सोलापूर जिल्ह्याच्या दूध संकलनात ४४ हजार लिटरची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 10:54 AM2019-06-28T10:54:45+5:302019-06-28T10:56:05+5:30

दुष्काळाचा फटका; दूध संघाचे संकलन आले एक लाख लिटरच्या खाली

Decrease in milk procurement of Solapur district by 44 thousand liters | सोलापूर जिल्ह्याच्या दूध संकलनात ४४ हजार लिटरची घट

सोलापूर जिल्ह्याच्या दूध संकलनात ४४ हजार लिटरची घट

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्याचे संकलन मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या मे महिन्यात ४४ हजार लिटरने घटलेमागील वर्षी मे महिन्यात सहकारी व खासगी संघांचे प्रति दिन दूध संकलन १२ लाख ८६ हजार २१८ लिटर इतके होत होतेखासगी संघांचा दूध खरेदी दर प्रति लिटर २८-२९ रुपयांवर गेल्याने शेतकºयांनी खासगी संघाला दूध घालण्यास सुरुवात

सोलापूर: दुष्काळाचा फटका बसल्याने सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी संघाचे दूध संकलन प्रथमच एक लाख लिटरच्या आत आले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्याचे दूध संकलन मागील वर्षीच्या तुलनेत ४४ हजार लिटरने कमी झाले असल्याचे जिल्हा दुग्धविकास कार्यालयाकडून सांगण्यात आले. 

यावर्षी पाण्याअभावी जनावरांच्या वैरणीवर परिणाम झाला आहे. मार्चनंतर सगळीकडेच वैरणची चणचण भासू लागली आहे. शेतकºयांकडे असलेला चारा संपल्याने चारा छावण्या सुरू करण्याची मागणी पुढे आली. छावण्या सुरू होण्यास उशीर झाल्याने जनावरांची उपासमार सुरू झाली. याचाच फटका दूध संकलनाला बसला आहे. 

छावण्या सुरू झाल्यानंतर सांगोला, मंगळवेढा, माढा तालुक्यातील दूध संकलनात होणारी घट थांबली. मात्र अन्य तालुक्यांतील दूध संकलनावर परिणाम झाला आहे. 

सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे संकलन प्रथमच एक लाख लिटरच्या आत आले आहे. दूध संघाचे संकलन प्रति दिन ९७ हजार लिटरवर आले आहे. मागील वर्षभर प्रति दिन दीड लाख व एक लाख १५ हजार लिटरच्या दरम्यान दूध संकलन होत होते. ते यावर्षी मे व जून महिन्यात कमी होत गेले. 

सोलापूर जिल्ह्याचे संकलन मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या मे महिन्यात ४४ हजार लिटरने घटले आहे. मागील वर्षी मे महिन्यात सहकारी व खासगी संघांचे प्रति दिन दूध संकलन १२ लाख ८६ हजार २१८ लिटर इतके होत होते. यावर्षी १२ लाख ४२ हजार १४० लिटर इतके झाले आहे. 

सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ(दूधपंढरी)चे संकलन यापूर्वी एक लाखापेक्षा कमी कधीही झाले नव्हते. मात्र यावर्षी फटका बसला आहे. खासगी संघांचा दूध खरेदी दर प्रति लिटर २८-२९ रुपयांवर गेल्याने शेतकºयांनी खासगी संघाला दूध घालण्यास सुरुवात केल्याचाही फटका दूधपंढरीला बसला असल्याचे सांगण्यात आले. 

माढा तालुक्याला सर्वाधिक फटका 
- मे २०१८ व मे २०१९ ची तफावत पाहिली असता माढा तालुक्यात सर्वाधिक प्रतिदिन १८ हजार लिटर दूध संकलन घटल्याची आकडेवारी जिल्हा दुग्ध विकास कार्यालयाची आहे. पंढरपूर तालुक्याचे प्रतिदिन १० हजार लिटर तर मोहोळ तालुक्याचे आठ हजार लिटर दूध संकलन कमी झाले आहे. मंगळवेढा तालुक्याचे सहा हजार तर करमाळा तालुक्याचे पाच हजार लिटर दूध संकलन कमी झाले आहे. सांगोल्याचे चार हजार लिटर तर बार्शी तालुक्याचे दोन हजार लिटर दूध संकलन घटले असल्याची आकडेवारी आहे.

Web Title: Decrease in milk procurement of Solapur district by 44 thousand liters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.