संगीत सुमिरनात लागली श्रोत्यांची समाधी, हिराचंद नेमचंद वाचनालयाचा वर्धापन दिनानिमित्त सोलापूर सुश्राव्य संगीत सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 01:20 PM2018-02-17T13:20:41+5:302018-02-17T13:57:59+5:30

या संगीत सुमिरनात श्रोत्यांची समाधी लागली. एकाहून एक सरस अशा बंदिशी, भजन आणि शास्त्रीय गायनात श्रोते तल्लीन झाले. तब्बल अडीच तास चाललेल्या या तालासुराच्या वातावरणात श्रोते तल्लीन झाले.

Solapur's Sushrudya Sammelan on the occasion of Anniversary of Hira Chand Nimchand Library | संगीत सुमिरनात लागली श्रोत्यांची समाधी, हिराचंद नेमचंद वाचनालयाचा वर्धापन दिनानिमित्त सोलापूर सुश्राव्य संगीत सभा

संगीत सुमिरनात लागली श्रोत्यांची समाधी, हिराचंद नेमचंद वाचनालयाचा वर्धापन दिनानिमित्त सोलापूर सुश्राव्य संगीत सभा

Next
ठळक मुद्देसुयोग कुंडलीकर यांची संकल्पना असलेल्या या संगीत सभेत आरती ठाकूर आणि डॉ. रेवती कामत यांचे गायनकिरवानीचे स्वर मनात रुंजी घालत असतानाच आरती ठाकूर यांनी चारुकेशी रागातील ‘सुमिरन बिन गोता खायेगा’ हा संत कबीरांचा मध्य लयीतील दोहा ऐकविला. संत रामदास आणि संत तुकारामांच्या भैरवीतील रचना सादर करून ‘माझे सर्व जावो, नाम तुझे राहो’ या भैरवीच्या स्वरांनी या मैफिलीची सांगता झाली. ‘विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग विठ्ठल’ या गजराला श्रोत्यांनीही साथ दिली.


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १७ : येथील हिराचंद नेमचंद वाचनालयाचा १६५ वा वर्धापन दिन  संगीत सभेने पार पडला. या संगीत सुमिरनात श्रोत्यांची समाधी लागली. एकाहून एक सरस अशा बंदिशी, भजन आणि शास्त्रीय गायनात श्रोते तल्लीन झाले. तब्बल अडीच तास चाललेल्या या तालासुराच्या वातावरणात श्रोते तल्लीन झाले.
सुयोग कुंडलीकर यांची संकल्पना असलेल्या या संगीत सभेत आरती ठाकूर आणि डॉ. रेवती कामत यांचे गायन झाले. ‘परब्रह्म अनंतम् गणेशम् भजे’ या दृत लयीतील भजनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. दोन्ही गायिकांनी आपल्या कसदार आवाजात प्रारंभ केलेली ही मैफील उत्तरोत्तर खुलत गेली. या ईशस्तवनानंतर ‘नाद सूर भेद अपरंपार’ ही भैरव रागातील झपतालातील बंदिशी झाली. बंदिशीनंतर याच रागातील एकतालातील तराणा झाला. यातून दोन्ही गायिकांनी आपल्या शैलीदार गायनाचा प्रत्यय घडविला. लयकारी, आलाप यांचा संगम असलेल्या या बंदिशीतून भरत कामत यांच्या कसदार तबलावादनाचाही प्रत्यय रसिकांना आला. त्यानंतर रेवती कामत यांनी किरवानी रागातील ‘सुमिरन करो मोरे मन’ ही बंदिशी सादर केली. किरवानीचे स्वर मनात रुंजी घालत असतानाच आरती ठाकूर यांनी चारुकेशी रागातील ‘सुमिरन बिन गोता खायेगा’ हा संत कबीरांचा मध्य लयीतील दोहा ऐकविला. 
त्यानंतर दृत लयीतील चार बंदिशींची मेजवानी रसिकांना मिळाली. केदार, बागेश्री, कलावती आणि चंद्रकंस या रागातील बंदिशी आणि प्रत्येक रागानुरूप सुयोग कुंडलीकर यांच्या संवादिनीची मोहक साथ या टप्प्यात रंग भरून गेली. बहिणाबार्इंची ओवी आणि संत तुकारामांचा ‘आवडे हे रूप गोजीरे सगुण’ हा अभंगही अंतर्मनाला सुखावून गेला.
बंदिशीनंतर मैफिलीला भजनांचा रंग चढला. प्रारंभी डॉ. रेवती कामत यांनी मारुबिहाग रागातील ‘करो रे मन श्यामरूप रसध्यान’ हे भजन सादर केले. केहरवा तालात रंगलेल्या या भजनाच्या शेवटच्या कडव्यानंतर ताल कायम राखत आरती ठाकूर यांनी पटदीप रागातील ‘मोहे लागी लगन गुरू चरणन की’ हे भजन सादर केले. ते संपताच रेवती कामत यांनी चंद्रकंस रागातील ‘राम गावा राम घ्यावा’ हे भजन ऐकविले. भजनांच्या या शुंखलेत शेवटी किरवानी रागातील ‘वेगी या हो मां भवानी’ या भजनातून आरती ठाकूर यांनी आर्त साद घातली. शेवटी संत रामदास आणि संत तुकारामांच्या भैरवीतील रचना सादर करून ‘माझे सर्व जावो, नाम तुझे राहो’ या भैरवीच्या स्वरांनी या मैफिलीची सांगता झाली. ‘विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग विठ्ठल’ या गजराला श्रोत्यांनीही साथ दिली.
प्रारंभी चारही कलावंतांचे वाचनालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला संगीत रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Web Title: Solapur's Sushrudya Sammelan on the occasion of Anniversary of Hira Chand Nimchand Library

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.