सांगलीची सिंचन मागणी वाढली; कोयनेचे आपत्कालीन द्वार पुन्हा उघडले, 'इतक्या' क्यूसेकने विसर्ग सुरु 

By नितीन काळेल | Published: March 13, 2024 12:47 PM2024-03-13T12:47:27+5:302024-03-13T12:48:04+5:30

सांगलीच्या लोकप्रतिनिधींकडून आव्हानाची भाषा..

Sangli irrigation demand increased; Koyna dam emergency door reopened | सांगलीची सिंचन मागणी वाढली; कोयनेचे आपत्कालीन द्वार पुन्हा उघडले, 'इतक्या' क्यूसेकने विसर्ग सुरु 

सांगलीची सिंचन मागणी वाढली; कोयनेचे आपत्कालीन द्वार पुन्हा उघडले, 'इतक्या' क्यूसेकने विसर्ग सुरु 

सातारा : सांगली जिल्ह्यात दुष्काळीस्थिती वाढल्याने पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार कोयना धरणातून सिंचनासाठी विसर्ग वाढविण्यात आला आहे. यासाठी पुन्हा धरणाचे आपत्कालिन द्वार खुले करण्यात आले आहे. त्यामुळे सांगलीसाठी द्वारमधून ५०० आणि पायथा वीजगृहातील २१०० असा २६०० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तर धरणात ६० टीएमसीच साठा शिल्लक आहे.
   
सातारा जिल्ह्यात मोठी धरणे अधिक आहेत. या धरणातील पाण्याची तरतूद ही साताऱ्याबरोबरच सांगली आणि सोलापूर  जिल्ह्यासाठीही करण्यात आलेली आहे. मात्र, गेल्यावर्षी अपुऱ्या पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील बहुतांशी धरणे भरली नाहीत. तर जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण कोयना असून याची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणातील पाणीसाठाही ९५ टीएमसीपर्यंत पोहोचलेला. त्यामुळे धरण भरण्यास १० टीएमसी पाणी कमी पडले. त्यातच गेल्यावर्षी परतीचा पाऊसही अपेक्षित झाला नाही.

परिणामी नोव्हेंबर महिन्यापासून दुष्काळी झळा जाणवत होत्या. अशातच शेतीसाठीही पाणी कमी पडत होते. त्यामुळे सांगलीच्या पाटबंधारे विभागाकडून नोव्हेंबरपासूनच कोयना धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी झाली. या मागणीनुसार कोयनेतून विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे धरणातून मागील तीन महिन्यांपासून सांगलीसाठी पाणी सोडले जात आहे. 

गेल्या काही दिवसांपासून सांगलीसाठी धरणाच्या पायथा वीजगृहाची दोन्ही युनीट सुरू करुन त्यातून २१०० क्यूसेक पाणी कोयना नदीत सोडले जात होते. तर धरणाच्या आपत्कालिन द्वारमधील विसर्ग थांबविण्यात आलेला. मात्र, सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढली आहे. त्यामुळे धरणाचे आपत्कालिन द्वार पुन्हा खुले करण्यात आले आहे. त्यामधून ५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या सांगलीतील सिंचनासाठी एकूण २६०० क्यूसेक पाणी सोडले जात आहे. 

दरम्यान, कोयना धरणातील पाणीसाठा कमी होत चालला आहे. सध्या ६०.५० टीएमसी पाणी शिल्लक आहे. १ जूनपर्यंत हे पाणी पुरवावे लागणार आहे. तर धरणात गेल्यावर्षीपेक्षा पाच टीएमसी पाणीसाठा कमी आहे.

सांगलीच्या लोकप्रतिनिधींकडून आव्हानाची भाषा..

कोयना धरणातील पाण्यावर अनेक गावांच्या पिण्याच्या पाणी योजना अवलंबून आहेत. तसेच टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या प्रमुख तीन सिंचन योजनांसाठीही पाण्याची तरतूद आहे. त्यातच धरणातील सर्वाधिक पाण्यावर सांगली जिल्ह्याचा हक्क आहे. त्यामुळे तरतूद आणि मागणीनुसार पाणी सोडावे लागते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कोयनेतील पाणीसाठा योग्य प्रमाणात वापरण्याबाबत साताऱ्यातील लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला सूचना केलेली. यावरुन सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आक्रमक झाले होते. तसेच आव्हानांची भाषाही करण्यात आली होती.

Web Title: Sangli irrigation demand increased; Koyna dam emergency door reopened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.