महाबळेश्वरसह पाचगणी हाऊसफुल्ल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:08 PM2017-12-31T23:08:33+5:302017-12-31T23:09:17+5:30

Panchgani House with Mahabaleshwar ... | महाबळेश्वरसह पाचगणी हाऊसफुल्ल...

महाबळेश्वरसह पाचगणी हाऊसफुल्ल...

Next


महाबळेश्वर : नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर, पाचगणीमध्ये हजारोंच्या संख्येने पर्यटक आल्याने सर्व परिसर गजबजून गेला आहे. महाबळेश्वरमधील विविध पॉर्इंटस्वरही पर्यटकांनी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. नाताळची सुटी असल्याने लहान मुलांचीही गर्दी दिसून आली. येथील हॉटेल फुल्ल झाली असून, रविवारी पर्यटकांनी नौकाविहार व घोडेसवारीचा आनंद घेतला.
महाबळेश्वर हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी वर्षभर पर्यटक येत असतात. आता नववर्षाचे स्वागत करण्यासाठी देश, परेदशातील पर्यटक येथे आले आहेत. रविवारी २०१७ या वर्षातील अखेरचा सूर्यास्त पाहण्यासाठी प्रसिद्ध मुंबई पॉर्इंटवर पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली होती. तसेच वेण्णालेक येथेही पर्यटकांनी नौकाविहार करून आनंद घेतला. तसेच येथे आलेले पर्यटक स्ट्रॉबेरी ज्यूस पिताना आईसक्रीम, आईस गोळा खाताना दिसून आले. वेण्णालेक, मुंबई पॉर्इंट या परिसरामध्ये घोडेसवारीचा देखील आनंद पर्यटकांनी लुटला. नववर्षाच्या निमित्ताने काही हॉटेल चालकांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आॅफर ठेवली आहे. ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी कलाकार तसेच उद्योगपती महाबळेश्वरात आले आहेत. नववर्षाच्या निमित्ताने कोणतीही चुकीची घटना घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने प्रत्येक नाक्यावर व बाजार पेठ परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
पोलिसांची नाकाबंदी
कास परिसरात थर्टी फस्टचा जल्लोष साजरा करत असताना मादक द्रव्य सेवन करून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सातारा तालुका पोलिसांनी यवतेश्वर या ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली. तसेच यावेळी काहीजणांवर कारवाईही करण्यात आली.
कासवर थर्टी फस्टचा जल्लोष !

पेट्री : नाताळची सुटी संपत आल्याने व २०१७ या वर्षाला निरोप देणे आणि थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी राज्यातील हजारो पर्यटकांची कास तलावावर गर्दी झाली होती. यामध्ये बच्चेकंपनीचाही समावेश होता. तसेच जपान, फ्रान्स या देशातीलही काही पर्यटकांनी हजेरी लावली होती.
साताºयापासून पश्चिमेस सुमारे २५ किलोमीटर अंतरावर कास पठार आणि तलाव आहे. निसर्गरम्य परिसर, चोहोबाजूला दाट हिरवीगार झाडी, तसेच निसर्गाचे वरदान असलेल्या कास या ठिकाणी पर्यटकांची सतत वर्दळ असते. थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर बहुसंख्य पर्यटक कुटुंबीयासमवेत आले होते. तसेच तरुणाईनेही कास तलावावर गर्दी केली होती. पार्टीच्या मेजवानीसाठी पर्यटकांकडून असंख्य चुली मांडल्या गेल्या होत्या. या परिसरातील हिरवीगार दाट झाडी, झुडपांचा निवारा घेत पर्यटकांनी भोजनाचा आस्वाद घेतला. कास परिसरात पर्यटनास आलेल्या पर्यटकांमुळे वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत होते. यामुळे संपूर्ण तलाव पर्यटकांच्या गर्दीने गजबजून गेला होता. अनेक पर्यटकांनी आपापल्या वाहनांच्या डेकवर नृत्याचा आनंदही घेतला. तसेच ठिकठिकाणी तरुणाई संगीताच्या तालावर ठेका धरत होती. तर काही ठिकाणी वयोवृद्ध मंडळी आपल्या नातवंडांसमवेत खेळात मग्न झाली होती. बच्चेकंपनीही या पर्यटनस्थळी कुटुंबासमवेत आनंद घेत होती. कित्येक पर्यटक तलावात जलविहाराचा आनंद घेऊन सेल्फी काढताना दिसत होती.

Web Title: Panchgani House with Mahabaleshwar ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.