दुष्काळाचा फटका; सातारा जिल्ह्यात ४० हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना

By नितीन काळेल | Published: January 29, 2024 06:48 PM2024-01-29T18:48:00+5:302024-01-29T18:48:41+5:30

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याचा फटका खरीपनंतर आता रब्बी पेरणीवर झाला आहे. अवघी ८१ टक्के पेरणी झालेली ...

40 thousand hectares area is uncultivated In Satara district | दुष्काळाचा फटका; सातारा जिल्ह्यात ४० हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना

दुष्काळाचा फटका; सातारा जिल्ह्यात ४० हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याचा फटका खरीपनंतर आता रब्बी पेरणीवर झाला आहे. अवघी ८१ टक्के पेरणी झालेली आहे. तर सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना राहिलेले आहे. त्याचबरोबर ज्वारीसह गव्हाच्या क्षेत्रात मोठी घट झालेली आहे.

जिल्ह्यातील शेती मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. चांगला पाऊस झाल्यास दोन हंगाम चांगल्यारितीने घेण्यात येतात. त्यातच जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वात मोठा समजला जातो. त्यानंतर रब्बी हंगाम असतो. मात्र, गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते. सरासरीच्या ६५ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला होता. यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पेरणीवर परिणाम झाला. तसेच उत्पादनावरही परिणाम झाला आहे. 

जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख १३ हजार हेक्टरवर निश्चित करण्यात आले होते. यामध्ये ज्वारीचे सर्वाधिक १ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्र होते. त्यानंतर गव्हाचे ३७ हजार हेक्टर, हरभरा २७ हजार हेक्टरवर होते. या तीन प्रमुख पिकांशिवाय मका, करडई, सूर्यफूल, तीळ, जवस घेणारे शेतकरी आहेत. पण, या पिकांचे क्षेत्र अत्यल्प आहे. जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने रब्बीच्या पेरणीवरही परिणाम झाला आहे.

कृषी विभागाच्या अंतिम पेरणी अहवालानुसार ८१.१२ टक्केच पेरणी झालेली आहे. त्यामुळे १ लाख ७२ हजार ९५० हेक्टरवरच पेरणी झालेली आहे. यामध्ये प्रमुख पीक असणाऱ्या ज्वारीची १ लाख ३ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. ७६ टक्क्यांवर ही पेरणी आहे. तर गव्हाची सुमारे ३३ हजार हेक्टरवर पेर आहे. पेरणीची टक्केवारी ८८ इतकी आहे. हरभऱ्याची ७७ टक्के क्षेत्रावर पेर आहे. म्हणजे, २१ हजार ३३९ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. तसेच मकेला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मका क्षेत्रात वाढ झालेली आहे. कृषी विभागाने १० हजार हेक्टर क्षेत्र निश्चित केले होते. प्रत्यक्षात १४ हजार हेक्टरवर मका घेण्यात आलेली आहे. मकेची पेरणी टक्केवारी १३८ इतकी आहे.

गेल्यावर्षी जिल्ह्यात कमी पर्जन्यमान झाले. त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता नाही. दुष्काळी स्थिती असल्याने शेतकऱ्यांनी पाणी उपलब्धततेचा विचार करुन रब्बी हंगाम पेरणी केलेली आहे. तसेच पेरणी होऊनही पिकांना पाणी कमी पडत असल्याने पीक उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.

माण तालुक्यात ६५ टक्केच पेरणी..

जिल्ह्यात सातारा आणि कऱ्हाड तालुक्यातच रब्बी हंगामात १०० टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. साताऱ्यात १५ हजार ४९२ तर कऱ्हाडला सुमारे १५ हजार हेक्टवर रब्बी पिके आहेत. तर सर्वात कमी पेरणी माण तालुक्यात झालेली आहे. ४६ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील ३० हजार हेक्टरवरच पेर झाली. माणमधील पेरणीची टक्केवारी ६५ इतकीच आहे. तर जावळी तालुक्यात ७९ टक्के, पाटण ८८, कोरेगाव ७५, खटाव ७३ टक्के, फलटण ८८, खंडाळा ८०, वाई ८४ आणि महाबळेश्वर तालुक्यात ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.

खरीपात १९ हजार हेक्टर क्षेत्र नापेर..

जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या खरीप हंगामावरही दुष्काळी सावट होते. त्यामुळे खरिपाची ९३ टक्केच पेरणी झालेली. त्यामुळे १९ हजार हेक्टर क्षेत्र नापेर राहिले होते. आता रब्बीतही मोठ्या प्रमाणात क्षेत्र पेरणीविना आहे.

Web Title: 40 thousand hectares area is uncultivated In Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.