कोरेगावातील गुन्हेगारी पोलिसांसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 11:19 PM2017-08-23T23:19:14+5:302017-08-23T23:19:14+5:30

The headache of crime police in Koregaon | कोरेगावातील गुन्हेगारी पोलिसांसाठी डोकेदुखी

कोरेगावातील गुन्हेगारी पोलिसांसाठी डोकेदुखी

Next



साहील शहा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव : शहरावर पोलिसांचे योग्य नियंत्रण नसल्याने गुन्हेगारीने तोंड वर काढले आहे. वाहतूक शाखेचे कर्मचारी वगळता अन्य पोलिस अभावानेच रस्त्यावर आढळतात. शहराची व्याप्ती पाहता आणि गुन्हेगारांची गुन्हे करण्याची नवनवीन पध्दती पाहता, त्याचा बिमोड करायचा झाल्यास शहरांतर्गत पोलिस चौक्या कार्यान्वित करण्याची गरज निर्माण झालेली आहे. शहराच्या चारही दिशांना चौक्या उभारल्यास शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होणार आहे.
तालुका मुख्यालय असलेले कोरेगाव हे पश्चिम महाराष्टÑातील बाजारपेठेचे शहर. पूर्वीच्या काळात जिल्ह्यातील व्यापारावर कोरेगावची मोहर होती. कालांतराने शहराची ओळख पुसली गेली, मात्र राजकारणातील धगधगते शहर म्हणून ते आजही ओळखले जाते. शहरात ब्रिटीशकाळापासून पोलिस ठाणे असून, तेथे कर्मचारी संख्या मर्यादित आहे. गेल्या काही वर्षांत अधिकाºयांची संख्या आणि दर्जा वाढत गेला, कर्मचाºयांची संख्या मात्र त्या-त्या प्रमाणात वाढलीच नाही. पोलिस ठाण्यात सध्या एक पोलिस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक व सुमारे ६३-६५ कर्मचारी कार्यरत आहेत, त्यापैकी कोरेगाव शहराची जबाबदारी केवळ तीन हवालदार दर्जाच्या कर्मचाºयांवर सोपविण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी हीच जबाबदारी नाईक दर्जाचे कर्मचारी सांभाळत होते.
भांडणे-मारामाºयांसाठी विद्यार्थी कारणीभूत
२५ हजारांहून अधिक लोकसंख्या असलेले हे शहर पूर्वी मिनी गोवा म्हणून ओळखले जात होते. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या बंदीमुळे शहरातील सर्व वाईन शॉप्स, बिअर बार-परमीट रुम व देशी दारूची दुकाने बंद झाली आहेत. शहरात मराठी व इंग्रजी माध्यमाची शाळा, कन्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व महाविद्यालये आहेत. त्यामध्ये स्थानिक विद्यार्थ्यांसह ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा-महाविद्यालये ही आजवर भांडणे व मारामारीची मुख्य कारणे बनली आहेत. तेथे होणारी भांडणे बाहेर जाऊन मोठे स्वरूप घेतात आणि त्यातून मारामारी आणि खुनी हल्ले होतात, हे आजवरचे चित्र आहे. पोलिस अधिकारी व कर्मचारी तक्रार घेऊन येणाºयांची तक्रारी दाखल करतात आणि त्यावर कायद्यातील तरतुदींप्रमाणे कार्यवाही होते, पुढे काहीच होत नाही आणि त्यातून गुन्हेगारी फोफावते, असा कोरेगावकरांचा अनुभव आहे.
उपनिरीक्षकाची नेमणूक करा
कोरेगाव शहरावर पूर्वी एक फौजदार आणि मोजकेच कर्मचारी शहरावर नियंत्रण ठेवून होते, आता मात्र परिस्थिती बदलली आहे. शहरात एक उपअधीक्षक, एक निरीक्षक, तीन उपनिरीक्षक व सुमारे ७० कर्मचारी वेगवेगळ्या कार्यालयात कार्यरत असताना, त्यांना गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविता येत नाही, ही शोकांतिका आहे. शहरातील तीन बिटांसाठी आता एक उपनिरीक्षक व किमान पाच ते सहा कर्मचारी नेमावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
चौक्यांचे अस्तित्व नावालाच
कोरेगावात ग्रामपंचायत असताना तत्कालीन पदाधिकाºयांनी आझाद चौक (भाजी मंडई), चौथाई परिसर-श्री भैरवनाथ मंदिर आणि सुभाषनगर (मॅफको कंपनी समोर) येथे पोलिस चौक्यांची उभारणी करून दिली होती. आझाद चौकात रोटरी क्लबने मोठी भूमिका बजावली होती. २००१ साली त्याचे उद्घाटन झाल्यावर काही दिवसांसाठी चौकीचा वापर झाला, त्यानंतर मात्र चौकीचा एक-एक भाग चोरीस जाऊ लागला आहे. पोलिसांचे शहरात अस्तित्व नसल्याने गुन्हेगारी बाळसे धरू लागली असून आलेख वाढत चालला आहे.

Web Title: The headache of crime police in Koregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.