कोकणकन्या लोकसभेच्या सर्वोच्च स्थानी

By admin | Published: June 7, 2014 12:41 AM2014-06-07T00:41:19+5:302014-06-07T00:44:05+5:30

सुमित्रा महाजन

Konkan is the highest place in the Lok Sabha | कोकणकन्या लोकसभेच्या सर्वोच्च स्थानी

कोकणकन्या लोकसभेच्या सर्वोच्च स्थानी

Next

सुभाष कदम ल्ल चिपळूण
चिपळुणात केवळ तिचा जन्म नव्हे तर अख्खं बालपण गेलं. आजही तिच्या बोलण्यात या मातीचा गंध येतं राहतो, त्याच चिपळूणच्या माहेरवाशिण असलेल्या सुमित्रा महाजन यांना लोकसभेच्या सर्वोच्च स्थानी विराजमान होण्याचा मान मिळालाय. चिपळूणच्या या सुकन्येने एवढंच केलं नाही, तर या लोकसभा निवडणुकीत विजय संपादन करून सलग आठवेळा निवडून येण्याचा विक्रमही रचलाय.
चिपळूण तालुक्यातील शिरळसारख्या डोंगराळ, दुर्गम भागात १२ एप्रिल १९४३ रोजी जन्मलेल्या सुमित्रा महाजन या येथेच वाढल्या. चिपळूणचे प्रसिद्ध वकील आप्पासाहेब साठे यांच्या त्या कन्या. लहानपणापासूनच सुमन साठे अभ्यासात हुशार होत्या. त्यांचे वक्तृत्व उत्तम होते. उत्तम नृत्यशैली आणि नाटकाची आवड असल्याने त्या नाटकातही काम करीत असत. शालेय जीवनात बापटआळीतील कन्याशाळेत त्यांनी शिक्षणाचे धडे गिरवले. त्यानंतर युनायटेड इंग्लिश स्कूलमधून त्या मॅट्रिक (म्हणजेच त्यावेळच्या अकरावी) झाल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. केशव हेडगेवार यांनी त्यांचे वडील अ‍ॅड. आप्पासाहेब साठे यांना राष्ट्रीय स्वयंसेवी संघाच्या शाखेचे संघचालक केले. पुढे ते कोकण विभागाचे संघचालक झाले. महाजन यांचे भाऊ अरुण साठे हे आसाममध्ये संघाचे प्रमुख प्रचारक होते. त्यांचे मेहुणे व एकता मासिकाचे पहिले संपादक रामदास कळसकर यांनी १९६५ मध्ये येथील लोकसभेची निवडणूक लढविली होती.
२९ जानेवारी १९६५ रोजी अ‍ॅड. महाजन यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. महाजन हे मूळचे दापोली तालुक्यातील केळशी गावचे रहिवासी. परंतु, उद्योग व्यवसायानिमित्त ते इंदोर येथे स्थायिक झाले होते. लग्नानंतर सुमित्रा महाजन इंदोरला गेल्या. तेथील विद्यापीठात वकिली करु लागल्या. लहानपणापासूनच संघाच्या प्रवाहात वाढल्याने पुढे त्या भारतीय जनता पक्षात सक्रीय झाल्या. १९८२ ते ८५ या कालावधीत नगरसेविका, तर १९८४-८५ मध्ये त्यांनी उपमहापौरपदही भूषविले. तीन वेळा विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना अपयश आले. मात्र, १९८९ पासून सलग ८ वेळा त्या लोकसभेत निवडून आल्या. बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या महाजन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये महिला व बालकल्याण खात्याच्या राज्यमंत्री होत्या. चिपळूणमध्ये त्यांचे अनेक मित्र-मैत्रिणी आहेत. सरोज नेने, भरत भागवत यांच्यासारख्या अनेक मित्रांचा ऊर आज भरुन आला आहे. इंदोरमध्ये स्थायिक होऊनही चिपळूणजवळचा त्यांचा ओलावा कायम राहिला. येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. चिपळूणच्या साहित्य संमेलनातही त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. त्यांचा ऋणानुबंध आज कायम असल्याने चिपळूणवासीयांचा सन्मान झाला आहे.

Web Title: Konkan is the highest place in the Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.