ठळक मुद्देनागरिक व प्रवाशांचा खड्ड्यातून जीवघेणा प्रवास१३ किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था नागरिकांकडून तातडीने रस्ता दुरुस्तची मागणी

कुकुडवाड दि. 20 : माण व खटाव या दोन तालुक्यांला जोडणारा कुकुडवाड खिंड (नंदीनगर) ते मायणी या १३ किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, अक्षरश: मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे ठिकठिकाणी रस्त्याची चाळण झाली आहे.

अशा या खड्ड्यातून जीवघेणा प्रवास परिसरातील नागरिकांना व प्रवाशांना करावा लागत असल्याने तातडीने हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

माण व खटाव तालुक्यांच्या सीमेवरील कुकुडवाड खिंड (नंदीनगर) ते मायणी असा दोन तालुके व सातारा व सांगली असे दोन जिल्हे जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. गत दहा वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम झाले होते. मात्र बरेच  वर्षे उलटून गेल्यामुळे या रस्त्याची चांगलीच दुरवस्था झाली आहे.

या रस्त्यावरून सतत वाहनांची व प्रवाशांची गर्दी असते. या रस्त्यावरून मायणी, विटा, सांगली या भागाकडे  ये-जा करणाºया वाहनांची संख्या जास्त आहे. मात्र, रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून, वाहनधारकांना व प्रवाशांना डोकेदुखी ठरत आहे.