ठळक मुद्दे२२ सप्टेंबरपासुन कणकवलीसह सिंधुदुर्गातील मुख्य सर्व्हर बंद कार्यप्रणाली पुर्णत: नादुरुस्त, तलाठयांचे कामकाज झाले ठप्पजनतेची कामे वेळेत होण्यासाठी आॅफलाईन कामकाजाची मागणी

कणकवली ,दि. ०२ : आॅनलाईन सातबारा संगणकीकरणाच्या प्रक्रियेमुळे जनता मेटाकुटीस आली आहे. २२ सप्टेंबरपासुन एन.आय.सी.पुणे येथील महसुलचा मुख्य सर्व्हर बंद असल्यामुळे तलाठयांचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे कणकवलीसह सिंधुदुर्गातील सर्वसामान्य पक्षकारांच्या असंख्य नोंदी, सातबारा दुरुस्त, नवीन सातबारासह होणारी सर्व कामे ठप्प झाली आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ सप्टेंबर २०१७ पासुन मुख्य सर्व्हर बंद असल्यामुळे आॅनलाईन कार्यप्रणाली उघडण्यास विलंब लागत आहे.

फक्त सातबारा जरी पक्षकाराला द्यावयाचा असल्यास तब्बल दिड ते दोन तास जात आहेत. तर इतर कामे करण्यासाठी एनआयसीची आॅनलाईन कार्यप्रणाली पुर्णत: नादुरुस्त असल्याचे दिसुन येत आहे.

त्यामुळे सर्वसामान्य ग्रामीण भागातील जनतेला विविध शासकीय, वैयक्तिक कामांसाठी लागणारे सातबारा, फेरफार नोंदी, सातबारात बदल यासह अन्य महसुल विषयक कामे होत नसल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहेत.

तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर व जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे संबंधीत अधिकाऱ्यांकडुन पाठपुरावा करुन देखील कुठलीही दखल घेतली जात नसल्याची चर्चा महसुल विभागात आहे.


एकीकडे तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांकडे विविध कामकाजाचा बोजा असतानाच आॅनलाईन फीडींगचे काम दिल्यामुळे दररोजच्या कामकाजावर परिणाम झाला होता. गेले दोन वर्षे सर्वसामान्य पक्षकारांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

आॅनलाईन सातबारा खरेदी-विक्री या प्रक्रियेत वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासुन बंद असलेल्या सर्व्हरमुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने महसुल विभागातील या मोठा अडचणीचा विषय बनलेल्या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.

आॅफलाईन कामकाजाची मागणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आॅनलाईन सातबारा, फेरफार नोंदी व इतर दस्त स्कॅनिंग करताना सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वर्षोनुवर्षे आॅनलाईन प्रक्रियेचे कामकाज प्रलंबीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये तलाठी, मंडल अधिकारी, महसुल अधिकाऱ्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

आॅनलाईन प्रक्रिया राबविताना जनतेची कामे वेळेत होण्यासाठी आॅफलाईन कामकाज करावे. तसेच आॅनलाईनचे कामकाज सोईने करुन १०० टक्के संगणीकृत कामकाज पुर्ण झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतुन केली जात आहे.