मॉक ड्रील;  सोलापूर रेल्वे स्टेशनवर अतिरेकी... सुरक्षा रक्षकाच्या ताफ्याने पळापळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:23 PM2019-03-30T12:23:14+5:302019-03-30T12:27:22+5:30

निवडणुकीच्या काळात घातपात कारवाया, शांतता, सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस आयुक्तालय प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

Mock drill; Security at Solapur Railway Station ... | मॉक ड्रील;  सोलापूर रेल्वे स्टेशनवर अतिरेकी... सुरक्षा रक्षकाच्या ताफ्याने पळापळ !

मॉक ड्रील;  सोलापूर रेल्वे स्टेशनवर अतिरेकी... सुरक्षा रक्षकाच्या ताफ्याने पळापळ !

Next
ठळक मुद्देनिवडणुकीच्या काळात घातपात कारवाया, शांतता, सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस आयुक्तालय प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.एखाद्या गंभीर घटनेच्या ठिकाणी पोलीस दल किती तत्पर आहे याचा मागोवा घेण्याच्या दृष्टीने अशी प्रात्यक्षिके

सोलापूर: सायंकाळची सव्वापाचची वेळ... रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची लगबग.. अचानक स्टेशनवरील महिला आरक्षण कक्षामध्ये तीन अतिरेकी घुसल्याची खबर मिळाली अन्  एकापाठोपाठ सायरन वाजवत अ‍ॅम्ब्युलन्ससह पोलिसांचा ताफा दाखल झाला. गर्दीला पांगवत रायफलधारी क्यूआरटी पथकाकडून डॉग पथकाच्या मदतीने दोन अतिरेक्यांना कंठस्नान देताना एक पळून गेला. या धुमश्चक्रीत एक पोलीस शहीद झाला. तब्बल एक तास ही शोधमोहीम सुरु होती. श्वास रोखून जमलेल्या प्रवाशांना अखेर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्यासाठीचे प्रात्यक्षिक असल्याचे जाहीर केले. यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. 

निवडणुकीच्या काळात घातपात कारवाया, शांतता, सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस आयुक्तालय प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. एखाद्या गंभीर घटनेच्या ठिकाणी पोलीस दल किती तत्पर आहे याचा मागोवा घेण्याच्या दृष्टीने अशी प्रात्यक्षिके विविध ठिकाणी राबवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. 

ही मोहीम पार पडेपर्यंत गोपनीय ठेवण्यात आली. सायंकाळी पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षामधील दूरध्वनी खणखणला. तिकडून रेल्वे स्टेशनवरील महिला आरक्षण कक्षात अतिरेकी घुसल्याची खबर मिळताच. तातडीने सदर बझार पोलीस ठाण्यासह विविध पथकांना खबर दिली. तातडीने शीघ्र कृती दलाचे (क्यूआरटी) पथक स्टेशनवर दाखल झाले. सोबत डॉग पथकाचेही आगमन झाले. आरक्षण कक्षात महिला प्रवाशांना बाहेर काढून डॉग पथकाच्या सहाय्याने दोन अतिरेक्यांचा मागोवा घेऊन त्यांना मारण्यात यश आले. एकाला ताब्यात घेतले. या झटापटीत शीघ्र कृती दलाच्या एक जवानाला जीव गमवावा लागला. सायंकाळी ५.१५ ते ६.१५ अशी एक तासानंतर ही मोहीम फत्ते झाली. 

तासभर संबंध स्टेशनवर एकच घबराट पसरली होती. बाहेरच्या बाजूला असंख्य प्रवासी वर्ग श्वास रोखून हा सारा प्रकार पाहत होते. मोहीम फत्ते झाल्यानंतर हा आपत्ती व्यवस्थापनाचा भाग होता असे जाहीर केल्यानंतर सबंध गर्दी पांगली. या मोहिमेत सदर बझार पोलीस ठाण्याचा ताफा, शीघ्र कृती दलाचे पथक, सहा. पोलीस आयुक्त वैशाली शिंदे, रुपाली दरेकर, रेल्वे पोलीस ठाण्याचे अधिकारी, पोलीस निरीक्षक सय्यद,  विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बडे, अ‍ॅम्ब्युलन्सचा ताफा या सर्वांनी या मोहिमेसाठी परिश्रम घेतले.

दक्षता जनतेच्या सुरक्षेची..
- सध्या देशभरात अतिरेकी कारवायांच्या घटना घडत असताना शहरभर शांतता, सुव्यवस्थेसाठी सर्वत्र ‘मॉक ड्रील’ मोहीम राबवण्यात येते. एखाद्या गंभीर घटनेला सामोरे जाण्याच्या दृष्टीने घ्यावयाची खबरदारी अशा मोहिमांमधून राबवण्यात येते. यातून प्रशासकीय यंत्रणा कितपत तत्पर आहे. यात काय उणिवा राहिल्या याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. पुढील काळात त्या होणार नाहीत याची दक्षता घेण्यात येते. जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रात्यक्षिके घेण्यात येत असल्याचे विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी स्पष्ट केले.

Web Title: Mock drill; Security at Solapur Railway Station ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.