बिळाशी येथे बारा लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:04 AM2018-06-25T00:04:13+5:302018-06-25T00:04:17+5:30

Twelve lakhs of burglaries at Bileasi | बिळाशी येथे बारा लाखांची चोरी

बिळाशी येथे बारा लाखांची चोरी

Next

बिळाशी : बिळाशी (ता. शिराळा) येथील विजय श्रीपती धस यांच्या घरी चोरी झाली असून, सुमारे चाळीस तोळे सोने व ५० हजार रुपये रोकड चोरट्याने लंपास केली आहे. चोरट्याने धस यांच्या घरात असलेले कपाट पेटवून देत किमती साड्या, कपड्यांचे मोठे नुकसानही केले. याप्रकरणी धस यांनी राहुल कल्लाप्पा वग्गे (मूळ गाव लिंबी, चिंचोळी, ता. दक्षिण सोलापूर) या घरगड्यावर संशय व्यक्त केला आहे.
बिळाशी ते कुसाईवाडीदरम्यान परीट वस्तीजवळ विजय धस यांचा बंगला आहे. तेथेच त्यांची मोठी शेतीवाडी आहे. ते या परिसरातील प्रगतशील शेतकरी आहेत. पत्नी आनंदी, आई ताराबाई यांच्यासह सर्व कुटुंबीय पंधरा दिवसांपूर्वी ठाणे (मुंबई) येथे विजय धस यांच्या भावाकडे गेले होते. घरगडी राहुल वग्गे हा एकटाच घरी होता. गेले तीन वर्षे तो त्यांच्याकडे काम करीत असल्याने त्याच्यावर धस यांचा विश्वास होता. ठाण्याला जाताना धस यांनी गावातील महादेव साठे यांच्या खानावळीत त्याची जेवणाची सोय केली होती. शुक्रवार, दि. २२ जून रोजी रात्री ९.१५ पर्यंत राहुल हा धस कुटुंबीयांच्या संपर्कात होता. त्यानंतर त्याचा फोन बंद होता. बिळाशी येथील घरगुती खानावळीत जेवायला जाणारा राहुल शनिवारी दुपारपर्यंत न आल्याने, तसेच त्याचा फोन लागत नसल्याने खानावळीचे मालक महादेव साठे यांनी धस यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली. यावेळी विजय धस यांनी त्यांना घरी अथवा शेतात जाऊन पाहण्यास सांगितले. साठे यांनी धस यांच्या शेतात राहुलचा शोध घेतला; पण तो दिसला नाही. यानंतर ते धस यांच्या घरी गेले असता तेथेही तो नव्हता. परंतु, साठे यांना धस यांचे घर उघडे असल्याचे दिसले, तसेच खोलीतील साहित्य जळाल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी तातडीने धस यांना फोनवरून याची माहिती दिली.
धस यांनीही लगेचच खुजगाव (ता. शिराळा) येथे मुलगी ज्योती व जावई शंकर सावंत यांना फोन करून घरी जाऊन पाहणी करण्यास सांगितले. रात्री दहा वाजता ज्योती व शंकर सावंत बिळाशी येथे आले. यावेळी त्यांना धस यांच्या घराचा दरवाजा फरशी घालून तोडल्याचे दिसून आले. बेडरूममधील कपाटे उघडलेली व त्यामधील साहित्य विस्कटलेले दिसून आले. तसेच एक कपाट पेटवून देऊन कपडे, साड्या जाळल्याचे आढळले. याप्रकरणी धस यांनी शिराळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
घरगडी दुचाकीसह गायब
घरगडी राहुल हा मोटारसायकलसह (एमएच ०४ सीएफ ५०६४) गायब होता. मुलगी ज्योती हिने सर्व माहिती विजय धस यांना कळविल्यानंतर रविवारी सकाळी धस कुटुंबीय बिळाशीला परतले. त्यांनीही राहुल वग्गे याचा शोध घेतला; पण तो सापडला नाही.

Web Title: Twelve lakhs of burglaries at Bileasi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.