पोलीस आई रे...भागो भागो...म्हणत मद्यपींनी काढला पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:39 PM2019-07-17T12:39:37+5:302019-07-17T12:43:40+5:30

सोलापूर शहर पोलीस गुन्हे शाखेची कारवाई : शहरातील खुल्या बारवर टाकल्या धाडी; गाडीवाल्यांची पळताभुई झाली थोडी

Police said, "Run away ... Run away from drunken wine." | पोलीस आई रे...भागो भागो...म्हणत मद्यपींनी काढला पळ

पोलीस आई रे...भागो भागो...म्हणत मद्यपींनी काढला पळ

Next
ठळक मुद्देशहरातील काही भागात सर्रास दररोज उघड्या मैदानात, बागेत आणि रस्त्याच्या कडेला दारू पिणाºयाचे प्रमाण वाढले या प्रकाराला आळा घालण्यासाठी सोलापूर शहर पोलीस गुन्हे शाखेच्या वतीने धाडी घालण्याची मोहीम हाती घेतलीबंधित विक्रेत्यांना ताकीद करण्यात आली आहे. ही कारवाई यापुढेही चालू राहणार आहे - पोलीस

सोलापूर : दोन ते आठ-दहा जणांचा ग्रुप..., निवांत गप्पा मारत मद्य पिण्याचा आनंद घेत होते. तोंडी लावण्यासाठी चमचमीत खाद्य पदार्थ, मी असं केलं त्याला आता बघून घेतो..., मी कोण आहे अजून माहीत नाही अशा मोठ्या गप्पा मारत रंगलेल्या मैफिलीचे लक्ष अचानक पोलिसांच्या गाडीकडे गेले. मैफिलीतील एकजण अचानक ओरडतो पोलीस आई रे...भागो भागो...म्हणत सर्व मद्यपींनी पळ काढण्यास सुरुवात केली. हा प्रकार होता शहरातील काही ओपन बारच्या ठिकाणचा. 

शहरातील काही भागात सर्रास दररोज उघड्या मैदानात, बागेत आणि रस्त्याच्या कडेला दारू पिणाºयाचे प्रमाण वाढले आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी सोलापूर शहर पोलीस गुन्हे शाखेच्या वतीने धाडी घालण्याची मोहीम हाती घेतली होती. रात्री ९.४५ वाजता शांती चौक पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या गाळ्यांमध्ये मिनी बार सुरू होते. समोरच असलेल्या वाईन शॉपमधून दारू आणायची आणि गाळ्यातील छोट्या जागेत बसून ती प्यायची. दुकानदाराकडून खाण्यासाठी चमचमीत पदार्थ, सोडा, कोल्ड्रिंक्स विकत घेऊन ही मंडळी निवांतपणे मद्य पिण्याचा आनंद घेत होते. 

आपल्या विश्वात दंग झालेल्या या मंडळींना पोलिसांची गाडी दिसली. दारूने भरलेले ग्लास व खाण्याचे पदार्थ जागेवरच टाकून तेथील मद्यपींनी धूम ठोकली. पोलिसांनी काठीचा धाक दाखवत मिनी बारवाल्यांना दुकाने बंद करण्याची ताकीद दिली. तेथून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आपला मोर्चा १०.१५ वाजता गुरूनानक चौकातील साधू वासवानी उद्यानाकडे वळवला. बागेत अंधाराच्या ठिकाणी मद्यपी मंडळी निवांतपणे दारू पित होती. पोलिसांना पाहताच तेथील लोकांनी पोलीस आई रे भागो...भागो...असं म्हणत पळ काढला. सोबत आणलेल्या मोटरसायकलीही जागेवर टाकून रस्ता दिसेल त्या दिशेने ही मंडळी पळून गेली. ही मोहीम पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त (गुन्हे) बापू बांगर, सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. 

खाद्य पदार्थ विक्री करणारे गाडी मालकही गेले पळून
- रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास कंबर तलावाशेजारी असलेल्या राणी लक्ष्मीबाई उद्यानाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात असा खुला बार भरला होता. पोलिसांना बघताच काही मंडळी अंधार असलेल्या वनविभागाच्या दिशेने पळाली, काही मंडळी उद्यानात पळाली. काहीजण विजापूर रोडच्या दिशेने पळून गेले. ही मंडळी पळून गेली मात्र यांना सोडा, कोल्ड्रिंक्स व चमचमीत पदार्थ विकणारे चायनीज गाडी, भजी गाडी, सोडा गाडी आदींच्या मालकांनीही आपले दुकान आहे तसे टाकून पळ काढला. 

शहरात खुल्या मैदानात, बागेत अशा प्रकारचे खुले बार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. माहितीवरून धाड मोहीम हाती घेण्यात आली, संबंधित विक्रेत्यांना ताकीद करण्यात आली आहे. ही कारवाई यापुढेही चालू राहणार आहे. 
- बाळासाहेब शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा. 

Web Title: Police said, "Run away ... Run away from drunken wine."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.