्चिमात्य जगातील काही गोष्टी प्रत्यक्ष अनुभवल्या. त्यापैकी तिकडच्या लोकांची काम आणि आयुष्याचा समतोल राखण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न ही गोष्ट खूप महत्त्वाची वाटली. वर्क लाईफ बॅलन्सची त्यांची संकल्पना खूपच सकारात्मक आहे. कामाच्या वेळेत पूर्णपणे एकाग्रचित्ताने काम करणे आणि एकदा काम संपले की मी आणि माझं कुटुंब यापलीकडे कामाच्या ठिकाणच्या गोष्टी, ताणतणाव अजिबात घ्यायचा नाही, यावर त्यांचा कटाक्ष असतो. सकाळी सात वाजता काम सुरू होते. म्हणजे आॅफिसमध्ये येणे नव्हे तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली असते. त्यासाठी १० मिनिटे आधी कामाच्या ठिकाणी येऊन वेळेवर काम सुरू केले जाते. तेही कुणाच्याही सांगण्याची वाट न पाहता. बायोमेट्रिक्स तिकडेही आहे. परंतु त्याचा दुरुपयोग बिलकुल होत नाही. याउलट आपल्याकडे ती शिस्त कशी मोडता येईल किंवा कुणालाही न जमलेली गोष्ट मी कशी केली, हे सांगण्याची अहमहमिका सुरू असते. यामुळे आपण कामाच्या ठिकाणी आणि व्यक्तिगत आयुष्यात दोन्हींकडे समाधानी नसतो. तिकडे काय काम करतो त्यापेक्षा ते कसे करतो, यावर लोकांची प्रतिष्ठा अवलंबून असते.

आपल्याकडे विशेषत: सरकारी कार्यालयातील वातावरण पाहिले तर ही तफावत अधिक प्रकर्षाने जाणवते. सरकारी कार्यालयात साहेब आलेत का, असे विचारावे लागते. आलेत तर मग त्यांना भेटू शकतो का, असे विचारल्यावर उत्तर येते ते फार व्यस्त आहेत थोड्या वेळाने या, असे बाहेरचे शिपाई किंवा त्यांचे कनिष्ठ सांगतात. आत साहेबांनी अद्याप कामाला सुरुवात पण केलेली नसते. संध्याकाळी कार्यालयाची वेळ संपल्यानंतर ओव्हरटाईम करण्याची हौस असते. टेबलवर फायलींचा गट्टा असणे म्हणजे साहेब किती काम करतात, हे इतरांना कळावे, यासाठी केलेली सोय असते. वेळ कधीच पाळायची नाही, अशीच जणू सरकारी अधिकाºयांची समजूत झालेली असते. आपल्याकडे येणारे गोरगरीब लोक आपली रोजी बुडवून आलेले असतात, याविषयी त्यांना सोयरसुतक नसते.

याउलट खाजगी कंपन्यांमध्ये विशेषत: अलीकडील प्रशंसाप्राप्त कापोर्रेट कंपन्यांमध्ये काम करणारी नव्या पिढीतील महत्त्वाकांक्षी वर्कोर्होलिक लोकांचे आयुष्य पूर्णपणे असमतोल आणि बिघडलेले दिसते. सतत ताणतणाव आणि स्पर्धेत गुंतल्यामुळे मानसिक, भावनिक संतुलन बिघडलेले असते. खूप पैसे कमवायचे, मोठ्या पदावर जाण्याची धडपड यामुळे आयुष्य आणि स्वत:वर होणाºया परिणामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणारी ही नवी पिढी आयुष्याचे संतुलन घालवून बसली आहे. हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या रोगांच्या अवघ्या चाळिशीत आहारी गेलेल्यांचे प्रमाण वाढत आहे. खरेतर काम करून पैसे मिळवायची ते शांतपणे आयुष्य जगण्यासाठी, कुटुंबासह समाधानी राहण्यासाठी ही गोष्टच विसरलेल्या अशा मंडळीला नव्याने वर्क लाईफ बॅलन्स म्हणजेच आयुष्याचे व्यवस्थापन शिकविण्याची वेळ आलेली आहे.

पाश्चिमात्यांमध्ये याकडे कटाक्षाने पाहिले जाते. तिकडे वीकेंड म्हणजे आठवडाभर काम केल्यानंतर सुट्टीचे दिवस कुटुंबीय आणि स्वत:साठी असतात. त्यामध्ये कुणीही हस्तक्षेप करू शकत नाहीत. याउलट आपल्याकडे अशा आयुष्य आणि कामाचे समतोल सांभाळू न शकल्याने असमाधानी आणि नाराज असलेले लोक हाताखालच्या लोकांना आॅफिसची वेळ संपल्यानंतर किंवा सुट्टीच्या दिवशी बोलावून त्यांनाही त्रास देण्यात असुरी आनंद मिळवीत असतात. हे काम आणि आयुष्याचे समतोल बिघडलेल्या अनेकांनी आत्महत्या केल्याच्या देखील घटना आपण पाहतो. याची जबाबदारी जशी वैयक्तिक आपली आहे तितकीच उद्योग, कंपन्या आणि आस्थापनांची देखील आहे. शासनाकडे अशा विषयांसाठी अजिबात वेळ नाही.

समाजशास्त्र आणि व्यवस्थापन शिकविणाºयांना याचे महत्त्वच कळले नाही. चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या टप्प्यावर आपण आहोत, त्यामध्ये मनुष्यविरहित उत्पादन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या दोनच गोष्टींवर विचार चालू आहे. अशा व्यवस्थेमध्ये आपल्यासारख्या काम आणि आयुष्याचा समतोल हरवलेल्यांना कोणत्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार, याचा विचार मनात आला तरी जीवाचा थरकाप उडतो. जग झपाट्याने पुढे जातंय. आपण दिवसेंदिवस सर्वच आघाड्यांवर समतोल हरवून चाललो आहोत, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
 -प्रा. विलास बेत
(समाजशास्त्राचे अभ्यासक) 

Web Title: The work of new generation ambitious people and the balance of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.