मालवण येथील सागरी अभयारण्याला ज्ञानेश देऊलकरांचा विरोध नव्हता!, ज्येष्ठ मच्छिमार नेते रमेश धुरी यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 04:20 PM2023-03-01T16:20:10+5:302023-03-01T16:21:50+5:30

पारंपारिक मच्छीमारांचा खरे तर सागरी पर्यावरणास विनाशकारी असणाऱ्या यांत्रिकी मासेमारीला विरोध होता

Dyanesh Deulkar had no opposition to marine sanctuary in Malvan | मालवण येथील सागरी अभयारण्याला ज्ञानेश देऊलकरांचा विरोध नव्हता!, ज्येष्ठ मच्छिमार नेते रमेश धुरी यांचा गौप्यस्फोट

मालवण येथील सागरी अभयारण्याला ज्ञानेश देऊलकरांचा विरोध नव्हता!, ज्येष्ठ मच्छिमार नेते रमेश धुरी यांचा गौप्यस्फोट

googlenewsNext

संदीप बोडवे

मालवण: अरविंद उंटवाले यांच्या अहवालामुळे मच्छिमार विस्थापित होणार ही भावना तेव्हा प्रबळ झाली होती. आणि यातूनच मालवण सागरी अभयारण्याला विरोध सुरू झाला. सागरी पर्यावरणाला आणि पारंपारिक मासेमारीला पोषक असलेल्या सागरी अभयारण्याला दिवंगत ज्येष्ठ मच्छिमार नेते ज्ञानेश देऊलकर यांचा विरोध नव्हता, पारंपारिक मच्छीमारांचा खरे तर सागरी पर्यावरणास विनाशकारी असणाऱ्या यांत्रिकी मासेमारीला विरोध होता. असा गौप्यस्पोट नॅशनल फिश वर्कर फोरमचे माजी सदस्य व मालवण तालुका श्रमिक मच्छिमार संघाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश धुरी यांनी केला आहे. ते 'लोकमत' शी बोलत होते.

पारंपारिक मच्छीमारांना आजवर न्याय मिळवून देण्यासाठी गुजरात ते पश्चिम बंगाल पर्यंतच्या किनारपट्टीवर आवाज उठविणारे, दिल्ली येथील अनेक आंदोलनात सहभागी झालेल्या ८० वर्षीय रमेश धुरी यांची पारंपारिक मच्छीमारांप्रती अजूनही तळमळ कायम आहे. दिवंगत ज्येष्ठ मच्छिमार नेते गुरुवर्य ज्ञानेश देऊलकर यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश धुरी यांनी वेळोवेळी मच्छिमारांचे प्रश्न शासन दरबारी मांडले आहेत. 

धुरी म्हणाले, पारंपारिक मासेमारीतून सागरी पर्यावरणाचे रक्षणच होणार होते. शासनाला सुध्दा हेच अभिप्रेत होते. १९६६ मध्ये सिंधुदुर्गात यांत्रिकी ट्रॉलर्स ला मान्यता मिळाली. आणि धनिक मच्छिमार या विनाशकाली मासेमारिकडे वळू लागले. 

सुरुवातीपासूनच आमचा लढा हा यांत्रिकी ट्रॉलर्स आणि विनाशकारी मासेमारी विरोधात होता. यासाठीच म्हणून तत्कालीन जेष्ठ मच्छीमार नेते ज्ञानेश देऊलकर यांनी मालवण तालुका श्रमिक मच्छीमार संघाची स्थापना केली. विनाशकारी ट्रॉलिंग मासेमारीवर पहिल्यांदा बंदी आणा, ही आमची प्रमुख मागणी होती. 

मालवण मरीन सँक्च्युअरी बाबत सुरुवातीचा अहवाल देणारे अरविंद उंटवाले यांच्या अहवालातील तरतुदींमुळे मच्छिमार समाजात असुरक्षितेची भावना निर्माण झाली. संपूर्ण मालवण बंदर बंद करण्यात येणार आहे. मच्छिमारांना फक्त या भागात गळा द्वारेच मासेमारी करता येणार. अभयारण्याच्या क्षेत्रात पारंपारिक जाळ्या द्वारे करण्यात येणाऱ्या रापण मासेमारीला सुध्दा बंदी असेल. असे उंटवाले यांचे म्हणणे होते. 

तेव्हा असा निर्णय घेतला की मालवण बंदरच बंद होणार असेल तर आपणास मरीन पार्क (एमएमएसचे तेव्हाचे नाव) नको. परंतु नंतर पारंपारिक मासेमारीला आणि सागरी पर्यावरणाला मालवण मरीन पार्क (सँक्च्युअरी) पोषकच होता. त्याला विरोध केला ही आमची चूक झाली असल्याचे जेष्ठ मच्छिमार नेते ज्ञानेश देऊलकर यांनी नंतर कबूल केल्याचे रमेश धूरी म्हणाले. 
दिवंगत ज्ञानेश देऊलकर हे ज्येष्ठ मच्छीमार नेते होते. यांत्रिकी मासेमारी विरोधात मच्छीमारांना एकजूट करून त्यांनी मोठा लढा उभारला होता. मालवण मरीन पार्क विरोधात झालेल्या आंदोलनातही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. मच्छीमारांच्या सर्वच लढ्यात ते कायम अग्रणी राहिले होते. येथील मच्छीमारांसाठी गुरुप्रती असल्याने त्यांचे मत प्रमाण मानले जाते. 

अरविंद उंटवाले-  मँग्रोव्ह सोसायटी ऑफ इंडिया (एमएसआय) या संस्थेची स्थापना, गोव्यातील चोराव बेटांवरील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्याची निर्मिती, मालवण येथील सागरी अभयारण्याची निर्मिती, गोवा, गुजरात व महाराष्ट्रात प्रामुख्याने सातशेहून अधिक हेक्टर क्षेत्रातील खारफुटीची लागवड; 'खारफुटी रोपवाटिका' या अत्यंत नावीन्यपूर्ण व खारफुटी संवर्धनासाठी अत्यावश्यक अशा प्रकल्पाची मुहूर्तमेढ या व अशा अनेक कामांची न संपणारी यादी हे डॉ. उंटवाले यांचे पर्यावरणाला, समाजाला दिलेले अद्वितीय योगदान आहे. डॉ. उंटवाले यांना 'मँग्रोव्ह मॅन ऑफ इंडिया' अशी उपाधी देण्यात आली आहे. 

Web Title: Dyanesh Deulkar had no opposition to marine sanctuary in Malvan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.