केक कापून झाडांचा दुसरा वाढदिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 10:53 PM2018-07-16T22:53:26+5:302018-07-16T22:53:37+5:30

Cut the cake and celebrate the second birthday of the trees | केक कापून झाडांचा दुसरा वाढदिवस साजरा

केक कापून झाडांचा दुसरा वाढदिवस साजरा

googlenewsNext


वडूज : प्रयास सामाजिक विकास संस्थेने दोन वर्षांपूर्वी वृक्ष लागवड करून त्याचे योग्य संवर्धन केले. यातील अनेक झाडे जगली असून, ती मोठी झाली आहेत. या झाडांचा दुसरा वाढदिवस वडूजमध्ये केक कापून साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्याधिकारी माधव खांडेकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, नगराध्यक्षा शोभा माळी, उपनगराध्यक्ष विपुल गोडसे, प्रयास सामजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक मांडवे, नगरसेविका किशोरी पाटील, मंगल काळे, नगरसेवक अनिल माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुख्याधिकारी खांडेकर म्हणाले, ‘वडूजमध्ये दोन वर्षांपूर्वी लागवड केलेल्या वृक्षांचा दुसरा वाढदिवस साजरा करून प्रयास संस्थेने समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. केवळ वृक्ष लागवड करून चालणार नाही. त्यांची निगा राखण्याचीही गरज आहे, हे यातून दाखवून दिले आहे.’
प्रभाकर घार्गे म्हणाले, ‘प्रयास विकास सामाजिक संस्था सामाजिकतेचा वेगळा आदर्श घेऊन काम करत आहे. त्यांनी समाजासाठी विविध प्रश्न घेऊन चांगल्या पद्धतीने वाटचाल करून स्वच्छतेच्या बाबतीत तालुक्यात वेगळा ठसा उमटवला आहे. तसेच पर्यावरण संरक्षणासाठी येरळा नदी (वेदावती) सफाई करून बंधारा बांधण्याच्या कामात मोलाचे सहकार्य केले. दोन वर्षांपूर्वी याच नदीकाठी वृक्षारोपण करून त्या झाडांची काळजी चांगल्या प्रकारे घेतली. त्या झाडांचा आज वाढदिवस साजरा केला. पुढील काळातही त्यांनी असे बरेच उपक्रम हाती घेऊन वडूज व परिसरातील भागांचा कायापालट करावा.’
याप्रसंगी नगराध्यक्षा शोभा माळी, नगरसेविका किशोरी पाटील, मंगल काळे यांच्या हस्ते येरळा नदीकाठी असलेल्या वृक्षांचे औक्षण केले. तर यावेळी मान्यवरांच्या हस्ते केकही कापण्यात आला. यावेळी प्रयास सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी, विविध शाळांमधील शिक्षक, शहरातील नागरिक, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Cut the cake and celebrate the second birthday of the trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.