ठळक मुद्देदर घसरले :कमी वेळेत कमी पाण्यावर चांगले उत्पन्न देणारे पीक

पिंपोडे बुद्रुक (जि. सातारा) : कोरेगाव, खटाव तालुक्यातील शेतकºयांना सोन्याचा दर देणारा राजमा केवळ दीड ते अडीच हजार रुपये क्विंटल दराने विकावा लागत आहे. ‘मायबाप सरकार तुम्हीच सांगा, आम्ही राजमा पिकवायचा का नाय?’ असा सवाल शेतकरी विचारू लागले आहेत.
कमी वेळेत कमी पाण्यावर चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून राजमा ओळखला जातो. कोरेगाव तालुक्यात राजम्याचे भरघोस उत्पादन घेतले जाते. येथील चवदार राजम्याला देशभरातील बाजारपेठांमधून मागणी आहे. अलिकडच्या काळात कोरेगाव बरोबरच खटाव आणि माण तालुक्यांच्या काही भागातही राजम्याचे पीक घेतले जाते.

यावर्षी मान्सून थोडाफार झाल्यावर शेतकºयांनी पेरणी केली होती. त्यानंतर दडी मारलेल्या मान्सूनने अधूनमधून थोडी फार हजेरी लावली. त्यावर आलेले पीक हातात पडण्याची वेळ आल्यावर परतीच्या पावसाने त्यावर पाणी फिरविले. त्यातूनही वाचलेले पीक बाजारात घेऊन गेल्यावर मिळत असलेल्या दराने शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. भिजलेला घेवडा सुकवता-सुकवता नाकीनऊ आले होते. त्यात उत्पादन खर्च निघेल एवढाही दर पदरात पडत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

दिल्ली, पंजाब मुख्य बाजारपेठ
दिल्ली, पंजाब, जम्मू-काश्मीर ही या पिकांची मोठी आणि प्रमुख बाजारपेठ आहे. वाघा घेवडा ही राजम्याची खरी ओळख. गेल्या दहा वर्षांत यात बीज क्रांती होऊन ‘वरुण’ या नावाने अडीच महिन्यांत आणि अतिशय कमी पाण्यात दुप्पट उत्पन्न देणारा वाण विकसित करण्यात आला. त्यामुळे मूळचा वाघा घेवडा आता नामशेष झाल्यात जमा झाला आहे. तरीही त्याची बाजारपेठेतील मागणी कमी झालेली नाही. तिन्ही तालुक्यांतील सर्वसामान्य शेतकºयांचे आर्थिक गणित याच घेवड्यावर अवलंबून आहे.