Airplane - Satari Grounds ---- Sataranam | विमान -- सातारी तळतळाट ---- सातारानामा
विमान -- सातारी तळतळाट ---- सातारानामा

--सचिन जवळकोटे--

गेल्या साडेतीन वर्षांत ज्या-ज्या मंत्र्यांचे पाय साताºयाला लागले, त्यातली बहुतांश मंडळी केवळ कऱ्हाड च्या विमानतळावर उतरण्यासाठीच आलेली. मुक्कामी राहिलेली मंडळीही केवळ पाचगणी-महाबळेश्वरची थंड हवा अनुभवण्यासाठीच जमलेली. दौरा परजिल्ह्याचा; वापर मात्र कऱ्हाड विमानतळाचा. विकासाची घोषणा शेजारच्या जिल्ह्यात; बंदोबस्तासाठी यंत्रणा मात्र साताºयाची. किती ही क्रूर कुचेष्टा? केवळ या जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचा एकही आमदार ‘कमळ’ घेऊन फिरत नाही म्हणून? किती दिवस अजून सवतीच्या लेकरासारखी वागणूक आपल्या जिल्ह्याला मिळत राहणार? प्रश्न.. प्रश्न अन् प्रश्न.

पंतांच्या दौऱ्याची संख्या डझनभर
मीडियाच्या माहितीनुसार गेल्या दोन-अडीच वर्षांत देवेंद्रपंतांनी डझनभरपेक्षाही अधिकवेळा कºहाडच्या विमानतळावर पाय ठेवलं. यापैकी बहुतांशवेळी त्यांचा दौरा शेजारच्या जिल्ह्यासाठीच राखून ठेवलेला. आजपर्यंतच्या या अनेक दौऱ्यांमुळं सातारा जिल्ह्याचा नेमका काय फायदा झाला? हे केवळ ब्रह्मदेवच जाणे. असो.

सॅल्यूट कऱ्हाडकरांच्या सहनशीलतेला..

एखाद्या मंत्र्याच्या दौऱ्याची प्रेसनोट ‘मीडिया’कडे आली की आम्हा पामराला वाटतं की, ‘चला... जिल्ह्याच्या विकासासाठी एखादी छानशी घोषणा होणार!’ ...पण हाय, सोहळा सांगली किंवा कोल्हापुरातला. फक्त तिथं जाण्यासाठी म्हणे कऱ्हाडच्या विमानतळावर हे मंत्री महोदय उतरणार. एवढाच काय तो त्यांचा ‘सातारा जिल्हा दौरा.’ व्वाऽऽ व्वाऽऽ विमानातून उतरलेले मंत्री दोन-पाच मिनिटांसाठी फ्रेश होत विमानतळावरच थांबणार. आमचे बिच्चारे कार्यकर्तेही हार-गुच्छ किंवा बुके-बिके घेऊन त्यांच्यासमोर गर्दीत धडपडणार. ‘कॅमेºयासमोर स्माईल’ देत हे महोदय सातारकरांचा बुके स्वीकारणार अन् विकासाची घोषणा करण्यासाठी मात्र परजिल्ह्याकडं पळणार.

हे मंत्री महोदय विमानतळावर उतरण्यापूर्वी दोन तास अगोदर साताºयाची सारी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागणार. सारे अधिकारी आपली रोजची कामं सोडून इथं ताटकळत हजेरी लावणार. ‘मिनिस्टरसाहेब येऊन जाणार,’ म्हणून कऱ्हाडचे प्रमुख रस्तेही ब्लॉक केले जाणार. सर्वसामान्य स्थानिक मंडळींनाही बराच वेळ अडवून ठेवलं जाणार... हे सारं कशासाठी? तर परजिल्ह्यातल्या कार्यक्रमाला लवकरात लवकर जाण्यासाठी मंत्री महोदयांचा खोळंबा होऊ नये म्हणून ! सलाम बुवाऽऽ सातारकरांच्या संयमाला. सॅल्यूट बुवाऽऽ कऱ्हाडकरांच्या सहनशीलतेला.. दि ग्रेट सातारा जिल्हा !


काही दिवसांपूर्वी साताऱ्यात मुक्कामाला आलेल्या एका मंत्री महोदयांनी बोलता-बोलता प्रश्न विचारला की, ‘आमच्या येण्या-जाण्याचं तुम्ही भांडवल करता. मग तुमच्या जिल्ह्यातले किती लोकप्रतिनिधी इथं स्वत:च्या मतदारसंघात कायमस्वरुपी मुक्कामाला असतात?’ बापरे.. प्रश्न तिरकस होता.. परंतु त्याचं उत्तरही धक्कादायक होतं.

