‘स्मार्ट सिटी’तून सुशोभीकरणाला हातभार; वंचित हद्दवाढ भागाला मिळाला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 12:56 PM2019-05-02T12:56:10+5:302019-05-02T12:57:06+5:30

सोलापूर महानगरपालिकेचा वर्धापन दिन; शहराचे रूप बदलत आहे, भविष्याचे नियोजन गरजेचे

'Smart City' helps in beautification; Support for disadvantaged areas | ‘स्मार्ट सिटी’तून सुशोभीकरणाला हातभार; वंचित हद्दवाढ भागाला मिळाला आधार

‘स्मार्ट सिटी’तून सुशोभीकरणाला हातभार; वंचित हद्दवाढ भागाला मिळाला आधार

Next
ठळक मुद्देमहापालिका आर्थिक अडचणीत असली तरी केंद्र शासनाच्या विविध योजना आणि स्मार्ट सिटी योजनेतून तिला बळ मिळालेनगरसेवक विकास निधीपासून वंचित असले तरी शहरात एक हजार कोटी रुपयांची पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे सुरू आहेत

राकेश कदम

सोलापूर : सोलापूर महापालिकेचा आज ५६ वा वर्धापन दिन. आज महापालिका आर्थिक अडचणीत असली तरी केंद्र शासनाच्या विविध योजना आणि स्मार्ट सिटी योजनेतून तिला बळ मिळाले. नगरसेवक विकास निधीपासून वंचित असले तरी शहरात एक हजार कोटी रुपयांची पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे सुरू आहेत. भविष्यात पाणीपुरवठा, विभागीय कार्यालयांमधील ढिसाळ कारभार, आरक्षित जमिनींवरील अतिक्रमण आदी विषयांवर विशेष काम करणे अपेक्षित आहे. 

महापालिकेची स्थापना १ मे १९६४ रोजी झाली. तीन वेळा महापालिकेची हद्दवाढ झाली. शहर झपाट्याने विस्तारत आहे. सध्या महापालिका आर्थिक संकटात असून, कर्मचाºयांच्या पगाराचा प्रश्न ऐरणीवर येतो आहे. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च वाढत आहे. स्मार्ट सिटी योजनेतून ७५० कोटी रुपये मिळाले आहेत. गेली १५ वर्षे हद्दवाढ भागात भुयारी गटार, पाणीपुरवठा, दिवाबत्तीच्या समस्यांवरुन ओरड सुरू होती. अमृत योजना आणि स्मार्ट सिटी योजनेतून हद्दवाढ भागात भुयारी गटार योजनेची कामे सुरू झाली आहेत.

पथदिव्यांवरील जुने दिवे बदलून एलईडी दिवे बसविण्यात येत आहेत. स्मार्ट सिटी योजनेतून हद्दवाढ भागात नव्याने पोल आणि एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत. गावठाण भागात नव्याने भुयारी गटार आणि भूमिगत वायरिंगचे काम सुरू आहे. हुतात्मा बाग, खंदक बाग, उद्यान विभागाची बाग या बागांचा कायापालट करण्यात आला आहे. होम मैदान आणि रंगभवन चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले असून, हे दोन्ही परिसर आता सोलापूरकरांसाठी विरंगुळ्याचे परिसर ठरले आहेत. प्रशासनाने डिजिटल कामाची कास धरली आहे. विविध करांचे डिजिटल पेमेंट, बांधकाम विभागात आॅनलाईन परवान्याची प्रक्रिया सुरू आहे. 

महापालिकेची वाटचाल 
- १८५० मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा मंजूर झाला. तत्कालीन जिल्हाधिकारी थॉमस चार्ल्स लॉफमन यांच्या प्रयत्नाने १ आॅगस्ट १८५२ मध्ये म्युनिसिपालिटीची स्थापना झाली. पहिल्या बोर्डाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाºयांना नेमण्यात आले. १ मे १९६४ साली सोलापूर नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झाले. ही महाराष्ट्रातील चौथी महापालिका होती. महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक १९६९ साली झाली. त्यावेळी ६५ वॉर्ड होते.

१९७८ साली पहिली हद्दवाढ होऊन महापालिकेचे क्षेत्र २५.३३ चौ.कि.मी. झाले. एक एप्रिल १९८९ रोजी दुसरी हद्दवाढ होऊन महापालिकेचे क्षेत्र ३३.३ चौ.कि.मी. झाले. १९९२ मध्ये नवीन वॉर्डरचना झाली. ८७ वॉर्ड निश्चित झाले. ५ मे १९९२ रोजी झालेल्या हद्दवाढीमध्ये ११ गावांचा शहर हद्दीत समावेश झाला. या हद्दवाढीनंतर १९९७ मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली. यावेळी वॉर्डरचना करण्यात आली. यात ९० वॉर्ड करण्यात आले. २००२ मध्ये ९८ वॉर्ड आणि पाच स्वीकृत सदस्य होते. सध्या २६ प्रभाग असून १०२ नगरसेवक आहेत. पाच स्वीकृत नगरसेवक आहेत. 

यावर आणखी काम अपेक्षित 

  • - अनियमित पाणीपुरवठा ही शहराची प्रमुख समस्या आहे. नव्याने उजनी ते सोलापूर समांतर पाईपलाईन प्रस्तावित करण्यात आली आहे. ही योजनाही आर्थिक संकटात आहे. हे संकट दूर व्हायला हवे. 
  • - स्वच्छ भारत मिशन आणि स्मार्ट सिटी योजनेतून घनकचरा व्यवस्थापनाचे चांगले काम सुरू आहे. मात्र शहरात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर पडलेला कचरा उचलला जात नाही. घंटागाड्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे.
  • - महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वसामान्यांना चांगल्या सुविधा मिळतात. मात्र आरोग्य केंद्र परिसराला पालिकेने भंगाराचे रुप दिले आहे. आरोग्य केंद्राचा परिसर चांगला करणे गरजेचे आहे. 
  • - अनेक आरक्षित जमिनींचे संपादन झालेले नाही. त्यामुळे या जागा लाटण्याचे काम शहरातील राजकीय मंडळी करीत आहेत. भविष्यातील गरज ओळखून काही महत्त्वाच्या आरक्षणांचे विषय मार्गी लावण्याची गरज आहे. 

Web Title: 'Smart City' helps in beautification; Support for disadvantaged areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.