सांगलीतील घरफोडीप्रकरणी दोघांना अटक, २९ लाखांचा मुद्देमाल जप्त

By घनशाम नवाथे | Published: February 14, 2024 12:12 PM2024-02-14T12:12:17+5:302024-02-14T12:12:40+5:30

सांगली : कोल्हापूर रस्त्यावरील समर्थ कॉलनीत बंगला फोडून २८ लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज लांबवणारे राजू प्रकाश नागरगोजे (वय ...

Two arrested in case of burglary in Sangli, goods worth Rs. 29 lakh seized | सांगलीतील घरफोडीप्रकरणी दोघांना अटक, २९ लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगलीतील घरफोडीप्रकरणी दोघांना अटक, २९ लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली : कोल्हापूर रस्त्यावरील समर्थ कॉलनीत बंगला फोडून २८ लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज लांबवणारे राजू प्रकाश नागरगोजे (वय ३६, सध्या रा. बार्शी रस्ता, बाळे, ता. उत्तर सोलापूर, मूळ रा. उचगाव, जि. कोल्हापूर) आणि नितेश आडवय्या चिकमठ (वय २९, रा. सावरकर कॉलनी, गल्ली क्र. २, विश्रामबाग, सांगली) या दोघांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अंकली फाटा परिसरात ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील एका शोरूमचे मालक विनोद श्रीचंद खत्री यांचा कोल्हापूर रस्त्यावरील समर्थ कॉलनीत बंगला आहे. ५ फेब्रुवारी रोजी मुलीचा विवाह असल्यामुळे खत्री कुटुंबीय सायंकाळी कोल्हापूरला गेले होते. त्यानंतर चोरट्यांनी बंद बंगला हेरला.

बंगल्याच्या मागील बाजूने सीसीटीव्हीची वायर कापून आत प्रवेश केला. आतमध्ये बेडरूमच्या कपाटातील १८ तोळे सोन्यासह २० लाखांची रोकड असा एकूण २८ लाख ५२ हजारांचा ऐवज लंपास करून पोबारा केला होता. ६ फेब्रुवारी रोजी खत्री कुटुंबीय बंगल्यात परतल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आला. खत्री यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस पथक गेले पाच दिवस तपास करत होते. सहायक पोलिस फौजदार अनिल ऐनापुरे यांना सोने विक्री करण्यासाठी दोघे जण अंकली फाट्यानजीक दुचाकीवर थांबल्याची माहिती मिळाली. पथकातील सहायक निरीक्षक पंकज पवार यांनी तेथे धाव घेतली. दोघे जण दुचाकीवर थांबल्याचे दिसले. पोलिसांना पाहताच पळून जायचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना ताब्यात घेतले. नागरगोजे याच्या सॅकमध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम आढळली.

पोलिसांनी दोघा संशयितांकडील चोरीतील १८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, २० लाखांची रोकड आणि ८० हजारांची दुचाकी असा २९ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. दोघांनी खत्री यांचा बंगला फोडल्याची कबुली दिली. या कामगिरीबद्दल अधीक्षक संदीप घुगे यांनी पथकाचे कौतुक केले.

पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक पंकज पवार, पोलिस कर्मचारी सचिन धोत्रे, कुबेर खोत, अरुण पाटील, प्रकाश पाटील, विनायक सुतार, अभिजित ठाणेकर, सुनील जाधव, रोहन घस्ते, सूरज थोरात, श्रीधर बागडी, कॅप्टन गुंडवाडे, स्वप्निल नायकोडे, अजित पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.

आंतरराज्य गुन्हेगार

संशयित राजू नागरगोजे हा पोलिस दफ्तरी नोंद असलेला सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध सांगली, कोल्हापूरसह कर्नाटकातही अनेक गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Two arrested in case of burglary in Sangli, goods worth Rs. 29 lakh seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.