सोलापूरात स्मार्ट सिटीच्या कामाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 02:54 PM2017-09-23T14:54:52+5:302017-09-23T14:57:33+5:30

सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे रंगभवन सभागृहात आयोजित स्मार्ट सिटीअंतर्गत विविध प्रकल्पांचा शुभारंभ व स्मार्ट रोडच्या ई-भूमिपूजनप्रसंगी राजकीय टोलेबाजी रंगली.

Launch of Smart City work in Solapur | सोलापूरात स्मार्ट सिटीच्या कामाचा शुभारंभ

सोलापूरात स्मार्ट सिटीच्या कामाचा शुभारंभ

Next
ठळक मुद्देस्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना विलंबस्मार्ट रस्त्याचे टेंडर प्रतिसादाअभावी तीनवेळा काढावे लागलेपाणी प्रकल्पासाठी ३७४ कोटींची तरतूददोन वर्षांच्या कारकिर्दीत स्मार्ट सिटीचे जास्तीत जास्त प्रकल्प मार्गी लावण्यावर भर राहील : महापौर शोभा बनशेट्टी


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २३ : स्मार्ट सिटीची कामे रेंगाळली आहेत. लोकात फिरताना आम्हाला याबाबत तोंड द्यावे लागते. स्मार्ट सिटीचे पैसे शिल्लक आहेत, आता उर्वरित कामे वेगाने मार्गी लावा, अशी अपेक्षा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी शुक्रवारी स्मार्ट सिटीच्या प्रकल्प शुभारंभप्रसंगी व्यक्त केली. तर, याच व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी चांगल्या कामाला वेळ लागतो. तुम्ही पूर्वेतिहास पाहा, चारी दिशेला फलक लागले पण कामे झाली नाहीत. स्मार्ट प्रकल्प साकारण्यासाठी आराखडा, टेंडर प्रक्रियेला वेळ लागतो. आता सोलापुरात सर्व अधिकारी चांगले आहेत. त्यामुळे कायापालट होईल, असा विश्वास सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला. 
सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे रंगभवन सभागृहात आयोजित स्मार्ट सिटीअंतर्गत विविध प्रकल्पांचा शुभारंभ व स्मार्ट रोडच्या ई-भूमिपूजनप्रसंगी ही राजकीय टोलेबाजी रंगली. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते रिमोटद्वारे या कामांचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी महापौर शोभा बनशेट्टी, खासदार शरद बनसोडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, सभागृहनेते सुरेश पाटील, स्थायी समिती सभापती संजय कोळी, परिवहन सभापती दैदीप्य वडापूरकर यांच्यासह सर्व गटनेते, सदस्य उपस्थित होते. 
प्रारंभी प्रास्ताविकात कंपनीचे सीईओ तथा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना विलंब झाल्याचे नमूद केले. अडचणींवर मात करून पुढे जात आहोत. स्मार्ट रस्त्याचे टेंडर प्रतिसादाअभावी तीनवेळा काढावे लागले. स्मार्ट सिटीत ४६ प्रकल्प असून, आता प्राधान्यक्रमाचे प्रकल्प हाती घेण्यात येतील. त्यात पाणी प्रकल्पासाठी ३७४ कोटींची तरतूद असून, यातून एबीडी एरियाबरोबरच इतर भागातील समस्या सोडविली जाईल. आॅक्टोबरमध्ये होणाºया संचालक मंडळाच्या बैठकीत पाणी व कचरा संकलनाच्या प्रकल्पावर निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. पोलीस आयुक्त तांबडे यांनी आपल्या भाषणात सोलापूरची स्मार्ट सिटीत निवड झाली याची दीड वर्षापासून चर्चा फार झाली; पण काहीच दिसत नव्हते. आता प्रकल्प सुरू होत आहे ही बाब चांगली आहे. पोलीस खाते स्मार्ट होत आहे. त्यामुळे नागरिकांनाही आता स्मार्ट होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. महापौर शोभा बनशेट्टी यांनी आपल्या दोन वर्षांच्या कारकिर्दीत स्मार्ट सिटीचे जास्तीत जास्त प्रकल्प मार्गी लावण्यावर भर राहील, असे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शहरातील अनेक विकासकामे मार्गी लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. खासदार शरद बनसोडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १०० स्मार्ट सिटीची संकल्पना मांडल्यावर मी काही सोलापूरच्या बाबतीत असे घडेल वाटले नव्हते. पण तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी विविध प्रकल्प अहवाल तयार केल्याने पहिल्या २० शहरात सोलापूर नवव्या क्रमांकाने यादीत आले, याचा अभिमान वाटला. नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देणारे प्रकल्प पहिल्यांदा मार्गी लावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन अर्पिता खडकीकर यांनी केले तर आभार कंपनीचे संचालक चंद्रकांत पाटील यांनी मानले.
--------------------------
बापू तुम्ही जरा थांबा...
मनपातील भाजप नगरसेवकांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटीच्या प्रकल्प शुभारंभाच्या निमित्ताने पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख एकाच व्यासपीठावर एकत्र आले. त्यामुळे हे दोघे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख हे भाषण करण्यासाठी उठल्यावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी त्यांना मध्येच थांबविले. बापू तुम्ही जरा थांबा, अगोदर मी बोलतो, असे म्हणून पालकमंत्री माईकच्या दिशेने निघाले. मालकाकडे स्मितहास्य व प्रश्नार्थक मुद्रेने पाहत बापू खाली बसले. दोनच मिनिटात त्यांनी आपले मनोगत संपविले. दोघांनीही नगरसेवक व नागरिकांना स्मार्ट होण्याची गरज असल्याचे नमूद केले. 
--------------------
हिप्परगा, होटगी तलावांचा विकास
खासदार शरद बनसोडे यांनी सोलापूरचे मार्केटिंग करा, पर्यटनासाठी आलेल्या लोकांना विरंगुळा म्हणून हिप्परगा तलाव परिसर विकसित करा, अशी सूचना केली. हाच धागा पकडून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी हिप्परगा तलाव परिसरात एमटीडीसीच्या माध्यमातून विकसित करण्याबाबत प्रस्ताव दिल्याचे सांगितले. त्याचबरोबर होटगी तलाव परिसर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल विकसित करण्यात येणार आहे. पुस्तकाचे गाव म्हणून भिलार चर्चेत येते, मग देशातील पहिला मराठी शिलालेख आढळलेले हत्तरसंग कुडल गाव मागे का, असा सवाल देशमुख यांनी व्यक्त केला. 

Web Title: Launch of Smart City work in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.