देगाव प्रकल्पातील मलनिस्सारणातून वीजनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 08:15 AM2019-04-29T08:15:15+5:302019-04-29T08:19:20+5:30

राज्यातील वेगळा प्रयोग : सांडपाण्यावर प्रक्रिया करत साधला आर्थिक फायदा

Electricity from the drainage system of the godavari project | देगाव प्रकल्पातील मलनिस्सारणातून वीजनिर्मिती

देगाव प्रकल्पातील मलनिस्सारणातून वीजनिर्मिती

googlenewsNext
ठळक मुद्देदीड वर्षात वीज बिलात १३ लाख रुपयांची बचतमहापालिकेच्या देगाव येथील मलनिस्सारण केंद्रात मिथेन वायूपासून वीजनिर्मिती केली जात आहेसध्या उन्हाळ्याच्या दिवसात या प्रकल्पात दररोज सरासरी २५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होते

राकेश कदम

सोलापूर : महापालिकेच्या देगाव येथील मलनिस्सारण केंद्रात मिथेन वायूपासून वीजनिर्मिती केली जात आहे. यामुळे गेल्या दीड वर्षात संपूर्ण प्रकल्पाच्या वीज बिलात १३ ते १४ लाख रुपयांची बचत झाली आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालला तर वर्षाला २० लाख रुपयांचे वीज बिल कमी येईल, असा दावाही मनपा प्रशासनाने केला आहे. 

देगाव येथील मलनिस्सारण प्रकल्प आॅगस्ट २०१७ मध्ये कार्यान्वित झाला. तीन वर्षांसाठी तो खासगी कंपनीला चालविण्यासाठी देण्यात आला आहे. महापालिकेचे देगावसह प्रतापनगर, कुमठे या ठिकाणी मलनिस्सारण प्रकल्प आहेत. देगाव हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. इतर दोन प्रकल्पांतील शुध्द झालेले पाणी या प्रकल्पात आणण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पाला दरमहा दोन लाख युनिट वीज लागते. त्यातील ३०० ते ४०० युनिट वीज मिथेन वायूपासून मिळते. यावर २५ एमएलडीचा पंपहाऊस, स्ट्रीट लाईट्स, एअर ब्लोअर वापरले जातात. 

सध्या उन्हाळ्याच्या दिवसात या प्रकल्पात दररोज सरासरी २५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होते. उन्हाळा वगळता इतर हंगामात सरासरी ३५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होत असल्याचे मनपाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहायक अभियंता संतोष यलगुलवार यांनी सांगितले. मिथेन वायूपासून दररोज ३०० ते ४०० युनिट वीज निर्मिती होते. यामुळे प्रकल्पाच्या वीज बिलात दरमहा ७२ ते ८० हजार रुपयांची बचत होत आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालला तर दर महिन्याला २६ हजार युनिट वीजनिर्मिती होईल. प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालला तर वीज बिलात वर्षाला २० लाख रुपयांची बचत होईल, असा दावाही महापालिका प्रशासनाने केला आहे. 

कशी होते प्रक्रिया...
- सहायक अभियंता संतोष यलगुलवार म्हणाले, सांडपाण्यावरील पहिल्या प्रक्रियेत कचरा, प्लास्टिक बॅग, वाळूचे कण अशा विविध प्रकारच्या वस्तू विलग होतात. त्यानंतर सांडपाणी काँबीट्रीट युनिटमध्ये येते. तिथून हे पाणी हवाबंद टाकीमध्ये (अ‍ॅनारॉबिक डायझेशन) घेतले जाते. या प्रक्रियेत मिथेन, कार्बनडाय आॅक्साईड, सल्फरडाय आॅक्साईड, अमोनिया, आर्द्रता आदी घटक तयार होतात. या पाण्याचे विघटन झाल्यानंतर तयार झालेला स्लज (घाण चिखल) टाकीच्या तळाला बसतो. यातूनच कच्चा मिथेन वायू तयार होतो. हा कच्चा मिथेन शुध्द करण्यासाठी पुन्हा स्क्रबर टँकमध्ये घेतला जातो. स्क्रबरसाठी पाण्याचे दोन टँक वापरले जातात. आयर्न मीडीयासाठी चार टँक वापरण्यात आले आहेत. स्क्रबर करीत असताना त्यातून सल्फरडाय आॅक्साईड आणि कार्बनडाय आॅक्साईड हे पाण्यासोबत आणि आयर्न मीडीयासोबत निघून जातात. या टाकीतील शुध्द मिथेन वायू पुढे दोन टाक्यांमध्ये साठविला जातो. हा जमा झालेला गॅस जनरेटरला इंधन म्हणून वापरला जातो. त्यातून जनरेटर सेट कार्यान्वित होतात.  

सांडपाण्यापासून वीजनिर्मिती हा राज्यातील वेगळा प्रयोग आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालला तर प्रकल्पाच्या वीजबिलात सरासरी २० टक्के इतकी बचत होऊ शकते. शिवाय सांडपाण्याचा पुनर्वापर व्हावा असा महापालिकेचा प्रयत्न आहे. शुध्द झालेले पाणी बागा, झाडांना दिले जात आहे. पुढील काळात खासगी बांधकामांना पाणी देण्याचे धोरण आखले जात आहे. वीजनिर्मिती आणि पुनर्वापरातून महापालिकेचा आर्थिक फायद होईल. 
- सुनीता हिबारे, उपअभियंता, महापालिका

Web Title: Electricity from the drainage system of the godavari project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.