सिंधुदुर्ग : आरोग्य यंत्रणेचा बोजवारा; तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी : परशुराम उपरकर यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 03:05 PM2018-06-02T15:05:18+5:302018-06-02T15:05:18+5:30

कणकवली उपजिल्हा रुग्णालय हे प्रथमोपचार केंद्र झाले आहे. गेल्या सहा वर्षात एकही नवीन डॉक्टर या रुग्णालयाला देण्यात आलेला नाही. दुसरीकडे चांगली सेवा देणाऱ्या डॉक्टरांनाही मुदतवाढ दिली जात नाही. यामुळे आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. याकडे आमदार, खासदार आणि पालकमंत्री यांचेही साफ दुर्लक्ष झाल्याचा आरोप मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला आहे.

Sindhudurg: cancellation of health system; Expert doctors should be appointed: Parsuram Upkar's criticism | सिंधुदुर्ग : आरोग्य यंत्रणेचा बोजवारा; तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी : परशुराम उपरकर यांची टीका

कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन परशुराम उपरकर यांनी वैद्यकीय अधीक्षकांशी चर्चा केली.

Next
ठळक मुद्देआरोग्य यंत्रणेचा बोजवारा; तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी उपजिल्हा रुग्णालयाकडे पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष : परशुराम उपरकर यांची टीका

कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालय हे प्रथमोपचार केंद्र झाले आहे. गेल्या सहा वर्षात एकही नवीन डॉक्टर या रुग्णालयाला देण्यात आलेला नाही. दुसरीकडे चांगली सेवा देणाऱ्या डॉक्टरांनाही मुदतवाढ दिली जात नाही. यामुळे आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. याकडे आमदार, खासदार आणि पालकमंत्री यांचेही साफ दुर्लक्ष झाल्याचा आरोप मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला आहे.

मनसे कार्यकर्त्यांसह उपरकर यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तसेच प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. सि. एम. शिकलगार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत पत्रकारांना माहिती दिली. यावेळी ते बोलत होते.

उपरकर म्हणाले, रुग्णालयातील डॉ. ज्ञानेश्वर सोडल यांची सेवा सन २०१२ मध्ये बंद झाली. त्यानंतर या रुग्णालयाला उतरती कळा लागली आहे. गेल्या सहा वर्षात येथे एकही तज्ज्ञ डॉक्टर देण्यात आलेला नाही. गेले तीन वर्षे डॉ. महेंद्र्र आचरेकर यांनी एक हाती उपजिल्हा रुग्णालय सांभाळले होते. पण त्यांची इच्छा असतानाही त्यांना सेवेची मुदत वाढवून देण्यात आलेली नाही.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात फक्त ४ डॉक्टर्स आहेत. त्यामुळे सध्या तापसरीसह अपघात व इतर आजारांचे रुग्ण थेट जिल्हा रुग्णालयात पाठविले जातात. तालुक्यातील रुग्णांची आबाळ होऊ नये यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत बालरोगतज्ज्ञ, सर्जन आदी डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. पण हे डॉक्टर देखील रुग्णालयात फिरकत नाहीत. त्यामुळे येथे कोणी वालीच राहिलेले नाही.

राज्य शासनाने आणि आमदार , खासदार आणि पालकमंत्र्यानीही कणकवली उपजिल्हा रुग्णालय वाऱ्यावर सोडले आहे. तिन वर्षापूर्वी उपजिल्हा रुग्णालयात खासदार विनायक राऊत यांनी अपंगाचा मेळावा घेतला. यातील पात्र रुग्णांसाठी ४० व्हीलचेअर आणि काठया असे साहित्य आले. मात्र हे साहित्य गेली तीन वर्षे रुग्णालयात धूळ खात आहे. त्यांचे वाटप करण्यास उपजिल्हा रुग्णालय प्रशासन आणि खासदारानाही वेळ नाही.

या रुग्णालयात औषधांचा तुटवडा आहे. गेल्या दोन वर्षात हाफकिन संस्थेकडून औषधांची खरेदी झालेली नाही. याबाबत आरोग्य संचालक आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क साधला असता या दोघांनीहि आज आमच्या सेवेचा शेवटचा दिवस आहे असे सांगून वेळ मारून नेली.

उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती आणि फ्रॅक्चरसाठी आलेले रुग्ण परस्पर खासगी रुग्णालयात पाठविले जातात. वस्तुत: उपजिल्हा रुग्णालयात उपचार होत नसतील तर त्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठविणे आवश्यक असते. परंतु, साटेलोटे प्रकार असल्याने हे रुग्ण ठराविक खासगी रुग्णालयात पाठविले जातात. असा आरोप देखील उपरकर यांनी यावेळी केला.



 

Web Title: Sindhudurg: cancellation of health system; Expert doctors should be appointed: Parsuram Upkar's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.