Sindhudurg: तुम्हीच सांगा साहेब जगावे की मरावे?, हत्तीबाधित शेतकऱ्यांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 12:37 PM2024-04-01T12:37:03+5:302024-04-01T12:37:15+5:30

हत्तींचा कळप लोकवस्तीत

Elephant crisis in Dodamarg taluk in last few years, loss to farmers | Sindhudurg: तुम्हीच सांगा साहेब जगावे की मरावे?, हत्तीबाधित शेतकऱ्यांचा सरकारला सवाल

Sindhudurg: तुम्हीच सांगा साहेब जगावे की मरावे?, हत्तीबाधित शेतकऱ्यांचा सरकारला सवाल

वैभव साळकर

दोडामार्ग : एक तपाहून अधिक काळ हत्तींचा उपद्रव सहन करणाऱ्या दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी आता मरणयातना शिल्लक राहिल्या आहेत. हत्तींचा हा उपद्रव कायमचा दूर व्हावा यासाठी हत्तीपकड मोहीम राबविण्याची मागणी वनविभागाकडे करूनसुद्धा त्याकडे शासनदरबारी दुर्लक्षच झाल्याने हत्तींच्या उपद्रवामुळे नामोहरम झालेल्या शेतकऱ्यांपुढे जगावे की मरावे असा प्रश्न उभा ठाकला आहे. जिवाचे रान करून बागायती फुलवायच्या आणि हत्तींनी त्या पायदळी तुडवायच्या हे चित्र आता नेहमीचेच झाल्याने इथल्या बळीराजाचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकसानीची मिळणारी भरपाईही तुटपुंजी असल्याने आई जेऊ घालीना आणि बाप भीक मागू देईना अशी अवस्था त्यांची झाली आहे.

दोडामार्ग तालुक्यात गेल्या काही वर्षात हत्तींचे संकट खूपच गडद झाले आहे. एक तपाहून अधिक काळ हत्तींचा उपद्रव इथला शेतकरी सहन करत आहे. आज ना उद्या यावर तोडगा निघेल या आशेने आजतोवर हत्तींचे अस्मानी संकट तो झेलत आला आहे; पण आता हे सारे सहन करण्याच्या पलीकडे गेले आहे. कारण दरदिवशी हत्तींकडून होणारी हानी ही एका पिढीकडून भरून येणारी निश्चितच नसते.

परिणामी पोटापाण्याचा प्रश्न सोडवायचा कसा या विवंचनेत तो जगत आहे. तालुक्यातील कुडासे, परमे, घोटगे, घोटगेवाडी, केर, मोर्ले, तिलारी खोऱ्यातील हेवाळे, बांबर्डे, मुळस, बाबरवाडी, सोनावल, विजघर मेढे ही गावे बागायतींनी संपन्न समजली जायची. तिलारीच्या पाण्यावर अपार कष्ट करून इथल्या बेरोजगार युवकांनी रडत न बसता स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवर केळीच्या बागा उभ्या केल्या.

शासनाचे ठोस उपाययोजनांकडे दुर्लक्ष

नारळ, पोफळीचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली आणि स्वयंरोजगाराचे साधन शोधले मात्र हत्तींनी त्यांच्या साऱ्या आशा-आकांशावर पाणी फेरले. गेल्या पाच वर्षात तर या गजराजानी कहरच केला. दौलाने उभ्या असलेल्या बागा नेस्तनाबूत करून टाकल्या. कोट्यवधींचे नुकसान करून बागायतीच्या माध्यमातून स्वयं रोजगार शोधणाऱ्या इथल्या युवकांना नाउमेद करून सोडले. एवढे सारे आक्रीत घडत असताना मायबाप सरकार मात्र आले दिवस पुढे ढकलून ठोस उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी च तिलारी खोऱ्यातील शेतकरी संतापाने एकवटला आणि थेट वनविभागाच्या कार्यालयावरच मोर्चा नेला. त्यावेळी सफेद कॉलरवाल्या राजकीय पुढाऱ्यांनी आश्वासनांचे गाजर दाखविले. मात्र त्यांनी केलेल्या घोषणा केवळ बोलाचा भात आणि बोलाचीच कढी ठरल्या. त्यामुळेच तर ऐन काजूच्या हंगामात हत्तींचा उपद्रव आणखीनच वाढला असून काजू बागायतदारांना त्यांनी नामोहरम केले आहे.

हत्तींचा कळप लोकवस्तीत

सध्या दिवसाढवळ्या हत्तीचा कळप बिनधास्तपणे लोकवस्ती आणि काजू बागेत फिरत असल्याने शेतकऱ्यांनी बागायतीत जाणेच सोडून दिले आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या पोटचा घास मात्र हत्तींच्या दहशतीमुळे हिरावला आहे. काजू बीचा घसरलेला दर आणि त्यात उभे ठाकलेले हत्तींचे संकट यामुळे काजू बागायतदारांची अवस्था दुष्काळात तेरावा महिना असल्यागत झाली आहे, अशी विदारक परिस्थिती शेतकऱ्यांवर आली असताना मायबाप सरकार मात्र या हत्तीप्रश्नावर मूग गिळून गप्प बसल्याने राजाने मारलं आणि पावसाने झोडपलं तर दाद कुणाकडे मागावी, असा सवाल तालुक्यातील शेतकरी विचारू लागला आहे.

Web Title: Elephant crisis in Dodamarg taluk in last few years, loss to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.