Sangli: कोयनेतून पाणी सोडल्यामुळे कृष्णाकाठाला दिलासा, शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

By अशोक डोंबाळे | Published: February 20, 2024 04:01 PM2024-02-20T16:01:39+5:302024-02-20T16:02:10+5:30

कृष्णा नदीतील कमी पाण्यामुळे पाण्यास दुर्गंधी

Two thousand 600 cusecs of water was released from Koyna Dam into Krishna river in Sangli | Sangli: कोयनेतून पाणी सोडल्यामुळे कृष्णाकाठाला दिलासा, शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

Sangli: कोयनेतून पाणी सोडल्यामुळे कृष्णाकाठाला दिलासा, शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

सांगली : कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडण्याच्या मार्गावर असतानाच कोयना धरणातून मंगळवारी दुपारपासून दोन हजार ६०० क्युसेकने पाणी कृष्णा नदीत सोडले जात आहे. कोयनेतून विसर्ग वाढविल्यामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, तसेच कृष्णा नदीत सध्या कमी असल्यामुळे पाण्यास दुर्गंधी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

जिल्ह्यात सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. पाऊस नसल्यामुळे दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव, मिरज, कडेगाव तालुक्यातील विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठला आहे. पुरेसा पाणीपुरवठा नसल्यामुळे रबी पिकांसह द्राक्ष बागाही वाळण्याच्या स्थितीत आहेत. या पार्श्वभूमीवर टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनेतून पाणीपुरवठा चालू आहे. यामुळे कृष्णा नदीत पुरेसा पाणीसाठा नाही. सांगली, भिलवडीसह अनेक ठिकाणी कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी होती.

आमदार अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर व अमोल बाबर यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यासह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारी दुपारी कोयना धरणाचे स्लुइस गेट उघडून ५०० क्युसेक आणि कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे दोन्ही युनिट सुरू करून त्याद्वारे दोन हजार १०० असे दोन हजार ६०० क्युसेकने धरणातून विसर्ग सुरू आहे. कोयना धरण व्यवस्थापनच्या या निर्णयामुळे कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांसह पाणीपुरवठा योजना असणाऱ्या गावातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

महापालिका क्षेत्रातील नागरिकांनाही दिलासा

कृष्णा नदीत पाणी कमी असल्यामुळे महापालिका प्रशासनाने नागरिकांना कोणतीही सूचना न देताच पाणी कपात सुरू केली आहे. कोयना धरणातून पाणी सोडल्यामुळे महापालिका क्षेत्रातील नागरिकांवरील पाणी कपातीचे संकट टळणार नाही. महापालिका क्षेत्रातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे.

Web Title: Two thousand 600 cusecs of water was released from Koyna Dam into Krishna river in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.