सिंधुदुर्गनगरी : निरपराध मच्छिमारांवर खोटे गुन्हे : कृष्णनाथ तांडेल यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 04:23 PM2018-02-15T16:23:10+5:302018-02-15T16:32:56+5:30

मच्छिमारांनी गोवा राज्यातील तीन एलईडी पर्ससीन नौका पकडून आणल्या. यात जिल्हा पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने तपास यंत्रणा राबवून मच्छिमार समाजातील निरपराध मच्छिमारांवर त्या घटनेशी संबंध नसताना गंभीर स्वरुपाचे खोटे गुन्हे दाखल केले.

False crimes against innocent fishermen: The allegation of Krishnath Tandel | सिंधुदुर्गनगरी : निरपराध मच्छिमारांवर खोटे गुन्हे : कृष्णनाथ तांडेल यांचा आरोप

सिंधुदुर्गनगरी : निरपराध मच्छिमारांवर खोटे गुन्हे : कृष्णनाथ तांडेल यांचा आरोप

Next
ठळक मुद्देनिरपराध मच्छिमारांवर खोटे गुन्हे : कृष्णनाथ तांडेल यांचा आरोपपोलीस अधीक्षकांची हुकूमशाहीमच्छिमारांचा आक्रोश पालकमंत्र्यांच्या कानी कसा पडत नाही?

 

मालवण : मच्छिमारांनी गोवा राज्यातील तीन एलईडी पर्ससीन नौका पकडून आणल्या. यात जिल्हा पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने तपास यंत्रणा राबवून मच्छिमार समाजातील निरपराध मच्छिमारांवर त्या घटनेशी संबंध नसताना गंभीर स्वरुपाचे खोटे गुन्हे दाखल केले.

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हुकूमशाही पद्धतीने हेतूपुरस्सर मच्छिमार नेते गोपीनाथ तांडेल व जोसेफ नरोन्हा यांना गोवण्याचा प्रयत्न करून त्यांच्यावर ‘थर्ड डिग्री’चाही वापर करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप मच्छिमार नेते कृष्णनाथ तांडेल यांनी केला.

पोलिसांकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न होत असल्यास मच्छिमारांच्या असंतोषाची खदखद शासन दरबारी पोहोचविण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशाराही तांडेल यांनी दिला.

मालवण येथील हॉटेल सागर किनारा येथे मच्छिमार सोसायट्यांचे प्रतिनिधी व मच्छिमारांनी पत्रकार परिषद आयोजित करून पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेल्या हुकूमशाही पद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

यावेळी  कृष्णनाथ तांडेल, स्वप्नील पराडकर, दीनानाथ धुरी, नितीन आंबेरकर, सुनील खवणेकर, चिन्मय तांडेल, नागेश परब, नरी जामसंडेकर, मनीष खडपकर, नारायण आडकर, शंकर मुंबरकर, सुधीर जोशी, प्रमोद खवणेकर, भिवा आडकर, भगवान मुंबरकर, पुंडलिक परब, विकी चोपडेकर, रुपेश लोणे, नितीन परुळेकर, महादेव आडकर, विक्रम आडकर, बाळा आंबेरकर, स्वप्नील आचरेकर, संदीप कोयंडे, दीपक जामसंडेकर यांच्यासह भद्रकाली, रामेश्वर व सर्जेकोट सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी तांडेल म्हणाले, महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत परराज्यातील नौकांना मासेमारी करण्यास बंदी असताना  त्यांच्याकडून एलईडी मासेमारीच्या सहाय्याने घुसखोरी करून अव्याहतपणे मासळीची लूट केली जाते. याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाकडून बघ्याची भूमिका घेतली जात आहे.

शासनाच्या अनास्थेमुळेच मच्छिमारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले जात आहेत. अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद केली जात नाही. कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने परराज्यातील नौकांना मासेमारी करण्यास सरकार मुभा देते. मुळात कमकुवत कायदा व सुव्यवस्थेत सुधारणा केल्यास अनियंत्रित मासेमारीला चाप बसू शकतो.

पोलिसांचा मनमानी कारभार

स्थानिक मच्छिमारांनी तीन नौका पकडल्या. या प्रकरणात काहीही संबंध नसलेल्या सेवाभावी व नि:स्वार्थी गोपीनाथ तांडेल यांच्यावर पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने गंभीर गुन्हे दाखल केले. तसेच निरपराध मच्छिमारांना या प्रकरणात गोवले जात आहे. पोलीस अधीक्षकांवर अन्यत्र बदलीची गदा येईल, या भीतीने ते ताब्यात घेतलेल्या मच्छिमारांवर ‘थर्ड डिग्री’चा वापर करीत हेतूपुरस्सर गुन्ह्यात अडकवित आहेत.

या प्रकरणात मच्छिमार बांधव भरडले जात असून पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधात असंतोषाला वाचा फोडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढू, असा इशारा कृष्णनाथ तांडेल यांनी दिला. या मोर्चातून शासनाला जागे करण्यासठी कोळंब, सर्जेकोट, मिर्याबांदा व रेवंडी आदी गावातील मच्छिमार सहभागी होतील, असेही तांडेल यांनी सांगितले. 

मच्छिमारांचा आक्रोश पालकमंत्र्यांच्या कानी कसा पडत नाही?

पोलिसांनी मच्छिमारांविरोधात हुकूमशाही सुरू केली आहे. मच्छिमारांवर खोटे गुन्हे दाखल होत असताना त्यांना असहाय्य परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आमदार प्रयत्न करीत नाहीत. प्रशासनाकडून कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने मच्छिमार जीव धोक्यात घालून परराज्यातील नौका पकडून आणत आहेत.

मच्छिमारांच्या असंतोषाचा आक्रोश पालकमंत्र्यांच्या कानी कसा काय पडत नाही? असा सवाल करताना तांडेल यांनी पालकमंत्री कमकुवत असून ते पालक नसल्यासारखेच वागतात, अशी टीका केली.

Web Title: False crimes against innocent fishermen: The allegation of Krishnath Tandel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.