ऊस वाहतूकदारांची दोन वर्षात हजार कोटींची फसवणूक - राजू शेट्टी  

By अशोक डोंबाळे | Published: February 18, 2023 11:54 AM2023-02-18T11:54:27+5:302023-02-18T11:54:52+5:30

लाखो रुपये बुडाल्याने वाहतूकदार देशोधडीला लागले

Sugarcane transporters cheated of thousands of crores in two years says Raju Shetty | ऊस वाहतूकदारांची दोन वर्षात हजार कोटींची फसवणूक - राजू शेट्टी  

संग्रहीत छाया

Next

सांगली : राज्यातील ऊस वाहतूकदारांची मुकादमांनी गेल्या दोन वर्षांत एक हजार कोटी रुपयांची फसवणूक केलेली आहे. त्यातून दोन खून, दहा आत्महत्या झाल्या. १०२५८ मुकादमांनी वाहतूकदारांना टोपी घातली असून ते आता महागडी वाहने घेऊन रुबाबात फिरतात. यात केंद्र व राज्य सरकारने लक्ष घालावे, गोपीनाथ मुंडे ऊस तोडकरी कल्याण महामंडळाने तोडणी कामगार द्यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी आणि भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

शेट्टी व पवार म्हणाले, ऊस वाहतूकदारांनी कर्ज काढून त्यांनी वाहने घेतली. मुकादमांना ॲडव्हान्स दिला. तेच सध्या टोप्या घालत आहेत. त्यांच्याकडे वसुलीला गेल्यानंतर ॲट्रॉसिटी, खुनाचे गुन्हे दाखल आहेत. लाखो रुपये बुडाल्याने वाहतूकदार देशोधडीला लागले आहेत. साखर आयुक्तालयाच्या माहितीनुसार राज्यातील १०२५८ मुकादमांनी फसवणूक केली आहे. ही रक्कम आमच्या हिशेबाने एक हजार कोटींवर आहे.

या स्थितीत ऊस तोडकरी महामंडळ काय करते?, केवळ कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करायला हे महामंडळ काम करतेय का? त्यांनी तोडकरी पुरवले पाहिजेत, तरच महामंडळासाठी प्रतिटन दहा रुपयांचा निधी कपातीस आम्ही मान्यता देऊ. मुकादम ही व्यवस्थाच मोडीत काढायला हवी. त्यांना १९ टक्के म्हणजे टनामागे ५२ रुपये का द्यायचे? त्याऐवजी महामंडळाला दहा रुपये देऊ. ही रक्कम राज्यात १३२ कोटी होते. त्यातून महामंडळ सक्षम होईल. मुकादम पोसू नका, तोडकऱ्यांच्या हिताकडे लक्ष द्यावे.

बँकांनी तगादा लावू नये

ऊस वाहतूकदारांच्या कर्जाच्या वसुलीसाठी बँकांनी तगादा लावू नये, जे फसवले गेले आहेत त्यांची कर्जे रूपांतरित करून त्यांना पाच वर्षे मुदत द्यावी, फसव्या मुकादमांना काळ्या यादीत टाकावे, पोलिस पथक नेमून या प्रकारांची चौकशी करावी, या मागण्यासाठी लढा सुरू आहे. त्यासाठी स्वाभिमानी ऊसतोडणी वाहतूक संघटना स्थापन केली आहे. सरकारला पंधरा दिवसांची मुदत देतोय, असेही शेट्टी म्हणाले.

बुधवारी चक्काजाम

वीज दरवाढीच्या विरोधात बुधवारी दि. २२ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन पुकारले. ३७ टक्के वीज दरवाढ असून त्याला आमचा विरोध आहे. शेतकऱ्यांना तुम्ही दिवसा वीज देत नाही. वीज व्यवस्थापन नीट करत नाही. बंद पंपांचे पैसे वसूल करता, सरकारची अनुदान लाटता, हे सिद्ध झाले आहे, असा आरोपही शेट्टी यांनी केला.

Web Title: Sugarcane transporters cheated of thousands of crores in two years says Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.