बाबा महाराज कऱ्हाडकरांची फॅमिली दिल्ली-मुंबईला शिफ्ट झालेली. शशिकांत ल्हासुर्णेकरही नवी मुंबईकरच बनलेले. हे कमी पडलं की काय म्हणून, जयाभावांचंही कुटुंब पुण्यातच म्हणे. फलटणचे राजेही पुण्यातच. त्यांच्याशी नेहमीच स्पर्धा असणारे साताऱ्याचे थोरले राजेही पुण्यातच.
तरी नशीब.. बोपेगावचे मकरंद आबा, मरळीचे शंभूराज, उंडाळ्याचे विलासकाका, भुर्इंजचे मदनदादा भलेही त्यांचा मतदारसंघ सोडून साताऱ्यात राहत असले तरी किमान स्वत:च्याच जिल्ह्यातच वास्तवाला असतात.. हेही तसे थोडके.

जिल्ह्याच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, त्याबद्दल सध्या कुणीच बोलायला तयार नाही. सातारकरांचं हक्काचं पाणी सांगलीला नेलं गेलं. आजपर्यंत इथला सत्ताधारी कधीच बोलला नाही. इथल्या ऐतिहासिक कबुतराचा पुतळाही कोल्हापूरला पळविण्याचा घाट घातला गेला.. तरीही सारे लोकप्रतिनिधी चिडीचूपच.

जिल्ह्यातल्या ८५० गावांमधली स्ट्रीट लाईट गेले तीन दिवस बंद. तरीही कुणी तोंड उघडायला तयार नाही.. कारण इथं साऱ्यांची एकच गोची. राज्यातले सत्ताधारी स्थानिक पातळीवर विरोधकच राहिलेत अन् गावोगावचे सत्ताधारी राज्यपातळीवर विरोधक बनलेत. जिल्ह्यात कोण विरोधक अन् कोण सत्ताधारी, याचं आत्मभान कुणालाच होईनासं झालंय. त्यामुळं जिल्ह््याच्या विकासासाठी नेमका कुणी पुढाकार घ्यायचा, हेच कुणाला समजेनासं झालंय.

अतुलबाबा विठ्ठलऽऽ विठ्ठलऽऽ .. मात्र साताºयाच्या माऊलींंचं काय ?
नाही म्हणायला कºहाडला दोन पदं मिळालीत. शेखररावांना ‘सहकार’ मिळालं, परंतु याचा जिल्ह्याच्या विकासाला प्रत्यक्षात किती फायदा झाला? हेही आता पाहणं गरजेचं बनलंय.
अतुलबाबांनाही ध्यानीमनी नसताना अकस्मातपणे ‘पंढरीची वारी’ मिळाली. तेही बिच्चाऽऽरे हातात टाळ-मृदुंग घेऊन ‘विठ्ठलऽऽ विठ्ठलऽऽ’ करत अधून-मधून पंढरीला जाऊ लागले, परंतु त्यामुळं आपल्या जिल्ह्याला नेमकं काय मिळालं? याचा विचार करत जिल्ह्यातल्या सर्वसामान्य ‘माऊली’ घरोघरी भाकऱ्या थापत राहिल्या. बा पांडुरंगा.. आता तूच सरकारला साताºयाच्या असहाय्यतेची जाणीव करून

दे. विठ्ठलऽऽ विठ्ठलऽऽ
नाही म्हणायला कोल्हापूरचे चंद्रकांतदादा अधून-मधून जिल्ह्यात थांबतात. आता कोल्हापुरातून मुंबईला जाताना त्यांच्या वाटेत आपला जिल्हा लागतो, हेही आपलं परमभाग्यच म्हणायचं की राव..


स्थळ :कऱ्हाडतील कोल्हापूर नाका. वेळ : सोमवारी दुपारी तीनची. मुख्यमंत्र्यांचा फौजफाटा हायवेवरून कऱ्हाड विमानतळाकडे जाणार म्हणून या परिसरातील वाहनं बराचवेळ थांबवून ठेवण्यात आलेली. सहनशीलता संपत चाललेल्या एका कऱ्हाडकरानंच हा फोटो काढून स्वत:हून ‘लोकमत’कडं पाठविलाय. या छायाचित्रकाराचं नाव आहे रविराज देवकर.


 


Web Title:  Airplane - Satari Grounds ---- Sataranam
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.