बलकवडी म्हणजे... आओ जाओ घर तुम्हारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:51 PM2017-10-22T23:51:34+5:302017-10-22T23:51:50+5:30

Balakwadi means ... come home is yours | बलकवडी म्हणजे... आओ जाओ घर तुम्हारा

बलकवडी म्हणजे... आओ जाओ घर तुम्हारा

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
वाई : वाई तालुक्यासह फलटण, खंडाळा तालुक्यांना पाणीपुरवठा करणारे बलकवडी धरण सध्या विविध समस्येच्या गर्तेत अडकले आहे. धरणाच्या सुरक्षेविषयीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धरणावर कसलीही सुरक्षा नसल्याने प्रेमीयुगलांसह मद्यपींचा वावर वाढला असून ‘आओ-जाओ घर तुम्हारा’ असे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
बलकवडी धरणाच्या मुख्य भिंतीवरच झाडा-झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे धरणाच्या बांधकामालाच धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सुरक्षा राम भरोसे असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वाढलेली झाडे मद्यपी तसेु प्रेमीयुगुलांचा आश्रय बनली आहेत. त्यामुळे बलकवडी धरण परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
बलकवडी धरणाच्या उभारणीसाठी कोट्यवधी निधी खर्च करण्यात आला आहे. वाई तालुक्याची जिव्हाळ्याची असणारी ‘जललक्ष्मी’ योजना याच धरणावर आहे. हजारो हेक्टर जमीन या योजनेच्या पाण्यावर भिजते. या भागातील अनेकांनी धरणासाठी आपल्या जमिनी देऊन स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवले आहे. नागरिकांच्या त्यागामुळेच धरण परिसराचा कायापालट झाला आहे. ही बाब पाटबंधारे विभाग गांभीर्याने घेत नसल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धरणाच्या सुरक्षिततेबाबत पाटबंधारे विभागाला अनेकदा सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, या विभागाच्या दुर्लक्षामुळे धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सध्या दिवाळीची सुटी पडल्याने धरण परिसराला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. अनेक पर्यटक थेट धरणाच्या भिंतीवर जाऊन फोटोसेशन करताना दिसत आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने पर्यटकांना अडविणारे कोणीही नाही. याचा फायदा घेऊन पर्यटक संपूर्ण धरणावर बिनधास्तपणे वावरत आहेत. त्यामुळे दुर्दैवाने एखादी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, हाही प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित होत आहे.
धरणाच्या मुख्य भिंतीवरच झाडे उगविल्याने भिंतीवरील माती वाहून गेल्याने दगडाच्या बांधकामाला धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक धरणाची सुरक्षा धरणावर झाडे उगविल्याने धोक्यात आली आहे. अनेक धरणांना झाडाझुडपांमुळे गळती लागून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. अशी अनेक उदाहरणे समोर असताना बलकवडी धरणाच्या सुरक्षेकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. पाटबंधारे विभागाच्या वतीने भिंतीवरील झुडपे तातडीने काढावी तसेच याठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.
झाडाझुडपात बाटल्यांचा खच...
धरण परिसरात मद्यपींचा वावर वाढला असून हे चित्र दररोज पहावयास मिळते. या ठिकारी झाडाझुडपात दारूच्या बाटल्यांचा खच साचला असून बाटल्यांचे प्रमाण दररोज वाढतच चालले आहे. त्यामुळे धरण परिसरात घाणीचे साम्राज्य पसरत चालले आहे. या धरणाच्या सुरक्षेविषयी अनेकवेळा आवाज उठवूनही पाटबंधारे विभाग याकडे गांभिर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. मद्यपींचा बंदोबस्त करण्यासाठी पाटंबधारे विभागाने पोलिस प्रशासनाच्या मदतीने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी येथील नागरिकांच्या वतीने केली जात आहे.

Web Title: Balakwadi means ... come home is yours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.