रामराजे-गोरेंची खुर्चीला खुर्ची; पण संवाद नाहीच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:13 PM2019-01-13T23:13:12+5:302019-01-13T23:13:17+5:30

जयदीप जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क रहिमतपूर : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांचे राजकीय ...

Ramraje-Goranech chair chair; But no dialogue ... | रामराजे-गोरेंची खुर्चीला खुर्ची; पण संवाद नाहीच...

रामराजे-गोरेंची खुर्चीला खुर्ची; पण संवाद नाहीच...

Next

जयदीप जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
रहिमतपूर : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांचे राजकीय वैर सर्वश्रूत आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघे कधी एकत्र आले तरी बोलत नाहीत. याचा प्रत्यय आता रहिमतपुरातील सिद्धेश्वर पुस्तके यांच्या कार्यक्रमावेळी आला. दोघे शेजारीशेजारी खुर्चीवर तब्बल अर्धा तास बसले होते. मात्र, ऐकमेकांशी ते एक शब्दही बोलले नाहीत. त्यामुळे उत्सुकता ताणलेल्यांची निराशा झाली.
कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे शनिवारी रात्री पिंपरी येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक नेते सिद्धेश्वर पुस्तके यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे खुर्चीला खुर्ची लावून बसले होते. हे दोघे ऐकमेकांशी बोलणार का? अशी उत्सुकता सर्वांनाच लागली होती. मात्र, तसे काही झाले नाही. कारण, गेल्या काही वर्षांपासून रामराजे व जयकुमार गोरे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. गोरे यांनी संचालक म्हणून सातारा जिल्हा बँकेत शिरकाव केल्यापासून या वादात आणखी भर पडली आहे. संधी मिळताच एकमेकांची उणी-दुणी काढताना अगदी मर्यादाही दोघांकडून ओलांडल्या जात आहेत. रामराजेंनी तर जयकुमार गोरेंवर अनेक बोचऱ्या टीका केल्या आहेत. आमदार गोरे यांनीही जिल्हा बँकेतील नोकर भरतीसह विविध विषयांना हात घालून रामराजेंना अडचणीत आणण्यावर जोर दिला. या आरोप-प्रत्यारोपांमुळे दोघांच्यातून सध्याच्या परिस्थितीत विस्तवही जात नाही, अशी स्थिती आहे.
अशा परिस्थितीत रहिमतपूर येथील कार्यक्रमाच्या व्यासपीठावर दोघेही खुर्चीला खुर्ची लावून बसले होते. यामुळे उपस्थितांमध्ये आता फलटण अन् माणच्या या दोन नेत्यांच्या तोफा एकमेकांविरोधात जोरदार धडाडतील, अशी खुमासदार चर्चा रंगली होती. मात्र, तब्बल अर्धा तास दोन्ही नेते एकमेकांकडे बघतही नव्हते. तसेच एकमेकांबरोबर चकार शब्दही बोलले नाहीत. परंतु उपस्थितांच्या नजरा मात्र या दोन नेत्यांच्याकडेच रोखल्या होत्या. यावेळी काहींनी तर व्हॉट्सअ‍ॅपवरून गोरे यांना व्यासपीठावरील परिस्थिती आणि उपस्थितांमध्ये सुरू असलेल्या चर्चेची माहिती दिली.
त्यावेळी व्हॉट्सअ‍ॅपवरील मेसेज वाचून गोरे यांनी उपस्थितांकडे एक कटाक्ष टाकून हसून दाद दिली. तर त्याचवेळी त्यांनी यातील काही मेसेज दुसºया बाजूला बसलेल्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांना दाखवले. ते मेसेज वाचून जाधव यांनाही हसू आवरता आले नाही.
तर दुसरीकडे रामराजेंच्या बाजूला माजी आमदार शिवाजीराव पाटील हे बसले होते. पाटील वाचनात दंग असल्यामुळे रामराजेंनी काही बोलताच त्यांच्या पलीकडे बसलेले आमदार बाळासाहेब पाटील आपल्या खुर्चीवरून थोडे पुढे सरकून रामराजेंच्या बोलण्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत होते. यावेळी माण आणि फलटणचे हे नेते शेजारी बसले असतानाही दोघांची परिस्थिती अवघडल्यासारखी झाल्याचे दिसत होते. तर उपस्थितांचे या दोघांकडे सारे लक्ष होते हे विशेष. पण दोघेही एकमेकांशी शेवटपर्यंत बोलले नाहीत.

सत्कारानंतर गोरे व्यासपीठावरून उतरले...
कार्यक्रम सुरू होऊन अर्ध्या तासातच आमदार जयकुमार गोरे यांनी पुष्पहार घालून व शाल, श्रीफळ देऊन सिद्धेश्वर पुस्तके यांचा सपत्नीक सत्कार केला. यानंतर ते थेट कार्यक्रमातून बाहेर निघून गेले. आमदार जयकुमार गोरे यांच्या अचानक बाहेर जाण्यामुळे उत्सुकता ताणलेल्या उपस्थितांची निराशा झाली.

Web Title: Ramraje-Goranech chair chair; But no dialogue ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.