वॉटर मीटर खरेदीत 28 लाखांचा घोटाळा, समीर नलावडे यांचा पुनरूच्चार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 04:11 PM2017-08-16T16:11:44+5:302017-08-16T16:11:50+5:30

'कंझ्युमर्स वॉटर मीटर ' खरेदी साठी राबविलेल्या प्रक्रियेबाबत उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर माहिती देत आहेत. मात्र , ठेकेदाराने पुरविलेले वॉटर मीटर हे चांगल्या प्रतिचे नसून त्यांची किंमत 2149 रूपये नाही.

28 million scam in water meter purchase, Sameer Nalawade reprimand | वॉटर मीटर खरेदीत 28 लाखांचा घोटाळा, समीर नलावडे यांचा पुनरूच्चार 

वॉटर मीटर खरेदीत 28 लाखांचा घोटाळा, समीर नलावडे यांचा पुनरूच्चार 

Next

कणकवली : 'कंझ्युमर्स वॉटर मीटर ' खरेदी साठी राबविलेल्या प्रक्रियेबाबत उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर माहिती देत आहेत. मात्र , ठेकेदाराने पुरविलेले वॉटर मीटर हे चांगल्या प्रतिचे नसून त्यांची किंमत 2149 रूपये नाही. त्यामुळे या मीटर खरेदीत गोलमाल झाला असून सुमारे 28 लाख रूपयांचा घोटाळा झाला आहे. असा पुनरूच्चार  कणकवलीचे माजी उपनगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केला.
येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, नगरसेवक बंडू हर्णे उपस्थित होते. 
यावेळी समीर नलावडे यांनी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, बाजारपेठेत ५५० रुपयांना मिळणारे इट्रॉन कंपनीचे १ हजार ८०० मीटर प्रत्येकी २ हजार १४९ रुपये किंमतीने नगरपंचायतीने खरेदी केले आहेत. नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत  खरेदी केलेले मीटर नगरसेवकांसमोर सभागृहात सादर करण्याची मागणी आम्ही केली होती. तसेच  नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडे वॉटर मीटर खरेदीबाबत स्पष्टीकरण मागितले होते. मात्र, तो मीटर सादर करण्यात आला नाही. पारकर यांच्यासारखेच आम्हीही लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे चुकीचे जर काही होत असेल तर त्याला आम्ही विरोध करणारच.
इट्रॉन कंपनीचे वॉटर मीटर पुरविणाऱ्या ठेकेदाराचे बिंग जनतेसमोर फुटेल या भीतीने कन्हैया पारकर यांची आता सारवासारव सुरू आहे. यावरून या व्यवहारात ठेकेदाराशी त्यांचे काही साटेलोटे आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतो.
वॉटर मीटर खरेदित कणकवलीतील नागरिकांची  फसवणूक करण्यात आली आहे.  जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी  ४०० रुपयाला वॉटर मीटर खरेदी केले आहेत. त्यालाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची मंजूरी मिळाली आहे. याची माहितीही आम्ही घेतली आहे. या मीटरची प्रत्यक्ष पाहणी करायची असेल तर वॉटर मीटर जोडणी केलेल्या ग्रामपंचायतींना पारकर यांनी माझ्यासोबत भेट द्यावी. आवश्यकता भासल्यास मुख्याधिकारी तसेच अन्य तज्ज्ञ व्यक्तिना सोबत घेवून पाहणी करून त्याचा अहवाल बनवावा. तसेच तो जनतेसमोर ठेवावा असे आव्हानही नलावडे यांनी कन्हैया पारकर यांना यावेळी दिले.
नगरपंचायत ५५० रुपयांच्या वॉटर मीटरचे २ हजार १४९ रुपये नागरिकांकडून त्यांच्या बिलातून  वसूल करणार आहे. तसेच हे वॉटर मीटर नळ कनेक्शनला बसविण्यासाठी सुजल निर्मल योजनेतून 29 लाख रूपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे कन्हैया पारकर  कणकवली वासीयांची एकप्रकारे फसवणूक करत आहेत. मीटर खरेदि सारख्या बाबतीत ते काय काय मिळवितात हे कणकवली वासियाना चांगलेच ज्ञात आहे. त्यामुळे त्यानी आमच्यावर टिका करु नये.असेही नलावडे यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, पार्किंग विषयावरूनही  पारकर टिका करीत आहेत. मात्र, काँग्रेसच्या पाच नगरसेवकांनी पत्र देवून सर्वात प्रथम पार्किंग आरक्षण विषय सभागृहासमोर मांडण्याची नगराध्यक्षांकडे मागणी केली होती.  हे त्यांना माहीत नाही का? मागणी करूनही  नगराध्यक्षांनी सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर तो विषय ठेवला नाही. त्यामुळे नगराध्यक्षा पारकर समर्थक की राजन तेली समर्थक? असा प्रश्न निर्माण होतो. तसेच पारकर हे तेलीना आतून मिळाले आहेत.असे म्हणण्यास वाव आहे.
यावेळी बंडू हर्णे म्हणाले, नगरपंचायतीने खरेदी केलेल्या वॉटर मीटरची किंमत किती आहे. तसेच आता खरेदी केलेला मीटर काय दर्जाचा आहे? तसेच पारकर यांची वॉटर मीटर ठेकेदाराशी हातमिळवणी आहे हे आम्ही  सिध्द करणार आहोत. पारकर जनतेचा विश्वस्त म्हणून मिरवतात मात्र वॉटर मीटर  निकृष्ट दर्जाचे खरेदी करतात.हे जनतेला कळणे गरजेचे आहे.त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

तुमच्यावरच आमदारांचा भरोसा नाय!
आमदार नीतेश राणेना आमच्यावर भरोसा आहे.तसेच आमचा त्यांच्यावर भरोसा आहे. मात्र, तुमच्यावरच आमदारांचा भरोसा नसल्याने तुम्हाला त्यानी पक्षातून बाहेर काढले आहे.हे लक्षात घ्यावे.असा टोलाही समीर नलावडे यांनी यावेळी कन्हैया पारकर यांना लगावला.

Web Title: 28 million scam in water meter purchase, Sameer Nalawade reprimand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.