Suril songs in the village of books, Bhilar poetry: Audience Response to 'When Poetry Was Singing' | पुस्तकांच्या गावात रंगली कवितांची सुरेल गाणी भिलार काव्यमय : ‘कवितेचं गाणं होतांना’ला प्रेक्षकांचा प्रतिसाद

भिलार : पुस्तकांच्या गावात आज विविध साहित्यिक उपक्रमांच्या मालिकेतील पुढील पुष्प गुंफले गेले. वाचक-पर्यटकांसाठी आज पुस्तकांच्या गावातील श्री जननीमाता मंदिर सभागृहात सुप्रसिद्ध गायक व संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या ‘कवितेचं गाणं होतांना..!' या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. घनगर्द निसर्ग आणि नीरव शांततेचा परिसर अशा अनुपम वातावरणात, रसिकांच्या उदंड प्रतिसादासह मैफलीला उत्तरोत्तर रंग चढत गेला.
या मैफलीत संत कवींपासून ते आधुनिक कवींच्या कवितांबाबत सलील कुलकर्णी यांनी रसिकांशी संवाद साधला. कवितेचं गाण्यात होणारं रुपांतर आणि कवितांच्या आशय, याबाबतच्या सुंदर सरास्वादाचा अनुभव मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिकांनी घेतला. मुलाखतकार अस्मिता पांडे यांनी सलील कुलकर्णी यांना बोलतं केलं, तसेच आदित्य आठल्ये (तबला) व रितेश ओहोळ (गिटार) यांनी अनुरुप साथसंगत केली.
बेंगळुरू, मुंबई, पुणे, नवी मुंबई, वसई, सातारा, सांगली, कºहाड, कोल्हापूर, पंढरपूर, वाई, महाबळेश्वर, पाचगणी अशा महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून या कार्यक्रमास रसिक (पूर्वनोंदणी करून) उपस्थित होते. राज्य शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे योजण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने भिलार गावातील वळणावळणांवर बा. भ. बोरकर, शांता शेळके, विंदा करंदीकर, स्वा. सावरकर, ग्रेस, सुधीर मोघे आदी सुप्रसिद्ध कवींच्या कवितांसह संत तुकाराम व संत नामदेव यांच्या अभंगांचे आकर्षक फलक लावण्यात आले होते. या फलकांमुळे गावातील वातावरण अधिक काव्यमय झाले होते.

कविता हा साहित्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे. मराठी साहित्यात कवितांचे अढळ स्थान आहे. कवितांना सुंदर चाली लावल्यानंतर त्या वाचकांच्या मनाचा ठाव घेतात. याचाच आधार घेऊन डॉ. सलील कुलकर्णी यांनी ‘कवितेचं गाणं होतांना...!’ अशी अभ्यासपूर्ण वेबसिरीज निर्माण केली. या मालिकेची समारोपाची मैफील पुस्तकांच्या गावी झाली. या कार्यक्रमाला रसिकांनी अभूतपूर्व हजेरी लावली. पुस्तकांच्या गावात नियमितपणे होत असलेल्या विविध साहित्यिक उपक्रमांबाबत उपस्थित रसिकांनी खूप समाधान व्यक्त केले. या गाण्यांच्या मैफलीला भिलार परिसरातील रसीक नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.

पुस्तकांचे गाव म्हणून ओळख झालेल्या भिलार मध्ये डॉ. सलिल कुलकर्णी यांच्या गाण्याचा कार्यक्रम झाला.