Action on the unauthorized construction of Solapur City! | सोलापूर शहरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू !

ठळक मुद्देपार्किंगमध्ये करण्यात आलेले बेकायदा बांधकाम काढण्यासाठी मनपाचे पथक अनधिकृत बांधकामावर मनपाने सोमवारपासून कारवाई सुरूपार्किंगच्या जागेत बांधण्यात आलेले बांधकाम नियमित करता येत नाही


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ५  : अनधिकृत बांधकामावर मनपाने सोमवारपासून कारवाई सुरू केली. कारवाईची सुरुवात मनपा सभागृहाशेजारील हॉटेल, आयुक्तांच्या निवासस्थानाजवळील हॉस्पिटलपासून करण्यात आली. पार्किंगमध्ये करण्यात आलेले बेकायदा बांधकाम काढण्यासाठी मनपाचे पथक हजर झाल्यावर संबंधितांनी स्वत:हून पाडकाम सुरू केले. 
अनधिकृत बांधकाम असणाºयांना शासनाने दिलासा दिला तरी बांधकाम नियमित करून घेण्यासाठी नागरिक पुढे येत नसल्याने मनपाने अशा बांधकामांवर आता हातोडा चालविण्याची तयारी सुरू केली आहे. अनधिकृत बांधकामे दंड भरून नियमित करण्याच्या नियमात दुरुस्ती करून शासनाने नवा अध्यादेश जारी केला आहे. पण यात पार्किंगच्या जागेत बांधण्यात आलेले बांधकाम नियमित करता येत नाही. 
शहरात मुख्य रस्त्यावर असलेल्या अनेक इमारतींमध्ये व्यावसायिक वापर करताना पार्किंग गायब करण्यात आल्याचे निदर्शनाला आले आहे. पार्किंग व गोदामाच्या ठिकाणी बांधकाम करून वापर सुरू आहे. वाहने मात्र रस्त्यावर लावली जात आहेत. त्यामुळे समस्या निर्माण होत असल्याने आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मोहीम घेण्याचे बांधकाम परवाना विभागाला आदेश दिले. त्याप्रमाणे पार्किंगच्या ठिकाणी बांधकामे करण्यात आलेली ठिकाणे शोधून कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. 
मनपा सभागृहाच्या पाठीमागील चौकात असलेल्या हॉटेल नमनची वाहने रस्त्यावर पार्किंग केल्याचे दिसून आले. आयुक्त डॉ. ढाकणे यांना घरी जाता-येताना ही बाब प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे त्यांनी या हॉटेलच्या बांधकाम परवान्याची फाईल तपासली. त्यात पार्किंगची जागा असतानाही वाहने रस्त्यावर थांबवली जात असल्याचे दिसून आले. हॉटेल परवानाधारक भारत दावडा यांनी तळमजल्यावर पार्किंग व स्टोअरच्या जागेवर बांधकाम केल्याचे आढळले. या जागेवर त्यांनी बेकायदा कॉन्फरन्स हॉल व किचन उभारल्याचे लक्षात आल्यावर मनपाच्या बांधकाम विभागाचे पथक पाडकामासाठी सोमवारी दुपारी तेथे पोहोचले. पथकाने कारवाई सुरू केल्यावर हॉटेल व्यवस्थापनाने स्वत:हून पाडकाम करून घेण्यास सुरुवात केली.
पार्किंगची जागा मोकळी करण्याचे आश्वासन दिल्यावर पथकाने जुन्या आरटीओ कार्यालयाजवळील विजयकुमार रघोजी यांच्या इमारतीकडे मोर्चा वळविला. पार्किंगच्या जागेत मेडिकल सुरू करण्यात आल्याचे निदर्शनाला आल्यावर पथकाने कारवाई सुरू केली. त्यावर जागामालकांनी बांधकाम स्वत:हून पाडकाम करून घेण्याचे आश्वासन दिल्यावर नोटीस बजावणी करून पथक परतले. 
----------------------
काय आहे नवा कायदा
 - महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५२ (क) नुसार ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी झालेली अनधिकृत बांधकामे दंड स्वीकारून नियमित करण्याला मान्यता देण्यात आली आहे. याप्रमाणे नियमानुसार मर्यादित उंचीपेक्षा जास्त उंचीच्या इमारती (एफएसआय ३० टक्क्यांपर्यंत मर्यादा), अनुज्ञेय वापराव्यतिरिक्त अन्य वापर असलेली बांधकामे (निवासी इमारतीचा वाणिज्य वापर), मंजूर एफएसआयपेक्षा जास्त एफएसआय वापरण्यात आलेल्या इमारती, ३० टक्के मर्यादित किंवा टीडीआर घेऊन, मंजूर सामासिक अंतरापेक्षा कमी सामासिक अंतरे सोडून केलेले बांधकाम, मंजूर पार्किंगपेक्षा कमी जागा असलेली इमारत (लगतच्या जागेत किंवा मेकॅनिक पार्किंग दर्शविणे), डक्टची मोजमापे कमी सोडलेली असल्यास त्यामध्ये मर्यादेपर्यंत सूट देणे, जिना, पॅसेज, बाल्कनी, टेरेसचा गैरवापर केल्यास अशी बांधकामे नियमित करता येणार आहेत.
---------------------
दहा जणांना नोटिसा
- अनधिकृत बांधकाम असलेल्या आणखी दहा जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दाजीपेठेतील रमाकांत पुलगम यांच्या इमारतीत गोदामाच्या जागेत व्यापारी गाळे बांधून वापर सुरू आहे. पूर्व मंगळवार पेठेतील आनंद चिडगुंपी यांनी घराचे बांधकाम जादा केले आहे. विजापूर रोडवरील पाटील नगरात राहणारे पुरुषोत्तम खंडेलवाल, प्रवीण भंडारी यांनी पार्किंगच्या जागेत व्यापारी गाळे बांधले आहेत. अशाच प्रकारे शहरातील अनेक ठिकाणी पार्किंग व गोदामाच्या जागेत बांधकाम करून वापर सुरू आहे. नव्या अध्यादेशानुसार अशी बांधकामे नियमित करता येत नाहीत. 
----------------
मला ज्या गोष्टी दिसल्या त्यावर आता कारवाई झाली आहे. पार्किंगमध्ये केलेल्या बेकायदा बांधकामाविरुद्ध शहरभर मोहीम राबविण्यात येईल. यातून कोणीच सुटणार नाही. त्यामुळे ज्यांनी असे बांधकाम करून दुकाने थाटली आहेत, ती तत्काळ बंद करून पार्किंग खुले करावे. 
- डॉ. अविनाश ढाकणे, आयुक्त, सोलापूर महापालिका