साधेपणातलं पावित्र्य ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:28 PM2019-05-25T12:28:40+5:302019-05-25T12:28:44+5:30

पूर्व भागातल्या टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनचा हॉल महिला, पुरुष आणि मुलांनी खचाखच भरलेला? सगळ्यांच्या नजरा उत्सुकतेनं भरलेल्या. एकूण वातावरण भारलेलं ...

Purity of simplicity! | साधेपणातलं पावित्र्य ! 

साधेपणातलं पावित्र्य ! 

Next

पूर्व भागातल्या टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनचा हॉल महिला, पुरुष आणि मुलांनी खचाखच भरलेला? सगळ्यांच्या नजरा उत्सुकतेनं भरलेल्या. एकूण वातावरण भारलेलं आणि भारावलेलं होतं. कारणही तसंच होतं. कुणाच्या वडिलांना, कुणाच्या आईला, पतीला, पत्नीला, भावाला, बहिणीला, आजोबांना अशा कुणाकुणाला पुरस्कार मिळणार होता. रोटरी क्लब आॅफ एमआयडीसीने हा सोहळा आयोजित केला होता. सगळे पुरस्कारार्थी व्यासपीठावर बसलेले. औत्सुक्य आणि बावरलेपण नजरेत मावत नव्हतं.  या सगळ्यांच्या आयुष्यातला हा पहिलाच पुरस्कार होता. कुणी टेक्स्टाईल कामगार होता, कुणी जॉबर होता. कुणी रुग्णालयातील रुग्णाचे कपडे धुणारा धोबी होता, कुणी वह्या बनवणाºया कारखान्यात कटिंग मास्तर म्हणून कामास होता. कुणी विडी कामगार महिला तर कुणी एस. टी. महामंडळात वाहक म्हणून कामास होता. ही सगळी अतिशय सामान्य कुटुंबातली मंडळी होती. काही जगावेगळं केलं असंही नव्हतं. पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन होती. ती म्हणजे दुर्दम्य इच्छाशक्ती! आपापल्या छोट्या छोट्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची वृत्ती! 
यातल्या प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा यासाठीच काम केलं. पुढे चालून आपल्याला रोटरीचा किंवा कुठलाही पुरस्कार मिळवायचा आहे म्हणून कोणी काम केलं नसेल, हे निश्चित! आपलं कुटुंब, मुलंबाळं, चांगली घडावीत, मोठी व्हावीत, आपल्या वाट्याला जे कष्ट, दु:ख आले ते मुलाच्या वाट्याला येऊ नये. त्यांचं भवितव्य छान घडावं. एवढाच सोपा विचार करत या लोकांनी आपली कुटुंबं घडवली. 

ललिता गोटीपामूल या विडी कामगार महिलेने मुलाला आय. ए. एस. पर्यंत शिक्षण देऊन मोठं केलं. विजयवाडा येथे त्याचे पोस्टिंग आहे. किसन नरोळे या माणसाने सलग ५२ वर्षे मार्कंडेय रुग्णालयात धोबी काम केलं, नागेश मेहेरकर या बस कंडक्टरने नोकरीच्या बरोबरीने सामाजिक कामात योगदान दिलं. अनिल सरडे या जॉबर म्हणून काम करणाºया माणसाने प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधनाचा विडा उचलला. आज पक्षी जितक्या वेगाने झाड बदलतात त्यापेक्षा जास्त वेगाने नोकºया बदलण्याच्या काळात सलग ३५ वर्षे एकाच कारखान्यात निष्ठेने काम करणारे दोघेजण होते. अशी प्रत्येकाची कहाणी वेगळी.

म्हटलं तर यात काही विशेष नाही, सगळीच माणसं पोटार्थी होती. याकडे एका वेगळ्या नजरेने पाहू तर लक्षात येईल की, या छोट्या माणसांनीच आपल्यापुरता अंधार दूर करण्याचा प्रयत्न केलाय. यांच्याकडे सचोटी आहे, जिद्द आहे, आपल्या कामाप्रती निष्ठा आहे. 
आपल्या ऐपतीएवढाच स्वाभीमान आहे. कधी कुणी आपली दखल घेईल, सत्कार वगैरे करेल अशी त्यांची अपेक्षाही नव्हती. साधं, सरळ आयुष्य जगणारी ही मंडळी होती. महागाई यांनाही सतावते, वाहतुकीचा त्रास यांनाही होतो, पाण्यासाठी वणवण यांनाही करावी लागते. वीजपुरवठा यांच्याकडेही खंडित होतो. तुम्हा आम्हाला ज्या ज्या समस्यांनी ग्रासलंय त्या सर्व समस्या यांच्याकडेही आहेत.
साधेपणातलं पावित्र्य छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानण्याची वृत्ती, कुटुंबातल्या प्रत्येकाबद्दलची आपुलकी, निर्लेप जिव्हाळा, स्वत्व ही त्यांची बलस्थानं आहेत. यांनीच त्यांचं घर उभं केलं, माणसं उभी केली. जगण्याची उमेद निर्माण केली. नात्यातले बंध घट्ट केले. लालसा आणि हव्यासाला दूर ठेवूनही प्रगती करता येते हे दाखवून दिले. 

खरं म्हणजे ते दाखवण्यासाठीही त्यांनी काही केलं नाही. रोटरीच्या पुरस्काराने त्यावर प्रकाशझोत टाकला गेला, एवढंच! अशी माणसं एवढीच आहेत का? तर बिलकूल नाहीत! पावलोपावली दिसतील. ती पाहता आली पाहिजेत. शोधता आली पाहिजेत म्हणजे इतरांच्याही वाटा उजळून जातील. 
- माधव देशपांडे
(लेखक उद्योग समूहात जनसंपर्क विभागाचे व्यवस्थापक आहेत) 

Web Title: Purity of simplicity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.