हिंदी भाषिक आलिशाने मिळवले संस्कृतमध्ये १०० गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 02:08 PM2019-06-11T14:08:14+5:302019-06-11T14:09:25+5:30

इच्छाशक्तीचा विजय: माय मराठी भाषेतही गुणांची नव्वदी पार

100 marks in Sanskrit, gained by Hindi speaking lalis | हिंदी भाषिक आलिशाने मिळवले संस्कृतमध्ये १०० गुण

हिंदी भाषिक आलिशाने मिळवले संस्कृतमध्ये १०० गुण

Next
ठळक मुद्देहिंदी मातृभाषिक असलेल्या आलिशा मकानदार या विद्यार्थिनीने संस्कृत विषयामध्ये १०० पैकी १०० गुणविजापूर रोड परिसरातल्या निर्मलाताई ठोकळ प्रशालेमध्ये शिकणाºया आलिशा अन्वरशा मकानदार हिचं सर्व शिक्षण तसं मराठी  माध्यमातूनच

विलास जळकोटकर 

सोलापूर: भाषेवर प्रेम करणं.. तिचा अभ्यास करणं.. प्रभुत्व मिळवणं मग तो कोणताही भाषिक असो. इच्छाशक्ती असली की सर्वकाही साध्य होतं. याची प्रचिती हिंदी मातृभाषिक असलेल्या आलिशा मकानदार या विद्यार्थिनीने संस्कृत विषयामध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून पांडित्यांचे भूषण समजल्या जाणाºया भाषेत प्रभूत्व मिळवलं आहे. 

विजापूर रोड परिसरातल्या निर्मलाताई ठोकळ प्रशालेमध्ये शिकणाºया आलिशा अन्वरशा मकानदार हिचं सर्व शिक्षण तसं मराठी  माध्यमातूनच झालेलं असलं तरी घरी मातृभाषा मात्र हिंदी असायची; मात्र लहानपणापासून ती कोणताही अभ्यास असो मनापासून करायचा ही तिची प्राथमिक शिक्षणापासूनची ख्याती. वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. नोकरीच्या निमित्तानं या गावाहून त्या गावी वडिलांची बदली हे ठरलेलं. इयत्ता पहिली ते चौथी वडील तडवळच्या शाळेत असल्याने तिथच शिक्षण झालं. 

पुढे बदलीचा त्रास मुलांच्या शिक्षणात अडसर नको म्हणून वडील अन्वरशा यांनी तिला तिच्या मावशीकडं मंद्रुपला महात्मा बसवेश्वर हायस्कूलला पाठवलं. तेथेच ५ वी ते ८ वीपर्यंत शिक्षण झालं. पुढे सोलापूरला स्थाथिक झाल्यानं निर्मलाताई ठोकळ प्रशालेमध्ये ९ वीमध्ये तिचा प्रवेश झाला. येथे तिला संस्कृत विषय असल्याचं समजलं. या विषयातही पारंगत होऊन अशी जिद्द बाळगून तिनं हा विषय निवडला आणि पैकीच्या पैकी १०० गुण मिळवून तिने हे यश प्राप्त केले. 

या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा निर्मलाताई ठोकळ, उपाध्यक्ष सचिन ठोकळ, शिल्पा ठोकळ, सचिव भिकाजी गाजरे, प्राचार्य दत्तात्रय गाजरे, आशा भोसले यांनी कौतुक करीत तिला शुभेच्छा दिल्या.

आई-वडील अन् गुरुजनांचं मार्गदर्शन
- आलिशानं केवळ संस्कृत विषयावरच लक्ष केंद्रित न करता मराठी विषयामध्येही ९० गुण मिळवले आहेत. अन्य विषयातही ९५ च्या पुढे मजल मारली आहे. शेकडा ९६.२० टक्के गुण मिळवत तिनं यशाला गवसणी घातली आहे. या यशाचं गमक सांगताना ती म्हणाली, शाळेच्या व्यतिरिक्त दररोज पाच तास प्रत्येक विषयाला किती वेळ द्यायचा याचे नियोजन आखले. माझी मोठी बहीण अंजूम जी याचवर्षी बारावीला होती. तिचंही सहकार्य घेतलं. आई रेश्मा आणि शाळेचे प्राचार्य दत्तात्रय गाजरे, संस्कृत विषयाच्या शिक्षिका स्वप्नजा जाधव, युसूफ शेख, आशा भोसले, जकवडकर सर यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच मी हे यश संपादन करु शकल्याचे तिने विनयपूर्वक सांगितले. भावी वाटचालीबद्दल सांगताना तिनं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करुन समाजातील गोरगरिबांना ही सेवा कशी मिळेल यासाठी प्रयत्नशील राहू असं ती म्हणाली. 

इयत्ता ९ वीमध्ये निर्मलाताई ठोकळ शाळेत प्रवेश घेतला. नंतर कळाले की संस्कृत विषय आहे. पण मी घाबरले नाही. माझी मैत्रीण अंजलीच्या मदतीने संस्कृत विषयाची ओळख करून घेतली. नेहमी वाचन, लेखन, उच्चार सुधारण्याचा प्रयत्न केला. हळूहळू संस्कृतमध्ये आवड निर्माण झाली. अभ्यास करताना कंटाळा आला की, संस्कृतमधील श्लोक म्हणणे, वाचन करणे असा अभ्यास केला. खरंच या भाषेमुळं माझे स्पष्ट उच्चार करण्याची सवय जडली.
- आलिशा मकानदार

मुस्लीम समाजातील मुलींचा शिक्षण क्षेत्रामध्ये टक्का वाढायला हवा. उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले पाहिजे. पालकांनी तिचा कल पाहून तिला शिक्षणासाठी उद्युक्त करावे. माझ्या मुलीनं मातृभाषा हिंदी असूनही तिनं अवघड वाटणाºया संस्कृत विषयामध्ये मिळवलेल्या यशाबद्दल आम्हा कुटुंबीयांना अभिमान आहे.- 
- अन्वरशा मकानदार,  पिता

Web Title: 100 marks in Sanskrit, gained by Hindi speaking lalis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.