वन्य प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी सहा जण ताब्यात, आंबोली वनपरिक्षेत्रातील घटना, कारसह मुद्देमाल जप्त 

By अनंत खं.जाधव | Published: February 18, 2024 12:25 PM2024-02-18T12:25:32+5:302024-02-18T12:25:32+5:30

Sindhudurg News: आंबोली येथील वनक्षेत्रात वन्य प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या कार मध्ये प्राण्याचे केस आढळून आले आहेत. त्यामुळे त्या संशयितांनी साळींदराची शिकार केली असावी, असा वन अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी ६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Six arrested in case of poaching of wild animals, case in Amboli forest area, items including car seized | वन्य प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी सहा जण ताब्यात, आंबोली वनपरिक्षेत्रातील घटना, कारसह मुद्देमाल जप्त 

वन्य प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी सहा जण ताब्यात, आंबोली वनपरिक्षेत्रातील घटना, कारसह मुद्देमाल जप्त 

सावंतवाडी - आंबोली येथील वनक्षेत्रात वन्य प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या कार मध्ये प्राण्याचे केस आढळून आले आहेत. त्यामुळे त्या संशयितांनी साळींदराची शिकार केली असावी, असा वन अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी ६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई रविवारी पहाटेच्या सुमारास आंबोली हिरण्यकेशी परिसरात करण्यात आली आहे.

 यात फरान समीर राजगुरू (२६), नेल्सन इज्माईल फर्नांडिस ( ४२) दोघे (रा.सालईवाडा-सावंतवाडी), बाबुराव बाळकृष्ण तेली (४२, रा. सावंतवाडी जेलच्या मागे), सर्फराज बाबर खान ( ३४), रजा गुलजार खान (२३) दोघे (रा. बांदा गडगेवाडी),अरबाज नजीर मकानदार (२६, रा. माठेवाडा) आदींचा यात समावेश आहे. त्यांच्यावर वन्य प्राणी संरक्षण कायद्याचा भंग करणे तसेच मनाई आदेश असताना हत्यारे घेऊन फिरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे वनअधिकारी विद्या घोडगे यांनी सांगितले.

या प्रकरणी त्यांची कसून चौकशी सुरू असून त्यांनी नेमकी कुठे शिकार केली? याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना रविवारी सकाळी ८ वाजता हिरण्यकेशी येथे जंगल परिसरात नेण्यात आले. परंतु शिकार करण्यात आलेला प्राणी सापडला नाही, असे वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र जप्त करण्यात आलेल्या संशयितांच्या गाडीत साळींदराचे केस आढळून आले आहे तसेच चाकूला मांस चिकटलेले होते. त्यामुळे वन्य प्राण्यांची हत्या झाली, असा संशय वन अधिकाऱ्यांना आहे. त्यानुसार पुढील तपास करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधितांची कसून चौकशी सुरू केली आहे. त्यातील काडतुसाची बंदूक ही परवान्याची असल्याचे संशयित राजगुरू याचे म्हणणे आहे. त्यानुसार त्याची अधिक चौकशी केली जात आहे. याबाबत वन अधिकारी घोडगे यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क केला असता त्या म्हणाल्या, कारवाईत एक कार, बंदूक आणि दोन सुरे जप्त करण्यात आले आहेत. त्यांनी नेमकी वन्य प्राण्यांची हत्या कोठे केली? व कोणत्या प्राण्यांची हत्या केली याची माहिती घेत आहोत. गाडीत मिळालेले केस हे साळींदराचे आहेत. त्यामुळे ते अधिक माहितीसाठी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. याप्रकरणी तूर्तास संबंधितांची चौकशी सुरू आहे. त्यांच्यासोबत आणखी कोणी आहेत का? याचा शोध घेत आहोत, असे त्यांनी सांगितले.ही कारवाई वनक्षेत्रपाल विद्या घोडके, मदन क्षिरसागर, कर्मचारी गोरख भिंगारदिवे, वनरक्षक प्रमोद जगताप, गौरेश राणे आदींसह पोलिसांच्या पथकांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, आंबोली हिरण्यकेशी परिसरात गोळीबाराचा आवाज आल्यानंतर आंदोलन स्थळी असलेल्या लोकांनी त्या संशयितांना हटकण्याचा प्रयत्न केला. परंतु ते हिरण्यकेशीच्या बाजूने पळून गेले.  यावेळी त्या ठिकाणी असलेल्या गावातील तपासणी नाक्यावर असलेल्या युवकांकडून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या गाडीची तपासणी केली असता गाडीत बंदूक आणि रक्ताने माखलेला सुरा असा मुद्देमाल आढळून आला. त्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Web Title: Six arrested in case of poaching of wild animals, case in Amboli forest area, items including car seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.