सोलापूरात निर्मलकुमार फडकुले राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण

By Appasaheb.dilip.patil | Published: July 29, 2017 12:00 PM2017-07-29T12:00:01+5:302017-07-29T12:00:07+5:30

Distribution of state-level award in Solapur, Nirmalkumar Phadkule | सोलापूरात निर्मलकुमार फडकुले राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण

सोलापूरात निर्मलकुमार फडकुले राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण

googlenewsNext


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २९  : भारत महासत्ता व्हावे, असे वाटते; पण अनेकांना चिरडणारी महासत्ता आम्हाला नको आहे. आज जगभरात हिंसाचार आहे, भीती आहे. या स्थितीत हा देश आर्थिक महासत्तापेक्षा आध्यात्मिक महासत्ता व्हावा, अशी अपेक्षा फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आज येथे व्यक्त केली.
शब्दप्रभू डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. फडकुले प्रतिष्ठानच्या वतीने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा साहित्यसेवा पुरस्काराने सन्मान झाला; तर जलसंधारण, स्वच्छतेची चळवळ राबविणारे डॉ़ अविनाश पोळ यांचा समाजसेवा पुरस्काराने गौरव करण्यात आला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष वात्रटिकाकार रामदास फुटाणे, सचिव बिपीनभाई पटेल, दत्ता गायकवाड, प्रा. विलास बेत, रविकिरण पोरे, बाबुराव मैंदर्गीकर, सुरेश पांढरे आदी मंचावर होते. प्रत्येकी पंचवीस हजार रूपये, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफल असे पुरस्कारांचे स्वरूप होते.
फादर दिब्रिटो म्हणाले, सहिष्णुता हा आपला स्वभावधर्म आहे आणि असहिष्णुता हा अपघात. भारत सकल धर्मांचे माहेरघर आहे. या देशात अनेक धर्म आले, रूजले आणि ते या भूमीशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे भारत सांस्कृतिक उंची गाठू शकला. बहुधर्मीय, बहुसंस्कृतीच्या वातावरणातच आपण वाढलो आहोत. हे वातावरण आपल्या अंगवळणी पडलेले आहे; पण आजकाल कोणत्याच देशाला सीमा राहिल्या नाहीत. त्यामुळे एकधर्मीय असलेल्या युरोपमध्ये अन्य धर्मीयांशी जुळवून घेताना अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. भारतात दोन टक्के ख्रिस्ती आहेत; पण त्यांना काही निराळे वाटत नाही. आमचे पूर्वज हिंदू होते, याचे मला भान आणि अभिमानही वाटतो. वैदिक धर्माकडून आम्हाला उच्च विचार मिळाले, बुध्दांची करूणा, शिखांचा भाईचारा, मुस्लिमांचा बंधुभाव या सर्व विचारांचा अमृतकलश म्हणजेच भारत आहे.
भारतात हिंसेचे गौरवीकरण का होत आहे; केवळ राजकीय हत्याच होत नाहीत; तर अनेक कारणाने माणसं मारली जात आहेत. तुमच्या ताटात, शीतपेटीमध्ये काय असावे झुंडी ठरवू लागल्या आहेत. या विचाराने भारत पुढे जाऊ शकणार नाही.  रेल्वेतून जाणाºया निष्पाप युवकाची हत्या केली जाते, हा हिंसाचार येतो कुठून? समाजाला उन्मादासाठी कुठून इंधन पुरविले जाते, याचा विचार व्हायला हवा. जेव्हा हिंसाचार ‘डीएनए’मध्ये शिरतो, तेव्हा सारे कठीण होते, असे सांगून सज्जन मंडळी स्वस्थ का राहतात? भारताच्या भव्य वृक्षाला रक्ताची पाने अन् फळे येत आहेत कारण वृक्षाच्या मुळाशीच रक्ताचे सिंचन होत आहे, असे फादर म्हणाले.
डॉ. पोळ यांनी जलसंवर्धन, ग्रामविकास आणि हागणदारीमुक्तीच्या कार्याचा प्रवास मोठ्या रंजकतेने सांगितला. ते म्हणाले की, या कामातून मला आनंद मिळतो. आज गावागावात समाज दुभंगलेला आहे. त्यामुळेच अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत; पण या सर्वच प्रश्नांची सोडवणूक एकटे सरकार करू शकत नाही. त्यामुळे समाज आणि सरकार एकत्र आले पाहिजे. आज समाजामध्ये जाऊन लोकांना एकत्र आणले जात नाही. सरकारच्या अनेक योजना आहेत; पण त्याबाबत जनजागरण होत नाही. त्यामुळेही अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. ज्या देशामध्ये व्यवस्थित ग्रामसभा भरू शकत नाहीत, तो देश महासत्ता कसा होणार? असा सवाल त्यांनी केला.
शिंदे यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. सत्तापालट झाल्यानंतर जे बदल होतात, त्यामध्ये होणाºया चुका सांगण्यासाठी समाजामध्ये फादर दिब्रिटोसारखे चिंतक असावे लागतात. त्यांनी केलेले समाजाचे चिंतन योग्य दिशा देणारे आहे. डॉ. पोळ हे सातारा भागातील आहेत. तेथेच क्रांतीवीर नाना पाटलांनी कार्य केले. डॉ. पोळ हेही समाजात विकासाची क्रांती करत आहेत. एका अर्थाने हे काम नाना पाटलांसारखेच आहे, असा गौरव शिंदे यांनी केला.

Web Title: Distribution of state-level award in Solapur, Nirmalkumar Phadkule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.