सिंधुदुर्ग : शिवजयंतीनिमित्त विजयदुर्ग किल्ल्यावर काढलेल्या रॅलीला शिवप्रेमींकडून प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 18:29 IST2018-03-05T18:29:01+5:302018-03-05T18:29:01+5:30
जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव असा जल्लोष करीत कासार्डे येथील नवतरूण उत्कर्ष मंडळ व राजा शिवछत्रपती ग्रुप यांच्यावतीने शिवजयंतीचे औचित्य साधून कासार्डे-तळेरे-कासार्डेमार्गे विजयदुर्ग किल्ला येथे शिवपुतळ्यासह भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली.

कासार्डेतील नवतरुण उत्कर्ष मंडळ व राजा शिवछत्रपती ग्रुप यांच्यावतीने विजयदुर्ग किल्ल्यावर जल्लोष करण्यात आला.
तळेरे : जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव असा जल्लोष करीत कासार्डे येथील नवतरूण उत्कर्ष मंडळ व राजा शिवछत्रपती ग्रुप यांच्यावतीने शिवजयंतीचे औचित्य साधून कासार्डे-तळेरे-कासार्डेमार्गे विजयदुर्ग किल्ला येथे शिवपुतळ्यासह भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली.
या रॅलीचा शुभारंभ जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या हस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व युवा नेते संदेश पारकर, सरपंच बाळाराम तानवडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी कासार्डे गावातील प्रतिष्ठीत नागरिक व ग्रामस्थ, शिवप्रेमी तसेच नवतरूण उत्कर्ष मंडळाचे व राजा शिवछत्रपती ग्रुपचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
यावेळी संदेश पारकर म्हणाले की कासार्डे गावातील युवकांनी एकत्र येत येथे शिवजयंती सोहळा आयोजित केला हे आपल्या एकजुटीचे प्रतीक आहे. विजयदुर्ग किल्ल्यावर मोठ्या उत्साहात या रॅलीचे स्वागत करण्यात आले.
बुरंबावडे येथे सरपंच रवींद्र शिंगे, उपसरपंच उदय पारकर आदी ग्रामस्थ, फणसगाव येथे बंड्या नारकर, बाबा पारकर व ग्रामस्थांनी रॅलीचे स्वागत केले. यावेळी मोठ्या उत्साहात रॅलीची सांगता करण्यात आली. रविवारीही कासार्डे येथे शिवजयंती निमित्ताने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.