राजकोट किल्ल्यावर उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा उद्या मालवणमध्ये येणार 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 27, 2023 03:52 PM2023-10-27T15:52:19+5:302023-10-27T15:52:46+5:30

सिंधुदुर्ग किल्ल्यावर यावर्षीचा नौदल दिन साजरा होणार

Shiva Raya statue to be erected at Rajkot fort will arrive in Malvan tomorrow | राजकोट किल्ल्यावर उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा उद्या मालवणमध्ये येणार 

राजकोट किल्ल्यावर उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा उद्या मालवणमध्ये येणार 

मालवण : भारतीय सागरी आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या समुद्रात उभारलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर यावर्षीचा नौदल दिन साजरा होणार आहे. यानिमित्त मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचे काम नौदल व प्रशासनाकडून वेगाने सुरू आहे. याठिकाणी बसविण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कल्याण येथून उद्या, शनिवारी (दि २८) मालवणात आणण्यात येणार आहे. १० नोव्हेंबरपर्यंत हा पुतळा बसविण्यात येणार आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे. शिवरायांचा पुतळा आणि त्याच्या सभोवती किल्ल्याप्रमाणे उभारली जाणारी तटबंदी यामुळे राजकोट किल्ल्याला गतवैभव प्राप्त होणार आहे. या कामाच्या पूर्ततेकडे मालवणवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

या कामाची गुरूवारी भारतीय नौसेनेचे पश्चिम विभागाचे प्रमुख रिअर ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी पाहणी करत कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी नौसेनेचे इतर अधिकारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. नौसेनेतर्फे किल्ले सिंधुदुर्गसमोरील छत्रपतींच्या गडकोटच्या माळेतील राजकोट येथे हा शिवरायांचा पुतळा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. छोटेखानी राजकोटचे सुशोभिकरण करतानाच त्याला किल्ल्याचे स्वरूप देण्यात येणार आहे. अंदाजे पाच कोटी रुपये खर्चाच्या या कामासाठी राजकोट भागातील ३३ पैकी १८ गुंठे जमिनीत सध्या कामाला सुरूवात झाली आहे. पुतळा परिसरात तटबंदीचे काम बऱ्याचअंशी पूर्ण झाले आहे. यात जेथे शिवरायांचा पुतळा बसविण्यात येणार आहे, तेथे चौथरा तयार करण्यात आला आहे.

महापुरूष मंदिराचे सुशोभीकरण होणार

या चौथऱ्याची उंची १० फूट, रुंदी १० फूट आणि लांबी १६ फूट आहे. पुतळ्यासभोवती किल्ल्याप्रमाणे तटबंदी उभारण्यात येत असून, आतापर्यंत ६०० फूट लांबीच्या तटबंदीचे काम पूर्ण झाले आहे. यात सहा बुरुजांचा समावेश असून, तटबंदीची उंची आठ फूट आहे तर प्रवेशद्वाराचे काम हाती घेण्यात आले आहे. यासोबतच या छोटेखानी किल्ल्यात हिरवळ, पदपथ, वीज व्यवस्था, रंगरंगोटी व या जागेत असलेल्या महापुरुष मंदिराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.

१० नोव्हेंबरपूर्वी चौथऱ्यावर बसविणार

राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा बसविण्यात येणारा पुतळा हा कल्याण येथील शिल्पकार जयदीप आपटे यांनी तयार केला आहे. हा पुतळा ब्रॉन्झ धातूपासून बनविलेला असून, पुतळा बनविण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दिशेने पाहत असलेला व हातात तलवार असलेला शिवरायांचा हा पुतळा सुमारे ३५ फूट उंच असणार आहे. हा पुतळा २८ ऑक्टोबरला मालवणात आणण्यात येणार असून, १० नोव्हेंबरपूर्वी तो चौथऱ्यावर बसविण्यात येणार आहे. शिवरायांच्या पुतळ्यामुळे राजकोट किल्ल्याचे पुनरुज्जीवीकरण होत असून, हे काम वेगाने पूर्णत्वाकडे नेण्यात येत आहे.

दिनेश त्रिपाठींकडून पाहणी

गुरूवारी नौसेनेचे पश्चिम विभागाचे प्रमुख रिअर ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी नौसेनेच्या अधिकाऱ्यांसमवेत मालवणला भेट देत कामाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, पानवलकर, तहसीलदार वर्षा झालटे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

Web Title: Shiva Raya statue to be erected at Rajkot fort will arrive in Malvan tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.