पोलिस आले... खोंडांसह पळा पळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:23 AM2017-09-11T00:23:53+5:302017-09-11T00:23:57+5:30

Police came ... run away with the rams! | पोलिस आले... खोंडांसह पळा पळा !

पोलिस आले... खोंडांसह पळा पळा !

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव : राज्यात बैलगाड्यांच्या शर्यतीवर बंदी असताना देखील रविवार हा शासकीय सुटीचा वार पाहून बोरजाईवाडी (ता. कोरेगाव) येथे गावच्या माळावर भर उन्हात सुरू असलेल्या बैलगाडीची शर्यत पोलिसांनी बंद पाडली. पोलिस आल्याचे दिसताच, बैलगाडीसह खोंडांना घेऊन मालकांनी थेट डोंगरातच पलायन केले. पोलिसांच्या तावडीत सापडू नये, यासाठी शौकिनांनी भर रस्त्यातच चपला, बुट टाकून डोंगर माथाच गाठला. एकूणच माळावर ‘पोलिस आले.... पळा... पळा..’चाच कालवा होता.
जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात बैलगाडी शर्यत शौकिनांची संख्या सर्वाधिक आहे. कायद्याच्या जाचक अटींमध्ये शर्यती अडकल्याने शौकिनांमध्ये भली मोठी नाराजी आहे. अनेकांनी एकाहून अधिक सरस खोंड सांभाळले असून, त्यांच्या रतिबावर दरमहा लाखो रुपये खर्च करीत आहेत. आज नाही तर उद्या शर्यती सुरू होतील, या भाबड्या आशेवर शौकीन आहेत. कधीही बैलगाडी शर्यती सुरू झाल्यास, आपली तयारी असावी, यासाठी चोरी छुपे सराव केले जात असून, त्याबाबत मोठी गुप्तता पाळली जात आहे. त्यातून काही हौशी शौकीन कायद्याच्या पळवाटा शोधून आणि सलग येणाºया शासकीय सुट्या गाठून बैलगाडी शर्यतीचे आयोजन करीत असल्याने शौकिनांची पावले आपोआपच तिकडे वळतात. बोरजाईवाडीतही असाच प्रकार घडला. सकाळपासून खोंडांना घेऊन वाहने चिमणगाव मार्गे बोरजाईवाडीच्या माळाकडे कूच करीत होती. साधारणत साडे अकराच्या सुमारास शर्यतींना सुरुवात झाली, तोच जागरूक नागरिकांनी मंत्रालयातील बैलगाडी शर्यत प्रतिबंधक विभागाचे उच्चपदस्थ सनदी अधिकारी अनिल कटारिया व सातारा येथील पोलिस नियंत्रण कक्षाला मोबाईलवरून संपर्क साधून, बैलगाडी शर्यत सुरू असल्याचे कळविले. कटारिया व नियंत्रण कक्षाने कोरेगावच्या पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने पोलिस निरीक्षक संभाजी म्हेत्रे यांना कारवाईचे आदेश दिले.
पोलिस उपनिरीक्षक अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कूच करीत थेट बोरजाईवाडीचा माळ गाठला. पोलिसांनी शर्यतीच्या तळावर उभी असलेली वाहने व बैल ताब्यात घेतले. सर्वच वाहने थेट पोलिस ठाण्याच्या आवारात आणून लावण्यात आली. त्यानंतर एक-एक करत खोंड मालक आणि वाहनाशी संबंधित पोलिस ठाण्यात जमू लागले. पोलिसांनी वाहनातून उतरविलेल्या खोंडांचा सर्वप्रथम पंचनामा केला आणि संबंधित व्यक्तीच्या ताब्यात दिला. जो गुन्हाशी संबंधित आहे, त्याच्या सहकाºयाच्या ताब्यात खोंड देण्यात आला, तशी रितसर पोहोचपावती घेण्यात आली. खोंडांना चालवित संबंधित व्यक्ती इतर वाहनाच्या शोधार्थ सातारा जकात नाक्याकडे घेऊन गेली.
अनेकांनी पाहिली पोलिस जाण्याची वाट...
पोलिसांना पाहताच बैलगाडी शर्यतीचे आयोजक, शौकीन, बैलगाडी मालक व चालकांची बोबडी वळाली. पोलिस आले... पळा.. पळा... चा आवाज भर उन्हात माळावर घुमला आणि एकच पळापळ सुरू झाली. पोलिसांनी काठ्या घेऊन पाठलाग करताच अनेक जण खोंडांना घेऊन थेट डोंगर माथ्यावर जाऊन बसले. चपला, बूट आणि सँडलचा तर पायवाटेवर सडाच पडला होता. अनेकांनी आपली वाहने सोडून पळ काढला. उन्हाच्या तडाख्यात डोंगर माथ्यावर बसून पोलिस जाण्याची वाट पाहात होते.
टेम्पोेच्या चाकातील हवा सोडली
पोलिस उपनिरीक्षक अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली हवालदार महादेव खुडे, नाईक रियाज शेख, सचिन साळुंखे, गोरखनाथ साळुंखे, महादेव आळंदे, शिपाई किशोर भोसले व चालक पोलिस नाईक राहुल पवार यांनी बोरजाईवाडीच्या माळरानावर शर्यत रोखताना पळून जाऊ नका, असा इशारा दिला होता. मात्र, पोलिस आल्याने आता कारवाई होणार या भीतीने सर्वांनीच पळ काढला. जो तो पळत सुटला असल्याने पोलिसांनी वाहनांवर कारवाईस सुरुवात केली. तेथे असलेला एक टेम्पो कोणाचा आहे, अशी विचारणा केल्यावर एकानेही उत्तर दिले नाही. अखेरीस पोलिस पथकाने त्याच्या चारही चाकांतील हवा सोडून दिली.

Web Title: Police came ... run away with the rams!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.