रहिमतपूर बसस्थानकात वाढदिवसाची हुल्लडबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:00 PM2017-09-11T23:00:56+5:302017-09-11T23:01:00+5:30

Birthday rioting at Rahimatpur bus station | रहिमतपूर बसस्थानकात वाढदिवसाची हुल्लडबाजी

रहिमतपूर बसस्थानकात वाढदिवसाची हुल्लडबाजी

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
रहितमपूर : येथील बसस्थानकात सोमवारी एसटीच्या सर्व फेºया सुरळीत सुरू होत्या. प्रवाशांची एसटीसाठी पळापळ सुरू असतानाच अचानक युवकांची आरडाओरड सुरू झाली. दुचाकीवर ठेवलेला केक कापून वाढदिवस साजरा केला गेला. अन् हा आनंद साजरा करण्यासाठी फटाकेही फोडण्यात आले. अचानक प्रकार घडल्याने प्रवाशांची एकच पळापळ झाली.
रहिमतपूर येथे परिसरातील सुमारे वीस गावांतील युवक-युवती महाविद्यालयीन शिक्षणासाठी येतात. अकरावी, बारावीचे महाविद्यालय सुटल्यानंतर बसस्थानकात मोठी गर्दी होत असते. नेहमीप्रमाणेच सोमवारीही सकाळी साडेअकराच्या सुमारास बसस्थानकात एसटी चालक, वाहक, वाहतूक नियंत्रण कक्ष अन् प्रवाशांची धांदल सुरू होती.
अशातच काही युवकांनी बसस्थानकात फलाटावर एसटी उभी राहत असलेल्या ठिकाणी व वाहतूक नियंत्रण कक्षासमोरच दुचाकी आणून उभी केली. समोरच युवतींची मोठी गर्दी होती. काही युवकांनी तत्काळ दुचाकीवर केक ठेवला. काहींनी लगेच तेथे फटाक्यांची आतषबाजी केली.
जमावाने आरडाओरड करत एका युवकाच्या तोंडाला केक फासत वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी बसस्थानकात ये-जा करणाºया प्रवाशांची दैना उडाली. अचानक फटाके फुटू लागल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक प्रवासी सैरावैरा धावू लागले. परंतु, आपल्याच धुंदीत असलेल्या युवकांची सुमारे पंधरा मिनिटे हुल्लडबाजी सुरू होती. त्यामुळे प्रवाशांची एकच पळापळ सुरू
झाली.
बसस्थानकात एसटीची वाट पाहत थांबलेले प्रवासी हे दृष्य पाहून अस्वस्थ होत होते. काही वेळात युवकांनी तेथून पळ काढला. आपण कुठेही काहीही करू शकतो, हे दाखविण्यासाठीच तरुणांनी वाढदिवस साजरा केल्याची चर्चा बसस्थानक व महाविद्यालय परिसरात सुरू होती.
दंगामस्ती अन् बसस्थानक बदनाम
रहिमतपूर बसस्थानकात हाणामारी, दंगामस्तीच्या घटना वारंवार घडत आहेत. आता तर वाढदिवसही साजरे होऊ लागले आहेत. हुल्लडबाजीच्या वाढत्या घटनांमुळे बसस्थानक बदनाम होत आहे. हुल्लडबाज युवकांना वेळीच रोखले नाही तर भविष्यात अनेक महाविद्यालयीन तरुणांचे वाढदिवस बसस्थानकात साजरे होतील. हा पायंडा पडू नये, प्रवाशांची सुरक्षा अबाधित राहावी, यासाठी पोलिसांनी पोलिस बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Birthday rioting at Rahimatpur bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.