५० वर्षांपूर्वीच्या अपघाताच्या आठवणी होणार जाग्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 10:51 PM2018-10-07T22:51:00+5:302018-10-07T22:51:10+5:30

The 50 Years Old Accident Will Be Memorable | ५० वर्षांपूर्वीच्या अपघाताच्या आठवणी होणार जाग्या

५० वर्षांपूर्वीच्या अपघाताच्या आठवणी होणार जाग्या

Next

कणकवली : भजनाच्या माध्यमातून हरिनामाचा गजर करण्यासाठी ट्रकमधून निघालेल्या भजनप्रेमींवर ५० वर्षांपूर्वी गडनदी पुलावर काळाने घाला घातला होता. यावेळी झालेल्या भीषण अपघातात ५५ माणसे दगावली होती. तर काही माणसे जखमी झाली होती. दगावलेल्या व्यक्तींमध्ये कणकवली तेलीआळीतील ४० जणांचा समावेश होता. या मृतात्म्यांना आदरांजली वाहण्याबरोबरच त्या अपघातावेळी जे मदतीचे हात पुढे आले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुदर्शन मित्रमंडळ तसेच कणकवलीवासीयांतर्फे सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
२१ सप्टेंबर १९६८ रोजी शनिवारी सर्वपित्री अमावास्या होती. या दिवशी कणकवली शहर तसेच परिसरातील १२० भजनप्रेमी मालवण भरड दत्त मंदिर येथील डबलबारी सामन्याला निघाले होते. भजन महर्षी अर्जुन तावडे बुवा व परशुराम सावंत बुवा यांच्यात हा सामना होता. कणकवली तेलीआळी तसेच हर्णेआळी येथून भजनप्रेमींना घेऊन ट्रक मालवणला निघाला होता.
कणकवली व वागदे गावच्या सीमेवर गडनदी पुलावरील वळणावर ट्रकचालकाचा अंदाज चुकला. त्यामुळे तो ट्रक नदीत कोसळला. सर्वपित्री अमावास्येच्या काळरात्री भजनप्रेमींवर काळाने घाला घातला. अपघातात सुमारे ५१ जण जागीच ठार झाले होते. अनेक घरातील कर्ती-सवरती माणसे मृत झाली होती. या घटनेची माहिती कणकवलीसह जिल्हाभर अल्पावधीतच पोहोचली. या संकटसमयी अनेक व्यक्ती मदतीला धावल्या. डॉक्टरांनी जखमींना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. काही जखमींना सावंतवाडी व वेंगुर्ले येथेही उपचारासाठी पाठविण्यात आले. हा धक्का सहन करण्यासारखा नव्हता.
या अपघातातील मृतात्म्यांच्या आठवणी गेली ५० वर्षे त्यांचे कुटुंबीय तसेच कणकवलीवासीय सुदर्शन मित्रमंडळाच्या पुढाकारातून जतन करीत आहेत.
आज डबलबारी भजनाचा कार्यक्रम
सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी तेलीआळी येथे कणकवलीवासीय एकत्र येतात. भजनाच्या माध्यमातून मृत व्यक्तिंना आदरांजली वाहिली जाते. या अपघाताला यावर्षी ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मृतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अपघाताच्या वेळी ज्यांनी मदतीचा हात दिला त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. तसेच भजनही होणार आहे. त्यानंतर आमने-सामने डबलबारी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. पोखरण येथील बुवा समीर कदम व लिंगडाळ येथील बुवा संदीप लोके यांच्यात हा सामना रंगणार आहे. याबाबत तेलीआळी येथील सुदर्शन मित्रमंडळाचे कार्यकर्ते बुजुर्ग व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली गेले काही दिवस नियोजन करीत आहेत.

Web Title: The 50 Years Old Accident Will Be Memorable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.