पर्यटन विकासासाठी ८३ कोटी

By admin | Published: April 5, 2017 12:35 AM2017-04-05T00:35:11+5:302017-04-05T00:35:11+5:30

जयकुमार रावल; सिंधुदुर्गला पर्यटनाचे मॉडेल बनविण्याचे आश्वासन

83 crore for tourism development | पर्यटन विकासासाठी ८३ कोटी

पर्यटन विकासासाठी ८३ कोटी

Next



वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनदृष्ट्या मॉडेल बनविण्यासाठी प्रयत्न असून, त्यासाठी सागर किनारे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. २० पर्यटनस्थळे स्वदेश दर्शन योजनेमधून विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी ८३ कोटींचा निधी मंजूर असून, तो येत्या १६ ते १८ महिन्यांत खर्च करणार असल्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, माजी आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली, युवा नेते संदेश पारकर, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा स्नेहा कुबल, वेंगुर्लेचे तहसीलदार अमोल पोवार, वेंगुर्लेचे नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी रामदास कोकरे, वेंगुर्ले भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्ले पंचायत समितीचे सभापती यशवंत परब, उपसभापती स्मिता दामले, भाजपचे नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मंत्री रावल म्हणाले, सिंधुदुर्गमधील सागर किनारे निसर्गरम्य व विलोभनीय आहेत. मात्र, किनाऱ्यावर अजूनही पाण्याची सोय नाही. काही किनाऱ्यांपर्यंत रस्ते जात नसल्याने तसेच दिवाबत्तीची सोय नसल्याने अशा सुंदर पर्यटनस्थळी लोक कमी प्रमाणात येतात. मात्र, आता जिल्ह्यातील अनेक किनारे जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायत यांच्या अंतर्गत संलग्न करून गावाकडे जाणारे रस्ते सुशोभित करून, तसेच त्यांची डागडुजी करून आकर्षक बनविण्यात येणार असून, समुद्रकिनारीच मुबलक पार्किंगची सोय करण्यात येणार आहे. किनारपट्टीवर जाणाऱ्या मार्गावर विजेच्या सोयीसह सुरक्षित व स्वच्छ शौचालये उभी करून आधुनिक रुमचे बांधकाम केले जाणार आहे. यासाठी स्थानिकांना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यात येतील. शिवाय याची सर्व देखभाल ग्रामपंचायतीमार्फत होणार आहे. तसेच फिशिंग व्हिलेज, झुला यांची सोय लोक येथे राहण्यासाठी आकृष्ट होतील यासाठी करण्यात येणार आहे.
लाकडी प्लॅटफार्म, जेट्स की, वॉटर स्कुटर, तसेच स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग वेंगुर्ले व शिरोडा किनारपट्टीवर सुरू करण्यात येणार आहे. यासाठी मालवण येथील मुले येथील स्थानिकांना प्रशिक्षित करणार आहेत. मोठ्या किनारपट्टीवर लोकवस्ती जास्त असलेल्या ठिकाणी वॉच टॉवर, लाईफ गार्ड अशी कामे स्थानिक मुलांना उपलब्ध करून देण्यात येतील. अपघाती क्षेत्राची माहिती देण्यासाठी माईक सिस्टिमचा अवलंब नियंत्रणासाठी करण्यात येणार आहे. गोवा-मुंबई राज्यमार्गावरील जवळच्या किनारपट्टी या महामार्गाला जोडणार असून, जेणेकरून प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे.
दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाची मदत घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्पाईस व्हिलेज व अ‍ॅग्रो टुरिझम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील कुंभार कलेला प्रोत्साहन देण्यासाठी मातीच्या माठातील थंड पाणी पर्यटकांना समुद्रकिनारी उपलब्ध करून देऊन वेगळेपण जपले जाणार आहे, असे मंत्री रावल म्हणाले.
वेंगुर्लेनगरीत रावल यांचे आगमन होताच त्यांचे सागर बंगल्यावर पंचायत समितीचे सभापती यशवंत परब, उपसभापती स्मिता दामले, नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा स्नेहा कुबल, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई, चिटणीस साईप्रसाद नाईक, सुषमा प्रभुखानोलकर, प्रशांत खानोलकर, बाळू प्रभू यांनी स्वागत केले. (वार्ताहर)

Web Title: 83 crore for tourism development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.