सोलापूरातील एनटीपीसी, विमानतळाबाबत खासदारांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे ! सुशिलकुमार शिंदे यांची भाजपावर टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 01:00 PM2018-07-19T13:00:49+5:302018-07-19T13:03:17+5:30

NTPC in Solapur, MPs' statement about the airport is irresponsible! Sushilkumar Shinde's hinges on BJP | सोलापूरातील एनटीपीसी, विमानतळाबाबत खासदारांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे ! सुशिलकुमार शिंदे यांची भाजपावर टिका

सोलापूरातील एनटीपीसी, विमानतळाबाबत खासदारांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे ! सुशिलकुमार शिंदे यांची भाजपावर टिका

Next
ठळक मुद्देविद्यमान सरकारची निष्क्रियता स्पष्ट - सुशीलकुमार शिंदे बोरामणी येथे ५४९.३४ हेक्टर जमीन राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने संपादित - सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्र सरकारने ४९ टक्के गुंतवणुकीचा हा करार - सुशीलकुमार शिंदे

सोलापूर : बोरामणीचे विमानतळ होणारच नाही आणि फताटेवाडी येथील एनटीपीसीच्या ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची गरज नव्हती, असे वक्तव्य लोकप्रतिनिधींना शोभत नाही. त्यातून विद्यमान सरकारची निष्क्रियता स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

सोलापूरचे भाजपा खासदार शरद बनसोडे यांनी अलीकडेच बोरामणी येथील नियोजित विमानतळ होणारच नाही तसेच फताटेवाडी येथील एनटीपीसीच्या प्रकल्पाची गरज नव्हती, असे विधान केले होते. त्यासंदर्भात बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, असे वक्तव्य आमदार, खासदार पदावर असणाºया लोकप्रतिनिधींना अशोभनीय आहे.

खरं म्हणजे त्यांनी या दोन्ही प्रकल्पांची माहिती घ्यायला हवी होती. हे प्रकल्प त्यांना पूर्ण करता आले नाहीत, हे त्यांच्या सरकारचे अपयश आहे. ते झाकण्यासाठीच त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले असावे, असा टोमणा त्यांनी मारला. होटगी रोडवरील विमानतळाचे क्षेत्रफळ अतिशय कमी आहे. जागा अपुरी असल्याने फारतर छोटी विमाने या विमानतळावर उतरू शकत होती. वाढते शहर आणि सध्याच्या होटगी रोडवरील विमानतळासमोरील अडचणी जाणून नवीन विमानतळाची गरज आहे. त्यामुळेच  बोरामणी येथे विमानतळ उभारण्यासाठी मंजुरी घ्यावी लागली. सोलापूरच्या विकासात दळणवळणाचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने या नवीन विमानतळाला मंजुरी दिली आहे. 

बोरामणी येथे ५४९.३४ हेक्टर जमीन राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने संपादित केली. प्राधिकरणाने महाराष्ट्र सरकारशी याबाबतचा करार केला आहे. ५१ टक्के शेअर्स प्राधिकरणाचे तर महाराष्ट्र सरकारने ४९ टक्के गुंतवणुकीचा हा करार आहे. विमानतळ होणार नसेल तर एवढी मोठी रक्कम सरकारने का गुंतवली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खरं म्हणजे आत्तापर्यंत विमानतळ पूर्णत्वास जायला हवे होते; परंतु तसे काही घडले नाही. पाठपुरावा नसल्याने विमानतळाचे घोडे अडले आहे, अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली.

केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी अलीकडेच विमानतळ प्राधिकरणाला पाठवलेल्या पत्रात बोरामणीचे विमानतळ हैदराबाद, बेंगलोरच्या धरतीवर विकसित करण्याचा मानस व्यक्त केला आहे. याकडे शिंदे यांनी खा. शरद बनसोडे यांचे लक्ष वेधले. प्रकल्प पुढे नेण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आवश्यक आहे, परंतु विकासकामांची आस नसेल तर विकास कसा होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

फताटेवाडीच्या एनटीपीसी प्रकल्पाबाबतही खा. बनसोडे यांनी केलेले विधान हास्यास्पद असल्याचा टोला सुशीलकुमार शिंदे यांनी लगावला.  ते म्हणाले, एनटीपीसीचा प्रकल्प गरजेचा नाही, असे त्यांचे मत असेल, परंतु वीज निर्मिती प्रकल्प उभारणे ही देशाची गरज आहे.

या प्रकल्पात निर्माण केलेली वीज देशाची गरज भागवते आणि महाराष्ट्रालाही वीज पुरवण्यात येणार आहे. याचा उपयोग नाही, असे कसे म्हणता येईल? आधी एनटीपीसीमुळे तापमान वाढणार, प्रदूषण होणार, अशाही चर्चा रंगल्या होत्या. पण त्यात काहीच तथ्य नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे, असा युक्तिवादही शिंदे यांनी केला. सुपर क्रिटीकल यंत्रसामुग्री वापरल्याने हा प्रकल्प दर्जेदार आणि प्रदूषणमुक्त असल्याचा दावा त्यांनी केला

Web Title: NTPC in Solapur, MPs' statement about the airport is irresponsible! Sushilkumar Shinde's hinges on BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.