आला उन्हाळा वेळ सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:40 PM2019-04-08T12:40:34+5:302019-04-08T12:46:31+5:30

आपण चांगल्या गोष्टींविषयी खूप काही बोलतो. खूप काही लिहितो पण करत काहीच नाही. म्हणून आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही.

Take care of summer time | आला उन्हाळा वेळ सांभाळा

आला उन्हाळा वेळ सांभाळा

Next
ठळक मुद्देसोलापुरात सालाबादप्रमाणे असह्य उन्हाळा सुरू झालेला आहे उन्हाळा असह्य होऊ नये याकरिता आपण वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेण्याची गरजपावसाचा प्रत्येक थेंब आपण साठवून ठेवला पाहिजे.

सोलापुरात सालाबादप्रमाणे असह्य उन्हाळा सुरू झालेला आहे. हा उन्हाळा असह्य होऊ नये याकरिता आपण वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेण्याची गरज आहे. या विषयावर अनेक लोक चर्चा करतात. लेखन करतात परंतु हा विषय प्रत्यक्ष अंमलबजावणीचा आहे. आपण चांगल्या गोष्टींविषयी खूप काही बोलतो. खूप काही लिहितो पण करत काहीच नाही. म्हणून आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही. वृक्षारोपण हा अत्यंत महत्त्वाचा विषय. आपण सर्वांनी याची अंमलबजावणी केली पाहिजे. पावसाचा प्रत्येक थेंब आपण साठवून ठेवला पाहिजे. नक्कीच पुढचा काळ हा उन्हाळा सुद्धा आपल्याला आनंद देणारा जाणार. जर आपण पाण्याची बचत आणि वृक्ष संगोपन केलं तर.

सध्याच्या परिस्थितीत आपण हा प्रयत्न केला तर त्याचे यश काही वर्षांनंतर मिळणार आहे. सध्या मात्र हा उन्हाळा आनंददायी करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे उन्हात कुठेही न जाता शांतपणे सावलीत बसणे. शांतपणे सावलीत बसल्यानंतर वेळ चांगला जावा याकरिता आपण सगळे पटकन दूरदर्शन किंवा मोबाईलला चिटकून बसतो. या गोष्टींची मर्यादा पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या आयुष्यातला काही वेळ मोबाईल, दूरदर्शन यांना देणे ठीक आहे पण अखंडपणे त्यांच्याजवळ बसून राहणे यातून विविध प्रकारच्या आजारांना आमंत्रण देण्यासारखेच आहे.

काही लोक या रिकाम्या वेळेमध्ये  इतरांच्याविषयी गप्पा मारताना दिसतात. यामध्ये राजकारणापासून त्यांच्या गल्लीतल्या घडामोडींपर्यंत अनेक विषय होतात. या सगळ्यावर आपण जर विचार केला तर आपल्याला मिळालेला वेळ आपण सत्कारणी लावला का ? हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारण्याची गरज आहे. आपल्या रिकाम्या वेळेमध्ये आपण ज्या गोष्टी करतो त्याचा आपल्याला नेमका काय फायदा होतो? याचा विचार आपण स्वत: केला पाहिजे. बाजारात भाजी आणायला गेल्यानंतर दहा रुपयाची भाजी पाच रुपयाला कशी मिळेल? याचा आपण विचार करतो. पैशाचा आपण खूप चांगला विचार करतो. तसा वेळेचा विचार आपण खूप कमी करतो. आपला वेळ कुठे दिला पाहिजे? किती दिला पाहिजे? याचे चिंतन आपण स्वत: केलं पाहिजे. आपण अनेक वेळेला अनावश्यक गोष्टींची बडबड करत असतो. त्या बडबडीतून फायदा तर होतच नाही पण समोरची माणसं दुखावली जातात. समोरचा माणूस पुन्हा तिसºया माणसाला आपण काय बोलतो हे जाऊन सांगतो. तोही माणूस आपल्यावर नाराज होतो.   अशा अनावश्यक बडबडीमधून आपलं स्वत:चं नुकसान होत असतं. म्हणून अनावश्यक बडबड न करता आवश्यक गोष्टी केल्या पाहिजेत.

आपण भारतीय अतिशय भाग्यवान आहोत.आपल्यातल्या सर्व चांगल्या गोष्टी आज पाश्चात्त्य लोकांनी स्वीकारलेल्या आहेत. उदाहरणार्थ विविध पंथांचा आध्यात्मिक वारसा परदेशातल्या अनेक लोकांनी स्वीकारला. स्वामी विवेकानंदांचा विचार आज परदेशातल्या लोकांनी आचारात उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

यासंबंधी आपण एक गोष्ट करू शकतो आपल्या संत-महात्म्यांनी ज्या गोष्टी आपल्यासाठी लिहून ठेवल्या आहेत. आपल्या जीवनाचा मार्ग खडतर न होता आनंददायी व्हावा म्हणून अनेक गोष्टी संतांनी लिहून ठेवल्या आहेत. या गोष्टी आपण वाचल्या पाहिजेत.या गोष्टी आपण जर वाचल्या तर खºया अर्थाने जीवनात आपण वाचणार आहोत. अन्यथा आपलं जीवन हे सर्वसामान्य पशुपक्ष्यांप्रमाणेच राहणार आहे. आपण शांतपणे विचार केल्यावर आपल्या लक्षात  येईल की पशुपक्ष्यांंकडूनसुद्धा खूप गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. आपल्याकडूनसुद्धा समाजाने काहीतरी शिकलं पाहिजे. आपला समाजाला कोणत्या न कोणत्या रुपानं उपयोग झाला पाहिजे. याचा विचार आपण केला पाहिजे. 

दुसरी गोष्ट आपल्याला करता येईल एखादी कला आपल्याला अंगी बाणता येईल. संगीतापासून ते इतर एकूण ६४ कला आहेत. त्यापैकी किमान एखादी कला आपण आपल्या अंगी बाळगली पाहिजे. त्या कलेची साधना करण्यामध्ये आपला अमूल्य वेळ आपण दिला पाहिजे. 
- डॉ. अनिल सर्जे
(लेखक हे साहित्यिक आहेत.)

Web Title: Take care of summer time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.