दीपक केसरकर लोकसंपर्कात कमी पडले

By admin | Published: February 24, 2017 11:51 PM2017-02-24T23:51:33+5:302017-02-24T23:51:33+5:30

शिवसेनेच्या बालेकिल्ल्याचे बुरूज ढासळले : सक्षम उमेदवारांमुळेच काँग्रेसचा विजय

Deepak Kesarkar fell short in the public | दीपक केसरकर लोकसंपर्कात कमी पडले

दीपक केसरकर लोकसंपर्कात कमी पडले

Next



अनंत जाधव ल्ल सावंतवाडी
सावंतवाडी तालुका हा दोन वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. पण नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या बालेकिल्ल्याच्या बुरूजांना तडे गेले होते. तर जिल्हापरीषद व पंचायत समिती निवडणुकीत हे बुरूज काँग्रेसच्या लाटेत चांगलेच ढासळले आहेत. त्यामुळे विकासकामे करूनही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे लोकसंपर्कात कमी पडल्यानेच काँग्रेसने बाजी मारल्याचे चित्र आहे. त्यात काँग्रेसचा विजय हा एकप्रकारे सक्षम उमेदवारांचाच विजय मानला जात असल्याचे दिसून येत आहे.
सावंतवाडी तालुका हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. पण गेल्या पाच वर्षात या मतदार संघात दीपक केसरकर यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य होते. पण केसरकर हे विधानसभा निवडणुकीच्यावेळी शिवसेनेत गेल्याने या बालेकिल्ल्यात शिवसेनेचे प्राबल्य निर्माण झाले होते. पण विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच तीन महिन्यांपूर्वी नगरपालिका निवडणुका झाल्या. त्यात सावंतवाडीत मंत्री केसरकर हे काठावर पास झाले. तर वेंगुर्लेत सपशेल अपयशी ठरले होते. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीपासूनच शिवसेनेच्या बुरूजाला तडे गेले होते.
त्यानंतर झालेल्या या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेची भाजपबरोबर युती होईल, अशी आशा होती. पण आयत्यावेळी युती तुटली आणि दोन्ही पक्ष पुन्हा समोरासमोर उभे ठाकले होते. तर शिवसेना भाजप बरोबर काँग्रेसही निवडणूक रिंगणात असल्याने तालुक्यात तिरंगी लढत होईल, हे उघड होते. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे शिवसेनेच्या माध्यमातून झाली आहेत. पण कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यात मंत्री केसरकर हे अपयशी ठरले होते. त्यांच्यानंतर काम करण्यासाठी दुसरी कार्यकर्त्यांची फळीच तयार करण्यात आली नव्हती.
त्यामुळे गावागावात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी मंत्री केसरकर यांच्यानंतर कोण नसल्याने त्याचा मोठा फटका जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीत दिसून आला. त्याचाच परिपाक म्हणजे जिल्हा परिषदेत तीन जागा शिवसेनेच्या पदरात पडल्या तर काँग्रेसने पाच जागा पटकाविल्या. तसेच पंचायत समितीवरही निर्विवाद वर्चस्व प्रस्थापितही केले आहे.
मंत्री केसरकर यांनी कोलगाव तसेच पंचायत समितीमध्ये मळगाव, न्हावेली व कोलगाव येथे वगळता सर्वत्र आपले समर्थकच उभे केले होते. मात्र , या चार ठिकाणी जुने शिवसैनिक निवडून आले.
पण मळेवाड व आंबोली वगळता सर्वत्र केसरकर समर्थकांना जनतेने धडा शिकविल्याचे चित्र आहे. कोलगावमध्ये तर भाजप विरूध्द शिवसेना ही प्रतिष्ठेची लढत होती. त्यात शिवसेनेने बाजी मारली. सुरूवातीपासून मंत्री केसरकर हे महेश सारंग यांना शिवसेनेत आणण्यास उत्सुक होते. पण आयत्यावेळी त्यांना यात यश आले नाही. आणि सारंग यांनी भाजपात जाऊन निवडणूक लढवली आणि ते पराभूत झाले.
तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये ही यावेळी सर्व काही आलबेल असल्याचे चित्र होते. वरिष्ठ पातळीवरून जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांना वाऱ्यावर सोडल्यासारखी स्थिती होती. सर्व उमेदवारांनी स्वत:च्या ताकदीवर निवडणूक लढवली आणि त्यातील काहीजण विजयी झाले आहेत. काँग्रेसने तळवडे तसेच कोलगाव या जागा प्रतिष्ठेच्या केल्या. तळवडेत उत्तम पांढरे स्वत: तर आरोंदा येथे शेखर गावकर यांनी स्वत:च्या ताकदीवर आपले उमेदवार निवडून आणले आहेत.
भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने बांदा हा बालेकिल्ला राखण्यात यश मिळविले आहे. बांदा म्हटले की भाजप असे समीकरण पूर्वीपासून होते, ते पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तर पंचायत समितीमध्येही दिग्गजांना पराभूत करीत तीन ठिकाणी भाजपने विजयश्री खेचून आणली. भाजपसाठी ही दिलासादायक गोष्ट मानली जात आहे. सावंतवाडी तालुक्यात सध्या तरी काँग्रेसच अग्रेसर असल्याने शिवसेनेला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी भविष्यात मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.
मतदाराबरोबरच कार्यकर्त्यांशी लोकसंपर्क तसेच सतत मतदारांमध्ये राहणे, लोकांची कामे करणे, विकासकामात स्थानिकांना वाटा देणे यामुळेच भविष्यात शिवसेनेला मोठे यश मिळू शकते. अन्यथा ही वाटचाल अशीच राहिली तर काँग्रेस केव्हा गड सर करेल, हे सुध्दा मंत्री दीपक केसरकर यांना कळणार नाही.

Web Title: Deepak Kesarkar fell short in the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.