धबधब्यावरील बंधारे पर्यटकांनी फोडले, माजी सरपंचाकडून दुजोरा      

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 08:36 PM2018-06-26T20:36:13+5:302018-06-26T20:56:10+5:30

आंबोलीत बारमाही धबधबे सुरू राहण्याच्या नावाखाली धबधब्याच्या वर सहा फूट बंधारे घातल्याने मुख्य धबधब्यावरून पडणारे पाणी अडले आहे. हे बंधारे आठवड्यात फोडा, अन्यथा आम्ही ते फोडू, असा इशारा माजी आमदार राजन तेली यांनी वनविभागाला दिला आहे.

Amboli News | धबधब्यावरील बंधारे पर्यटकांनी फोडले, माजी सरपंचाकडून दुजोरा      

धबधब्यावरील बंधारे पर्यटकांनी फोडले, माजी सरपंचाकडून दुजोरा      

Next

 सावंतवाडी - आंबोलीत बारमाही धबधबे सुरू राहण्याच्या नावाखाली धबधब्याच्या वर सहा फूट बंधारे घातल्याने मुख्य धबधब्यावरून पडणारे पाणी अडले आहे. हे बंधारे आठवड्यात फोडा, अन्यथा आम्ही ते फोडू, असा इशारा माजी आमदार राजन तेली यांनी वनविभागाला दिला आहे. तर काही बंधारे कोल्हापूर येथील पर्यटकांनी फोडल्याची चर्चा आंबोलीत सुरू असून, याला आंबोलीचे माजी सरपंच बाळा पालयेकर यांनीही दुजोरा दिला.

आंबोली घाटात येणा-या पर्यटकांना वर्षानुवर्षे पर्यटनाचा आनंद लुटता येत होता. ब्रिटिशकालीन असलेल्या धबधब्यांवर यावर्षी प्रथमच वनविभागाने बंधारे घातले आहेत. हे बंधारे चौकूळमध्ये असून, त्यामुळेच प्रवाहाने पाणी धबधब्यातून पडत नाही. हा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघड झाल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. धबधब्याचा प्रवाह कमी झाल्याने धबधब्यावर अंघोळीसाठी येणाºया पर्यटकांची संख्या चांगलीच घटली आहे. याचा परिणाम व्यापाºयांवर झाला आहे.
वनविभागानेही प्राण्यांना पाणी मिळावे म्हणून आम्ही बंधारे घातले, असे सांगितल्याने निसर्गाची देणगी असलेल्या ब्रिटिशकालीन धबधब्याच्या प्रवाहात तुम्हाला बंधारे घालण्यास सांगितलेच कोणी, असा सवाल अनेकांनी केला आहे. त्यामुळे पर्यटकही चांगलेच नाराज झाले आहेत. मंगळवारी माजी आमदार राजन तेली यांच्यासह तालुकाध्यक्ष महेश सारंग, नगरसेवक आनंद नेवगी, अजय सावंत आदींनी आंबोली धबधब्याला प्रत्यक्ष भेट दिली व पाहणी केली.
यावेळी तेथील अनेक स्टॉलधारकांनी माजी आमदार तेली यांच्याकडे आपली कैफियत मांडली. यात धबधब्याच्या वर सहा फुटी बंधारे घातले आहेत. मग पाणी पडणार तरी कसे? १५ जूनपर्यंत सर्व धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित होत होते. आता २६ जून आला तरी प्रवाह मोठ्या प्रमाणात सुरू होत नाही, असे सांगितले. तर आंबोलीचे माजी सरपंच बाळा पालयेकर यांनीही धबधब्यावर बंधारे चुकीच्या पध्दतीने वनविभागाने घातले आहेत. आतापर्यंत असे कधीच बंधारे घातले नव्हते. मग आताच असे का केले, असा सवाल करीत धबधबे फुल्ल क्षमतेने प्रवाहित होत नाही याची माहिती कोल्हापूर येथील काही पर्यटकांना कळताच त्यांनी बंधारे फोडले आहेत, अशी चर्चा आंबोली परिसरात असल्याची माहिती पालयेकर यांनी दिली.
तर माजी आमदार राजन तेली यांनीही धबधब्याची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच स्थानिकांकडून धबधब्यांच्या वर कशा प्रकारे बंधारे घातले आहेत हे समजून घेतले. हे बंधारे सहा फूट आहेत. आतापर्यंत कधीच असे बंधारे घालण्यात आले नसल्याचे स्थानिकांनी माजी आमदार तेली यांना सांगितले आहे. हा प्रकार व्यापारी तसेच पर्यटक यांच्यावर अन्याय करणारा आहे. त्यामुळे हे बंधारे वनविभागाने हटवावेत अन्यथा आम्ही ते आठ दिवसात ग्रामस्थांना सोबत घेऊन हटवू, असा इशारा तेली यांनी दिला आहे. यावेळी काही व्यापाºयांनी संतप्त भावना व्यकत केल्या.
 
बंधारे फोडल्यास शासकीय निधी वाया
आंबोलीतील धबधब्यांच्या वर घालण्यात आलेले बंधारे फोडले तर शासकीय निधी खर्ची घालण्यात आला आहे तो वाया जाईल. मग याला जबाबदार कोण, असा सवाल आता वनविभाग करीत आहे. मग हे बंधारे फोडायचे कोणी या विवंचनेत सध्या वनविभाग असून, सध्या वनविभागाने या बंधाºयाच्या ठिकाणी जाणारी वाटही बंद करून टाकली आहे. तसेच या प्रकारात स्थानिक अधिकारीही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
 
अन्यथा ग्रामस्थांना घेऊन बंधारे फोडू : तेली
आंबोलीतील धबधब्याच्या वर घालण्यात आलेले बंधारे आठवड्यात फोडा, अशी मागणी माजी आमदार राजन तेली यांनी वनविभागाकडे केली आहे. तुम्हाला आठवड्यात जमले नाही तर आम्ही ग्रामस्थ घेऊन हे बंधारे फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही तेली यांनी दिला आहे. तसेच धबधब्याच्या वर बंधारे घालणे म्हणजे निसर्गाला आव्हान देण्यासारखे आहे. आतापर्यंत कधी वरून दगड पडले नाहीत, मग आताच पडणार हे वनविभागाला कसे समजले? हा सर्व प्रकार शासनाचा निधी वाया घालवण्यासारखा आहे. हा खर्च अधिकाºयांच्या खिशातून शासनाने घ्यावा अशी मागणी आम्ही वनमंत्र्यांकडे करणार, असे तेली यांनी यावेळी सांगितले.


 व्यवसायावर काहीसा परिणाम जाणवतो
अद्यापपर्यंत पूर्ण क्षमतेने धबधबे पडत नसल्याने पर्यटक येथे येत नाहीत. याचा परिणाम आमच्या धंद्यावर थोडासा जाणवतो, असे मत येथील स्टॉलधारकांनी व्यक्त केले.

Web Title: Amboli News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.