वाठार स्टेशन, आदर्कीचा इतिहास शिवकालीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:12 PM2017-11-12T23:12:15+5:302017-11-12T23:14:19+5:30

Vastar station | वाठार स्टेशन, आदर्कीचा इतिहास शिवकालीन

वाठार स्टेशन, आदर्कीचा इतिहास शिवकालीन

googlenewsNext


सातारा : जिल्ह्यातील वाठार स्टेशन आणि आदर्की गावांची माहिती चुकीच्या प्रकारे सोशल मीडियावर फिरत असून, ही गावे ब्रिटिश राजवटीच्या पूर्वीपासून आहेत. छत्रपती शिवरायांच्या काळापासून या गावांचे अस्तित्व आहे. त्यामुळे सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून फिरत असलेली पोस्टमध्ये गावच्या इतिहासाची मोडतोड होत आहे. त्याबद्दल अनेकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या वाठार स्टेशन व आदर्की या गावांची चुकीची माहिती सोशल मीडियावर फिरत आहे. या माहितीनुसार मिरज-पुणे रेल्वे मार्गावरील ही गावे रेल्वे मार्गावरील पाणी भरण्याचे ठिकाण होते. ही गावे इंग्रज काळापासून वसली असे सांगितले जात आहे. खरेतर ही माहिती बरोबरच नाही. याबद्दल त्या भागातीलच तडवळेचे माजी सैनिक बजरंग निंबाळकर यांना या पोस्टबद्दल विचारले तर ते म्हणाले, ‘हा खोटा प्रचार आहे. कारण संबंधित गावे ही खूप जुनी व ब्रिटिशांच्या आधीपासूनच अस्तित्वात आहेत. ही गावे छत्रपती शिवरायांच्या काळापासून अस्तित्वात आहेत. त्याचे पुरावे दोन्ही गावांत आहेत. त्या भागातील वाडे, विहिरी, मंदिरे साक्षीदार म्हणून अस्तित्वात आहेत. ब्रिटिशांच्या आधीपासूनच वाठार या एकाच नावाची अनेक गावे आहेत.
रेल्वे सुरू झाली तेव्हा खरंतर पाणी नीरा येथेच भरलं जात होतं. कारण वाठार या गावात पाण्याचं दुर्भिक्ष्य होते. वाठार स्टेशन हे नाव वाठार गाव हद्दीतील स्टेशन म्हणून पडले आहे. वाठार हे संमत वाघोलीतील एक गाव होते. छत्रपती शाहूराजे भोसले यांनी या गावची निमपाटीलकी भोईटे घराण्याला दिली होती. मोकासा हक्क हा जहागिरदार,भोईटे, मोहिते, जाधवराव या घराण्यांना वाठार, संमत वाघोलीत होता. सध्या वाठार हे स्टेशनसह बाजारपेठेचे एक गाव आणि ग्रामपंचायत आहे, असेही निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.
आदर्की खुर्द हे निंबाळकर घराण्याची पाटीलकी असणारे गाव आहे. येथे छत्रपती शाहू यांच्या काळात १७०७-४९ च्या दरम्यान संताजी निंबाळकर यांचा उल्लेख येतो. येथे मुधोजीराव नाईक-निंबाळकर यांचा वाडा होता. हे गाव जुने आहे. आदर्की खुर्द शेजारी हिंगणगाव, तडवळे, आदर्की बुद्रुक ही गावे असून, शंभू महादेव डोंगररांग आहे.
आदर्कीजवळ असलेल्या सालपे घाटात निंबाळकर-जाधव यांच्यात लढाई झाल्याची माहिती सांगण्यात येते. इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने यामध्ये या लढाईची माहिती आहे. धनाजी जाधव यांच्या मृत्यूनंतर व १७१० च्या पावसाळ्यानंतर बाळाजी विश्वनाथ व चंद्रसेन जाधव यांची नीरेवर लढाई झाली. बाळाजी विश्वनाथ पांडवगडावरून साताºयास छत्रपती शाहूंकडे आले.
चंद्रसेन जाधव हे १७११ च्या प्रारंभी कोल्हापुरास जाण्याच्या बेतात होते. इतक्यात छत्रपती शाहू यांच्या आज्ञेवरून हैबतराव निंबाळकर हे चंद्रसेन जाधव यांच्यावर चालून आले. त्या दोघांची लढाई आदर्कीच्या घाटाखाली १७११ च्या मार्च-एप्रिल महिन्यात झाली, असा आदर्कीतील उल्लेख आहे. संमत वाघोली संदर्भात आणखी एक माहिती म्हणजे जवळच असलेल्या कण्हेरखेडचे पाटील असलेले व पुढे प्रसिद्धीस आलेले राणोजी शिंदे यांची एक मुलगी तडवळे संमत वाघोली येथील भोईटे यांना दिली होती.
इतिहास वाचून मत बनवावे...
भारत हा लाखो गाव, खेड्यांनी बनलेला देश आहे. अनेक गावे वैशिष्ट्यपूर्ण असून, त्यांना स्वत:चा इतिहास आहे. मात्र, काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून इतिहासाची मोडतोड करण्यात धन्यता मानतात. त्या प्रवृत्तींचा निषेध केला पाहिजे. यासाठी जो खरा इतिहास आहे. जो इतिहासकारांनी पुराव्यासह लिहिलेला आहे. तो वाचून मगच आपले मत बनवावे असे वाटते. अशी माहिती वाठार स्टेशनचे माजी सरपंच अमोल आवळे यांनी दिली.

Web Title: Vastar station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :historyइतिहास